दिनांक 16 January 2019 वेळ 3:34 PM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » मूलभूत प्रश्नांवर गाजली जव्हारची आमसभा  

मूलभूत प्रश्नांवर गाजली जव्हारची आमसभा  

IMG-20180412-WA0284मनोज कामडी 
         जव्हार, दि.१२ :  तालुक्याच्या आमसभेत उपस्थित नागरिकांनी  रोजगार, रेशनींग धान्य, रस्ते, पाणी, आणि विद्युत पुरवठ्याच्या प्रश्नांवर आक्रमक होत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. हे मूलभूत प्रश्न सोडविण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याचा आरोप करत अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे हा तालुका विकासापासून वंचीत राहत असल्याची भावना यावेळी नागरिकांनी व्यक्त केल्याने ही आमसभा मूलभूत प्रश्नांवर गाजली. 
           तालुक्याच्या विकासात महत्वाची भूमिका बजावणारी  आमसभा गुरुवारी ( दि. १२)  कै. उत्तमशेठ मगन रजपूत सभागृहात आदिवासी विकास मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे  पालकमंत्री विष्णु सवरा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
          जव्हार तालुक्यातील मूलभूत प्रश्न सुटावेत म्हणून शासन विविध योजनांच्या नावाखाली  गेली कित्येक वर्ष मोठ्याप्रमाणात निधी खर्च केला जातो. मात्र अधिकाऱ्यांच्या उदासिनतेमुळे या भागातील मूलभूत प्रश्न आजही सुटू शकले नसल्याने नागरिकांत तीव्र संतांप असल्याचे आजच्या आमसभेत दिसले.येथील मजूरांना मागणी करूनही १५ दिवसाच्या आत रोजगार मिळत नाही. ज्या रोहयो मजुरांना रोजगार हमीवर काम मिळतं, मात्र त्या रोहयो मजुरांना वेळेत मजुरी मिळत नाही. रोहयोवर काम करना-या रोहयो मजुरांना मजुरीसाठी महिने थांबावे लागते. या प्रश्नावर नागरिक आक्रमक झाले. त्यावर संबंधित अधिकाऱ्यांची उत्तर देताना चांगलीच अडचण झाली.
           तर रेशनींगचे धान्य वेळेत मिळत नाही. जव्हार कुटीर रुग्णालयाला २०० खाटांची मंजुरी मिळूनही आजपर्यत  अमलबजावणी नाही. त्यामुळे रुग्णाचे हाल मोठे होत असून, पावसाळ्यात एका खाटेवर दोन दोन रुग्णाला  उपचार घ्यावे लागत आहेत. मागील वर्षी ३२ गावं पाडे पाणी टंचाई होते. मात्र  या वर्षी पाणी टंचाईची गावं कमी झाली असून या वर्षी ७ गावे  ५ पाडे पाणी टंचाई ग्रस्त आहेत. तसेच  नागरिकांच्या समस्या, किंवा  नागरिकांची कामे वेळेत होत नसल्याने उपस्थित नागरिकांनी  अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.
          तालुक्यातील अनेक पाडे विद्युतीकरणा पासून वंचित आहेत. यामध्ये घाटाळपाडा, दखनेपाडा, सोनगीरपाडा, कुंडाचापाडा, खैरमाळ, पाचबुड, खेत्रीपाडा, हे पाडे विद्युत जोडणीपासून वंचित आहेत. त्या पाड्यांचे  विद्युत जोडणीचे काम प्रगतीत असल्याचे विद्युत अधिका-यांनी उत्तरं दिलं. ग्राहकांची स्टॅम्प वेंडरकडून अवाच्यासवा अधिक पैसे आकाररून ग्राहकांची फसवणूक झाल्याच्या नागरिकांनी तक्रारी केल्या. जातीचा, उत्त्पन्न, रहिवासी दाखला, असे अनेक दाखले काढण्यासाठी सेतू सेवा केंद्राकडून पावती न देता अधिक पैसे आकारणे, तालुक्यातील सिल्वासा हद्दीला लागून असलेल्या  रुईघर, बोपदरी, डाहोळ, सागपाणी , या गावांना उन्हाळ्यात फक्त ४ महिने बस येते त्यामुळे अन्य हंगामात   नागरिकांचे, रुग्णांचे, विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत असल्याचा प्रश्न येथील सरपंचांनी मांडला.
          यासभेला पंचांयत समितीच्या सभापती अर्चना भोरे, उपसभापती सीताराम पागी, माजी जि. प . अध्यक्ष सुरेखा थेतले, माजी सभापती ज्योती भोये, जि. प. सदस्य रतन बुधर, अशोक भोये, प.स. सदस्य मनू गावंढा, सुधाकर वळे,  तहसीलदार संतोष शिंदे, गट विकास अधिकारी राहुल म्हात्रे, सहाय्यक गट विकास अधिकारी अतुल पारसकर, तसेच सर्व अन्य  खात्यांचे अधिकारी वर्ग, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

comments

About Rajtantra

Scroll To Top