वार्ताहर
बोईसर, दि. ०९ : आठवड्यापूर्वीच बोईसर एमआयडिसीतील रासायनिक सांडपाण्यामुळे नवापूर खाडीतील मासे मृत पावलायचा प्रकार घडला असताना आज पुन्हा याच खाडीतील हजारप मासे मृत पावल्याने येथील ग्रामस्थ सॅन तप्त झाले आहेत. या संतप्त ग्रामस्थांनी हे मृत मासे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयात व रासायनिक सांडपाणी शुद्धीकरण केंद्राच्या कार्यालयामध्ये टाकून या कार्यालयाच्या कारभाराचा निषेध व्यक्त केला आहे.
तारापूर एमआयडिसीतील हजारो कारखान्यांमधून निर्माण होणाऱ्या रासायनिक सांडपाण्यामुळे शुद्धीकरण करण्यासाठी येथे २५ एमएलडी क्षमतेचे दूषित पाणी प्रक्रिया केंद्र कार्यरत आहे. मात्र संपूर्ण एमआयडीसीतुन ५० एमएलडी पेक्षा जास्त रासायनिक सांडपाणी निर्माण होत असल्याने मोठ्या प्रमाणावर हे सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता सार्वजनिक नाल्यांद्वारे आसपासच्या खाडींमध्ये मिसळत आहे. परिणामी नवापूर, दांडी व सालवड या खाडीतील मासे मृत झाल्याचे अनेक वेळा समोर आले आहे. नुकतेच २ एप्रिल रोजी या रासायनिक सांडपाण्यामुळे नवापूर खाडीत मासे मृत पावल्याचे पुढे आले आहे. यावेळी प्रदूषण नियंत्रण मंडळ व रासायनिक सांडपाणी शुद्धीकरण केंद्राच्या अधिकाऱ्यांनी खाडीतील दूषित पाण्याचे नमुने गोळा करून संबंधितांवर कारवाईचे तसेच यावर उपाय योजना करण्याचे आश्वसन दिले होते. मात्र आठवड्याभरातच पुन्हा असाच प्रकार घडला असून नवापूर खाडीकिनारी मृत माशांचा खच आढळून आला आहे. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी नेहमीप्रमाणे घटनास्थळी भेट देऊन खाडीतील पाण्याची तपासणी केली असता त्यात लालसर रासायनिक सांडपाणी आढळून आले, मात्र हे अधिकारी केवळ मृत मासे व दूषित पाण्याचे नमुने गोळा करण्यापलीकडे कोणतीही कारवाई करत नसल्यामुळे आज संतापलेल्या येथील ग्रामस्थांनी मृत पावलेल्या बोई जातीचे ३० ते ३५ किलो मासे गोळा करून ते प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयात व रासायनिक सांडपाणी शुद्धीकरण केंद्रामध्ये आणून टाकले व कार्यालयाच्या कारभाराचा निषेध व्यक्त केला. दरम्यान, याप्रकरणी संबंधितांवर कारवाई तसेच योग्य त्या उपाययोजना न केल्यास ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
You are here: Home » ताज्या बातम्या » बोईसर : रासायनिक सांडपाण्यामुळे नवापूर खाडीत पूण हा मृत माशांचा खच