दिनांक 25 March 2019 वेळ 4:39 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » प्रशिक्षणाच्या नावाखाली नगरसेवकांच्या ‘गोवा’ वारीचा घाट? 

प्रशिक्षणाच्या नावाखाली नगरसेवकांच्या ‘गोवा’ वारीचा घाट? 

विशेष प्रतिनिधीRajtantra_EPAPER_160418_4_120452 (1)

        वाडा, दि. १५ : येथील नगरपंचायत आर्थिकदृष्ट्या डबघाईला आली असताना नगरसेवकांच्या प्रशिक्षणाच्या नावाखाली  ‘गोवा’ वारीचा घाट घातला जात आहे. नगर पंचायतीकडे पैसा नसल्याने कोणतीही विकासकामे होत नाहीत. मात्र प्रशिक्षणावर लाखो रुपये उधळले जाणार असल्याने नागरिकांत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. 

वाडा नगर पंचायत ही नव्याने स्थापन झालेली नगर पंचायत असून डिसेंबर २०१७ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीद्वारे नगराध्यक्ष व नगरसेवकांची निवड करण्यात आली. त्यापूर्वी ग्रामपंचायत असल्याने उत्पन्नाचे स्रोत कमी असल्याने ग्रामपंचायतीची आर्थिकस्थिती वाईट होती. त्यामुळे प्रशासकीय खर्च भागवण्या पलीकडे ग्रामपंचायत विकासकामांवर खर्च करू शकली नाही.  त्यावेळी पाणीयोजनेचे येणारे वीजबिल भरणेही ग्रामपंचायतला शक्य होत नव्हते. त्यामुळे अनेकदा वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रसंग ओढवत असे. आज नगर पंचायत झाल्यानंतरही या स्थितीत फार बदल झालेला नाही. नगर पंचायतीला काही महिन्यांपूर्वी मुद्रांक शुल्कापोटी मिळणारे व अन्य अनुदानापोटी सुमारे आठ लाख रुपयांचा मिळालेला निधी थकित वीजबिल भरण्यासाठी वापरल्याने नगर पंचायत विजबिल भरू शकली. अन्यथा वीजपुरवठा कपातीचा प्रसंग नगर पंचायतवरही ओढवला असता. नगर पंचायत आजही आर्थिक संकटात असताना नगरसेवकांच्या प्रशिक्षणावर लाखो रुपये खर्च होत असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून कळते.

           नगरसेवकांसाठीचे हे प्रशिक्षण ऑल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट ह्या खाजगी संस्थेने १० व ११ मे दरम्यान आयोजित केले असून प्रशिक्षणासाठी मात्र  गोव्यासारखे रमणीय ठिकाण निवडण्यात आले आहे. ह्या प्रशिक्षणासाठी प्रत्येकी  ११ हजार ५०० इतके शुल्क आकारले जाणार असल्याची माहिती पुढे आली आहे. वाडा नगर पंचायतीमध्ये नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांसह १८ नगरसेवकांच्या प्रशिक्षणावर सुमारे २ लाख ३० हजार रुपये खर्च केला जाणार असून प्रवासखर्चाचा भारही जर नगर पंचायतीने उचलला तर त्यावरही लाखो रुपये खर्च होणार असल्याने आर्थिकदृष्ट्या संकटात असलेल्या नगर पंचायतीने एका प्रशिक्षणावर एवढा खर्च करावा का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र या अनावश्यक खर्चावर एकही नगरसेवक आक्षेप घेताना दिसत नसल्याने सर्वच नगरसेवक ‘गोवा’ वारीसाठी गुढघ्याला बाशिंग बांधून असल्याचे चित्र आहे.
        स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांचे पुण्यातील यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी ( यशदा ) सारखी शासकीय प्रशिक्षण संस्था नियमितपणे प्रशिक्षण घेत असताना एका खाजगी संस्थेने आयोजित केलेल्या प्रशिक्षणावर लाखो रुपये खर्च करण्याचा घाट का घातला जात आहे ? यात नेमके कोणाचे हितसंबध गुंतलेत असा प्रश्न निर्माण होत आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top