दिनांक 22 September 2019 वेळ 4:53 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » ताज्या बातम्या » बोईसरमधील कचऱ्याचा प्रश्न ऐरणीवर

बोईसरमधील कचऱ्याचा प्रश्न ऐरणीवर

LOGO 4 Onlineबोईसर, दि. २१ : स्वच्छ व सुंदर शहर कोणाला नकोय. मात्र वाढत्या नागरिकरणातून निर्माण होणारे प्रश्न सोडविणे ग्रामपंचायतसारख्या मर्यादित अधिकार, अपूरा निधी असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आवाक्याबाहेरचे बनले आहेत. त्यामुळे  बोईसर व त्या लगतच्या  परिसरातील   कचऱ्याचा प्रश्न  गहन बनला आहे. या परिसरात कचरा टाकण्यासाठी डंपींग ग्राउंड नसल्याने कचरा नेमका टाकावा कुठे? यावरून परिसरातील ग्रामपंचायतींचे आपसात वाद उभे ठाकलेत. त्यामुळे कचऱ्याच्या विल्हेवाटीचा प्रश्न चांगलाच ऐरणीवर आलाय. मात्र प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने कचऱ्याची समस्या अधिक जटिल बनली आहे. त्यातच कचरा आपल्या  हद्दीत नको म्हणून ग्रामपंचायतींमध्ये आपसात संघर्ष सुरु  झाल्याने बोईसरकरांना मोकळा श्वास कधी घेता येईल? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
            सद्यस्थितीत बोईसर शहराचे झपाट्याने नागरिकरण वाढत आहे. त्यामुळे शहरात वास्तव्य करणारी  लोकसंख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. वाढत्या नागरिकरणामुळे येथे मोठ्याप्रमाणावर नागरी समस्या निर्माण होताहेत. पाणीपुरवठा, सार्वजनिक मल:निसारण व्यवस्था, डंपींग ग्राउंड, रोजचा निर्माण होणारा कचरा,  ह्या नागरी समस्या सोडविणे ग्रामपंचायतीच्या आवाक्याबाहेरचे आहे. बोईसर सारख्या शहरात निर्माण होणारा कचरा डंपींग ग्राउंड नसल्याने नेमका टाकावा कुठे हा प्रश्न ग्रामपंचायतीपुढे  उभा राहिला आहेत. बोईसर शहरालगत सर्वात मोठी तारापूर एमआयडीसी आहे. तर दुसरीकडे तारापूर अणुशक्ती केंद्र आहे. त्यामुळे ह्या औद्योगिक पट्ट्यात रोजगाराच्या निमित्ताने वेगवेगळ्या प्रांतातून लोक बोईसर येथे  स्थायिक झाले आहेत .  त्याचप्रमाणे बोईसर हे रेल्वे स्टेशन असल्याने व पालघर जिल्हा झाल्याने अनेक सरकारी कार्यालयेही पालघर व  बोईसरमध्ये येत असल्याने सरकारी नोकरवर्ग देखील बोईसर ,पालघर मध्ये राहणे पसंत करतो . बोईसर हे शैक्षणिकदृष्ट्या देखील प्रगत असल्याने येथे राहण्याला शासकीय कर्मचारी, कामगारांसह नागरिक पसंती देत असल्याने बोईसरची लोकसंख्या गेल्या काही वर्षात झपाट्याने वाढली आहे.
          त्याचप्रमाणे तारापूर एमआयडीसी ही बोईसर , सालवड, पास्थल ,कोळवडे ,पाम टेम्भी, कुंभवली ,सरावली ह्या गावालगत असल्याने या गावांमध्येदेखील गृहसंकुले वाढून प्रत्येक गावाची लोकसंख्य वाढत गेली आहे.  मात्र एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या घरातून निघालेला ओल्या  व सुक्या कचऱ्याची  विल्हेवाट कशी लावावी. हा प्रश्न सर्वच ग्रामपंचायतींसमोर आहे. बोईसर परिसरात दिवसेंदिवस लोकवस्तीे  वाढत  असल्याने कचऱ्याच्या समस्येत भर पडत आहे.  बोईसरमध्ये दररोज  मोठी बाजारपेठ भरत असल्याने  रस्त्याच्या कडेला जागोजागी कचरा पहावयास मिळतो. ओल्या कचऱ्याबाबतीत हा कचरा वेळेत उचलण्यात ग्रामपंचायतीला अपयश येते. त्यामुळे दुर्गंधीचा सामना करावा लागतोय.   अनेक ठिकाणी सुका कचरा  जळला जातो. मात्र त्यात प्लास्टिकचे प्रमाण अधिक असल्याने प्रदूषण देखील मोठ्या प्रमाणात होते. त्याचा त्रास देखील मानवीआरोग्यावर होत आहे.
