रासायनिक सांडपाण्यामुळे नवापूर खाडीतील मासे मृत्यूमुखी

0
180

BOISAR RASAYNIK SANDPANIवार्ताहर

         बोईसर, दि. 02 : तारापूर औद्यागिक वसाहतीतून (एमआयडीसी) निर्माण होणारे रासायनिक सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट नाल्यांद्वारे खाडीत सोडले जात असल्याने या रासायनिक सांडपाण्यामुळे पुन्हा एकदा नवापूर खाडीतील मासे मृत्यूमुखी पडल्याची घटना घडली आहे. यावेळी संतप्त ग्रामस्थांनी नियंत्रण मंडळाचे अधिकारी व सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राच्या (सीईटीपी) अधिकार्‍यांना घटनास्थळी बोलावून जाब विचारला.

तारापूर एमआयडीसीमध्ये हजारो कारखाने कार्यरत आहेत. या करखान्यामधून निर्माण होणार्‍या रासायनिक सांडपाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठी येथे 25 एमलडी क्षमतेचे दूषित पाणी प्रक्रिया केंद्र कार्यरत आहे. मात्र संपुर्ण एमआयडीसीतून 50 एमएलडीपेक्षा जास्त रासायनिक सांडपाणी निर्माण होत असल्याने मोठ्या प्रमाणावर हे सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता सार्वजनिक नाल्यांद्वारे आसपासच्या खाडीमध्ये मिसळत आहे. परिणामी नवापूर, दांडी व सालवड या खाडीतील मासे मृत झाल्याचे अनेकवेळा समोर आले आहे. आज पुन्हा एकदा नवापूर खाडीतील मासे मृत्यूमुखी पडल्याचा प्रकार समोर आल्यांनतर संतप्त ग्रामस्थांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी अजित पाटील आणि सीईटीपीचे अधिकारी जाधव यांना घटनास्थळी बोलावून जाब विचारला. यावेळी नवापूर खाडी दुषित होण्यास कारण ठरणार्‍या नाल्यांना अडवून खाडीचे प्रदुषण थांबविण्यास उपाययोजना करणार असल्याचे आश्वासन जाधव यांनी ग्रामस्थांना दिले.

Print Friendly, PDF & Email

comments