दिनांक 16 January 2019 वेळ 3:13 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » मध्यवैतरणा जलाशयात “पुन्हा” सापडले स्री व पुरूषाचे प्रेत

मध्यवैतरणा जलाशयात “पुन्हा” सापडले स्री व पुरूषाचे प्रेत

जलाशय बनला शवाशय; जीवन सुरक्षा वाऱ्यावर

Madhy Vaitaranaदीपक गायकवाड/RAJTANTRA MEDIA

खोडाळा, दि. ९: पालघर जिल्ह्याच्या मोखाडा तालुक्यातील कोचाळा सरहद्दीत असलेल्या मुंबई शहराला पाणी पुरवणाऱ्या मध्यवैतरणा जलाशयात ५० ते ५५ वयोगटातील स्री व पुरूषाचे अशी २ प्रेते आढळल्याने खळबळ माजली आहे. फेब्रूवारी मध्येही अशाच प्रकारे एका पुरूषाचे प्रेत जलाशयात सापडले होते. यामुळे जलाशयाचा उपयोग खून करुन मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी होतो कि काय? अशा शंका जोर धरु लागल्या आहेत. यामुळेच जलाशयाबरोबरच जनतेच्या जिवीताच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

काल (८ एप्रिल) मध्यवैतरणा पुलाजवळ खोडाळा मार्गाकडे एकमेकांच्या मिठीत तरंगत्या अवस्थेत ही प्रेते निदर्शनास आली. याआधी ६ फेब्रूवारी रोजी ३० ते ३५ वर्षे वयोगटातील अनोळखी इसमाचे प्रेत तरंगतांना आढळले होते. या दोन्हीही घटनेतील मृत इसमांची ओळख पटलेली नाही. काल सापडलेली दोन्ही प्रेते जिर्ण अवस्थेत असल्याने त्यांची ओळख पटवणे अवघड ठरले आहे. मयत स्री च्या अंगावर काळ्या रंगाचे ब्लाऊज तर बदामी रंगाचे लाल काठाचे काष्टी पातळ असून पुरूषाच्या अंगावर फुल हाताचा सफेद शर्ट व पट्ट्यांची अंडरपैंट आहे. या वर्णनाचे कोणी महिला व पुरूष बेपत्ता असल्यास मोखाडा पोलीसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस निरिक्षक प्रकाश सोनवणे यांनी केलेले आहे.

दरम्यान मोखाडा तालुक्यातील मौजे काष्ठी येथील एक महिला व एक पुरूष बेपत्ता असून तेथील बेपत्ता व्यक्तिंच्या नातेवाईकांना मृत व्यक्तिंची ओळख पटविण्यासाठी बोलावण्यांत आले असल्याचे खोडाळा पोलीस दुरक्षेत्राकडून सांगण्यांत आले आहे. तथापी मृत इसमाची ओळख न पटल्याने त्याची डीएनए चाचणी करण्यात येणार असल्याची माहिती मोखाडा पोलीसांनी दिली आहे.

या परिसरात सुरक्षा चौक्यांची व्यवस्था असावी अशी २०१२ पासून मागणी केली जात आहे. परंतू मुंबई महानगर पालीका, सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडून याबाबत कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. मुंबई शहर आणि परिसराला पाणीपुरवठा करणारा हा महत्वाकांक्षी प्रकल्प मोखाड्यातील कोचाळा येथे २०१२ मध्ये साकार झालेला आहे. या प्रकल्पावर रहदारी साठी आशीया खंडातील सर्वाधीक उंचीचा व लांबीचा पुल उभारण्यांत आलेला आहे. त्यामूळे हा पुल आणि त्याखाली पसरलेले पाणी पर्यटकांचे आकर्षण ठरलेले असले
तरी पर्यटक, पादचारी आणि वाहनांच्या सुरक्षेच्या दृष्टीने येथे कोणतीही उपाययोजना करण्याची खबरदारी घेण्यांत आलेली नाही. आता तरी येथे दुतर्फा सुरक्षा चौक्या उभारणे, सुचना फलक लावणे, रेडीयम लावणे, पथदिवे लावणे तसेच आवश्यक त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावणे ही कामे मार्गी लागतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top