दिनांक 19 June 2019 वेळ 8:28 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » ताज्या बातम्या » वावटळीमुळे शाळेचे छप्पर कोसळले ; सुदैवाने विद्यार्थी बचावले

वावटळीमुळे शाळेचे छप्पर कोसळले ; सुदैवाने विद्यार्थी बचावले

20180321_130755प्रतिनिधी
वाडा, दि. २१ : येथील सोनारपाडा ह्या  जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे छप्पर हवेच्या जोरदार वावटळीत लोखंडी कैचीसह  उन्मळून कोसळले गेल्याने शाळेचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे , मात्र ह्या घटनेच्या काही क्षण आधी शाळा सुटण्याच्या सुमारास विद्यार्थी व शिक्षक वर्गाबाहेर पडल्याने बचावले.
           वाडा शहराच्या हद्दीतील सोनारपाडा ह्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या दोन इमारती आहेत. शाळेच्या मुख्य इमारतीपासून सुमारे दोनशे मीटर अंतरावर ही इमारत आहे. बुधवारी (दि. २१ ) करसिद्ध धनगर हे शिक्षक आपल्या १५  विद्यार्थ्यांना घेऊन  नेहमीप्रमाणे ह्या वर्गात बसले होते. सध्या वाढत्या उन्हामुळे सकाळी शाळा भरविल्या जातात. त्यामुळे दुपारी शाळा सुटण्याच्या वेळे आधी शिक्षक धनगर हे सर्व विद्यार्थ्यांना एकत्रित सूचना देण्यासाठी दररोज काही मिनिटे आगोदर ह्या वर्गातून बाहेर पडून मुख्य  वर्गात जात असतात. नेहमीप्रमाणे आज  दुपारी १२ : २५ च्या सुमारास धनगर हे विद्यार्थ्यांना घेऊन वर्गाबाहेर पडले. इतक्यात हवेच्या आलेल्य जोरदार वावटळीची हवा शाळेत घुसल्याने काही क्षणात संपूर्ण छप्पर लोखंडी कैचीसह उन्मळून कोसळले. ही घटना विद्यार्थी व शिक्षक धनगर ह्यांच्या डोळ्यादेखत घडल्याने विद्यार्थी चांगलेच भेदरले होते. विद्यार्थी वर्गाबाहेर असल्याने आम्ही सुदैवाने थोडक्यात बचावलो. अन्यथा दुर्दैवी घटनेला सामोरे जावे लागले असते, असे शिक्षक धनगर यांनी सांगितले.
           या घटनेची माहिती मिळताच वाडा पंचायत समितीच्या सभापती अश्विनी शेळके यांनी तत्काळ ह्या शाळेला भेट देवून पहाणी केली. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी विजय बाराथे, तलाठी जे. बी. धोपटे,  शिक्षिका दिशा पाटील हे उपस्थित होते. यावेळी झालेल्या नुकसानीचा पंचनामा केल्या नंतर तातडीच्या इमारत दुरूस्तीचा प्रस्ताव  पंचायत समितीच्या बांधकाम विभागाकडे पाठवून   लवकरच विद्यार्थ्यांसाठी वर्ग  खुला  करून देणार असल्याचे शिक्षण विस्तार अधिकारी विजय बाराथे यांनी सांगितले.

शाळांच्या स्ट्रक्चरल ऑडिट म्हणजे फार्सच ! 

शहरातील वाडा नं. १ ह्या शाळेतील लोखंडी गेट कोसळून तन्वी धानवा ह्या विद्यार्थीनीला आपला जीव गमवावा लागला होता. तर दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले होते. ही घटना डिसेंबर २०१६ मध्ये घडली होती. ह्या घटनेनंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांनी जिल्ह्यातील शाळांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे त्यावेळी नेमके कशाप्रकारे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले असावे, यासंदर्भात ह्या घटनेनंतर संशय व्यक्त केला जात आहे. स्ट्रक्चरल ऑडीट नंतर जिल्हा परिषदेने शेकडो शाळांची दुरुस्तीची कामे हाती घेतली आहेत. मात्र ही दुरुस्तीची कामे हाती घेताना जिथे खऱ्या अर्थाने दुरुस्तीची आवश्यकता आहे त्या शाळांची दुरुस्तीच  झाली नाही, हे सोनारपाडा शाळेच्या घटनेवरून स्पष्ट होत आहे.  त्यामुळे  स्ट्रक्चरल ऑडिट हा केवळ फार्सच ठरल्याचे दिसत आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top