दिनांक 21 May 2019 वेळ 12:51 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » ताज्या बातम्या » वाड्यात प्लास्टिक पिशवी बंदी बासनात ? नगर पंचायत प्रशासनाकडून शासनाच्या आदेशाची पायमल्ली

वाड्यात प्लास्टिक पिशवी बंदी बासनात ? नगर पंचायत प्रशासनाकडून शासनाच्या आदेशाची पायमल्ली

LOGO 4 Onlineप्रतिनिधी
वाडा, दि. ५ : राज्य सरकारने संपूर्ण राज्यात प्लास्टिक पिशवी बंदीचा निर्णय घेतला असतानाच प्लास्टिक पिशवी वापरणाऱ्यांना दंड आकारण्याचे निर्देशही देण्यात आलेले असूनही वाडा नगर पंचायत प्रशासनाच्यावतीने प्लास्टिक बंदीच्याबाबतीत कोणत्याही प्रकारची उपाययोजना आजवर केलेली नाही.   प्लास्टिक पिशवी बंदी बाबतचे फलक अथवा जनजागृतीद्वारे जनतेला त्याबाबतचे आवाहन करण्याचे साधे सोपस्कारही केले नसल्याने शासनाच्या आदेशाची पायमल्ली करत प्लास्टिक बंदीचा  निर्णयच नगर पंचायत प्रशासनाने बासनात गुंडाळला कि काय? अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. 
           वाडा शहराची दिवसेंदिवस वाढत चाललेली लोकसंख्या, नव्याने विस्तारणारी नगरे, त्यामुळे निर्माण होणाऱ्या घनकचऱ्याची समस्या गंभीर असून शहराच्या डंपींग ग्राउंडचा प्रश्नही नगर पंचायतीसमोर आ वासून उभा आहे. प्लास्टिक कचऱ्यामुळे घनकचरा हाताळण्यात अडचणी निर्माण होत असून त्यापासून विविध समस्यात अधिक भर पडत आहे. हा अविघटनशील कचरा उघड्यावर व घनकचरा विल्हेवाटीच्या ठिकाणी जाळल्याने मानव व प्राण्यांमध्ये विविध आजार निर्माण होतात. त्यामुळे शासनाने प्लास्टिक बंदीचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.   या निर्णयामुळे घनकचरा निर्मूलनासाठी खूपच मदत होणार असल्याने या निर्णयाची काटेकोर व कठोर अमंल बजावणी होणे गरजेचे आहे. परंतु नगर पंचायत प्रशासनाला याचे गांभीर्यच नसल्याचे दिसत असून याबाबतीत कुठलेही ठोस पाऊल उचलले जात नसल्याने ही समस्या अधिक वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
         शासन निर्णयानंतर नगर पंचायत प्रशासनाने वास्तविक जनजागृती करण्यासाठी प्रयत्न करावयास हवे होते. मात्र प्रशासनाच्या इच्छाशक्ती अभावी शहरातील प्लास्टिक पिशवी बंदी बाबत कार्यवाही होतांना दिसत नसल्याचे उघड होत आहे. त्यामुळे नगरपंचायत प्रशासन प्लास्टिक बंदीबाबत इतके उदासीन का असा सवाल निर्माण होत आहे. वाडा शहराची लोकसंख्या सुमारे ४० हजारांहून अधिक आहे. येथील बाजारपेठ मोठी आहे. त्यामुळे प्लास्टिक पिशवीचा वापर मोठ्याप्रमाणावर होत असतो.  हे लक्षात घेऊन नगर पंचांयत प्रशासनाने अधिक गांभीर्याने ह्या समस्येकडे पहायला हवे. मात्र पदाधिकारी व प्रशासनाच्या अनास्थेपायी हा प्लास्टिक बंदीचा निर्णय बासनातच गुंडाळला गेला असल्याचे दिसत आहे.
शासनाच्या निर्णयानुसार शहरात संपूर्ण प्लास्टिक पिशवी बंद
करणारच आहोत. एक -दोन दिवसात आम्ही सर्व बाजारपेठेत  
फिरून व्यापारी व छोटे – मोठ्या  दुकानदारांना शासनाच्या
निर्णयाबाबतीत सूचना देत आवाहन करणार आहोत. अधिक
जनजागृतीकरिता काही प्रमाणात कापडी पिशव्यांचेही 
वाटप करणार आहोत. या निर्णयाची कडक अमलबजावणी करु. 
                                            – गीतांजली कोलेकर, नगराध्यक्षा,
                                                                   वाडा नगर पंचायत.
प्लास्टिक बंदी बाबत नगर पंचायत कडून एकदा दवंडी देवून व्यापारी
व नागरिकांना सूचना देण्यात आल्या आहेत . पुन्हा एकदा दवंडी देवून
सक्त सूचना देण्यात येतील.   त्यानंतर मात्र  नगर पंचायतीद्वारे कठोर
कायदेशीर कारवाई केली जाईल. 
                                                           –  विठ्ठल गोसावी  मुख्याधिकारी,
                                                                              नगर पंचायत, वाडा
महाराष्ट्र शासनाने घेतलेला प्लास्टिक बंदी बाबतचा निर्णय निश्चितच
स्वागतार्ह आहे. मुख्याधिकारी यांच्याकडे दोन दोन कार्यालयांचा पदभार
असल्याने त्यांना निर्णय घेण्यास विलंब होत असावा. वाडा नगर
पंचायतीच्या सन्माननीय नगराध्यक्षांनी  इच्छाशक्ती दाखवत प्लास्टिक
बंदीबाबत  निर्णायक भूमिका घ्यायला हवी. 
                                                                    –  संदीप पवार, नगरसेवक,  
                                                                               नगर पंचायत, वाडा

comments

About Rajtantra

Scroll To Top