त्याचप्रमाणे तारापूर  एमआयडीसी  जवळील सालवड, ,पास्थल ग्रामपंचायतींच्या हद्दीमध्ये असलेला  कचरा हा एमआयडीसीच्या रस्त्याच्या कडेला टाकला जातो .त्यामुळे या भागात देखील कचऱ्याचे ढिगारे पहायला मिळतात. त्यामुळे या भागात देखील घाणीचे साम्राज्य दिसून येते . गेले काही वर्ष  बोईसरमधील कचरा हा कोळवडे गावाच्या हद्दीत  टाकला जात असे,  मात्र कोळवडेतील नागरिकांनी  कचरा टाकण्यास मनाई केल्याने बोईसरचा कचऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून कचऱ्याचा प्रश्न ग्रामपंचायतीसह नागरिकांचीही डोकेदुखी बनला आहे.
एमआयडीसीकडे भूखंडाची मागणी
        कचऱ्याचा प्रश्न  सुटावा याकरिता आठ ग्रामपंचयतमधील नागरिकांनी एकत्रितपणे डंपींग ग्राउंडकरिता  एमआयडीसी प्रशासनाकडे भूखंडाची मागणी केली आहे. त्यासाठी एमआयडीसी  कार्यलया समोर  निदर्शने देखील केली. मात्र त्याकडे एमआयडीसी प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने हा प्रश्न आजपर्यंत सुटू शकलेला नाही. बोईसर,  सरावली ,पास्थल ,साळवड , सरावली ,पाम टेम्भी , कोळवडे  या ग्रामपंचयतींनी एकत्रितपणे  घनकचरा व्यवस्थापन कमिटी स्थापन केली असून  त्यामाध्यमातून अनेकदा ह्या  कमिटीने तारापूर एमआयडीसीकडे भूखंडाची मागणी केली. त्याला एमआयडीसी प्रशासनाने वाटाण्याच्या अक्षदा लावल्या आहेत. त्याचप्रमाणे पालघरच्या  जिल्हाधिकाऱ्याकडेही ह्या समितीने आपले  गाऱ्हाणे मांडले, मात्र जिल्हाधिकाऱ्यांनीही कचऱ्याचा  प्रश्न  प्रत्येक ग्रामपंचायतीने  आपल्या स्तरावर सोडवावा असा निर्णय दिल्याने येथील नागरिक हतबल झाले आहेत. दरम्यान ह्या प्रश्नासंदर्भात पालकमंत्री विष्णू सवरा यांच्याकडेही येथील नागरिकांनी गाऱ्हाणे मांडले होते. त्यावेळी मंत्री सवरांनी तातडीने हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन  दिले. त्याला तीन महिने उलटून गेले तरीही शासन स्तरावर कोणतीही पावले उचलली गेली नाहीत. त्यामुळे बोईसरकरांची कचराकोंडी कायम असून त्यातून उद्भवणाऱ्या आरोग्याच्या समस्यांचा सामना नागरिकांना करावा लागतोय.
मुख्यमंत्री व पालकमंत्री यांच्याकडे  बोईसरच्या  कचऱ्याचा प्रश्न सुटावा म्हणून अर्ज विनंत्या केल्या आहेत. अनेक भेटी घेतल्या आहेत. परंतु जोपर्यंत कचऱ्याची समस्या सोडविण्यासाठी बोईसर परिसरात मोठा प्रोजेक्ट्स  होत नाही तोपर्यंत कचऱ्याची समस्या सुटू शकणार नाही.   आम्ही आमच्या स्तरावर प्रयत्न  करत आहोत. या कचऱ्यामुळे नागरिकांच्या  आरोग्यावर विपरीत परिणाम होतील.
नीलम संखे,  
माजी उपसरपंच व  शिवसेना तालुका प्रमुख 
राज्यसरकार व एमआयडीसी कचऱ्याच्या प्रश्नावर सकारात्मक भूमिका घ्यायला हवी.  सरकारने सरकारी जमिनींवर असलेले  अतिक्रमण काढून कचरा व्यवस्थापनाकरिता जागा उपलब्ध करून द्यावी.  अन्यथा ह्या विरोधात  जनआंदोलन उभारावे लागेल.
संजय पाटील-  
अध्यक्ष, शिवशक्ती सामाजिक संघटना 
 
पावसाळ्या पूर्वी कचऱ्याचा प्रश्न सुटला नाही तर आरोग्याची समस्या गंभीर बनेल.  ग्रामपंचायत कचऱ्याचा प्रश्न सुटावा म्हणून प्रयत्नशील आहे. शासनानेही तातडीने जागा उपलब्ध करून द्यावी. त्याशिवाय कचऱ्याच्या विल्हेवाटीचा प्रश्न सुटणार नाही.
राजेश करवीर,
उपसरपंच, ग्रामपंचायत बोईसर

comments

About Rajtantra

Scroll To Top