दिनांक 16 January 2019 वेळ 3:17 PM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » ‘प्लास्टिक बंदी’ अमलबजावणीचा  भार सफाई कर्मचाऱ्यांवर 

‘प्लास्टिक बंदी’ अमलबजावणीचा  भार सफाई कर्मचाऱ्यांवर 

Rajtantra_EPAPER_090418_1_070410प्रतिनिधी
          वाडा, दि. ७ : राज्यसरकारने काही दिवसांपूर्वी प्लास्टिक बंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतरही या निर्णयाच्या अमलबजावणीबाबत येथील नगरपंचायत प्रशासन उदासीन असून यासंदर्भात दैनिक राजतंत्रमध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर जागे झालेल्या प्रशासनाने पदाधिकारी व अधिकाऱ्यांना दूर ठेवत  सफाई कर्मचाऱ्यांना जनजागृती फेरी काढायला लावून  जणू प्लास्टिक बंदी निर्णयाच्या अमलबजावणीचा भार सफाई कर्मचाऱ्यांच्याच खांद्यावर दिल्याचे दिसत आहे. 
              राज्यसरकारने प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतल्यानंतर या निर्णयाची वाडा नगर पंचायतीच्या माध्यमातून तातडीने अमलबजावणी होणे आवश्यक होते. मात्र नगर पंचायत पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या उदासिनतेमुळे वाडा शहरातील व्यापारी, दुकानदार व नागरिक सर्रासपणे प्लास्टिक पिशवीचा वापर करत होते. यासंदर्भात दैनिक राजतंत्रने शुक्रवारी ( दि. ६ )  वाड्यात प्लास्टिक पिशवी बंदी बासनात ? ह्या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर जागे झालेल्या प्रशासनाने शनिवारी ( दि. ७ ) प्लास्टिक बंदी निर्णयाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी म्हणून  सफाई कर्मचाऱ्यांना संपूर्ण शहरातून जनजागृती फेरी काढायला लावली. ह्या कर्मचाऱ्यांनी प्लास्टिक बंदीचे संदेश देणारे फलक हाती घेत घोषणा देत शहरातून फेरी काढली.
             या निर्णयाच्या अमलबजावणीची जबाबदारी नगर पंचायत पदाधिकारी व प्रशासनाची असताना, जनजागृती फेरीकडे नगराध्यक्ष गीतांजली कोलेकर, उपनगराध्यक्ष ऊर्मिला पाटील, मुख्याधिकारी विठ्ठल गोसावी व अन्य नगरसेवकांनी सपशेल पाठ फिरवत प्लास्टिक बंदीच्या अमलबजावणीची धुरा सफाई कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर दिल्याने पदाधिकारी व अधिकाऱ्यांची  उदासिनताच समोर आली आहे. गेल्या अनेक वर्षापासून प्लास्टिक पिशवीची सवय लागलेल्या समाजात अधिक जनजागृती करण्यात पदाधिकारी व अधिकाऱ्यांची भूमिका महत्वाची आहे. सफाई कर्मचाऱ्यांसोबतच ह्या पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी जनजागृती फेरीत सहभाग घेतला असता तर अधिक प्रभावशाली ठरले असते. मात्र प्लास्टिक बंदी अमलबजावणीबाबत केवळ सोपस्कार उरकू पाहणाऱ्या नगरपंचायतीने सफाई कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर हे ओझे दिल्याचे बोलले जात आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top