दिनांक 30 May 2020 वेळ 7:45 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » खोडाळा येथे सशस्त्र दरोडा , पिस्तूलाचा धाक दाखवून अडिच लाखावर डल्ला

खोडाळा येथे सशस्त्र दरोडा , पिस्तूलाचा धाक दाखवून अडिच लाखावर डल्ला

दीपक गायकवाड : 
मोखाडा, दि. 09 : तालुक्यातील खोडाळा येथील व्यापारी चंद्रकांत किर्वे यांच्या घरात घुसून व त्यांच्यावर पिस्तूल रोखून तिघा दरोडेखोरांनी सोने व रोख रक्कमेसह 2 लाख 60 हजारांचा ऐवज लुटून पोबारा केल्याची घटना घडली आहे. यावेळी दरोडेखोरांना विरोध करताना किर्वे यांच्या पत्नी जखमी झाल्या आहेत. दरम्यान, या घटनेने मोखाडा तालुक्यात एकच खळबळ उडाली असून मध्यवस्तीत रात्री 11 वाजेच्या दरम्यान घडलेल्या या घटनेने तालुक्यातील सर्वच स्तरातील व्यापारी भयभीत झाले आहेत.
काल, गुरुवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास नातेवाईकांच्या ओळखीचा बहाणा करीत तिन दरोडेखोरांनी व्यापारी चंद्रकांत किर्वे यांच्या घरात प्रवेश केला. घरात घुसताच दोघा दरोडेखोरांनी किर्वे यांच्यावर दोन्ही बाजूंनी पिस्तूल रोखले आणि घरातील सोने तसेच किंमती वस्तू आणि रोक रक्कमेची मागणी केली. हा प्रकार सुरु असताना यास विरोध करण्यासाठी त्यांच्या पत्नी मनिषा पुढे आल्या असता तिसर्‍या दरोडेखोराने त्यांच्यावर चॉपरने वार करुन त्यांना कोपर्‍यात ढकलले, यात त्या किरकोळ जखमी झाल्याची माहिती पिडीत चंद्रकांत किर्वे यांनी दिली. त्यानंतर दरोडेखोरांनी घरातील कपाटाच्या चाव्या घेऊन सोन्याचे दागिने, 45 हजार रुपयांची रोख रक्कम व दोन मोबाईल असा एकुण सुमारे 2 लाख 60 हजाराहून अधिक रकमेचा ऐवज लुटून पोबारा केला आहे. तर घरातून जाताना या तिनही दरोडेखोरांनी या घटनेची कुठेही वाच्यता केल्यास पुन्हा परत येऊन गोळ्या घालण्याची धमकी दिली असल्याचे किर्वे यांनी सांगितले आहे. तसेच आपण गावातील धनाढ्य व्यापार्‍यांची माहिती घेतली असल्याची धमकीही या दरोडेखोरांनी किर्वे यांना दिली आहे.
या घटनेनंतर किर्वे यांनी रात्री 11:30 वाजता खोडाळा पोलीस ठाणे गाठले. मात्र, तेथे कोणताही पोलीस कर्मचारी हजर नसल्याचे आढळले. त्यानंतर एका सामाजिक कार्यकर्त्याने या घटनेची माहिती मोखाडा पोलीसांना दूरध्वनीवरून दिली. घटनेची माहिती मिळताच मोखाडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश सोनवणे यांनी आपल्या कर्मचार्‍यांसह तातडीने घटनास्थळी भेट दिली आहे. किर्वे यांच्या तक्रारीनंतर याप्रकरणी 3 जणांविरोधात भारतीय दंड विधान संहितेचे कलम 394, 449, 506, 34 सह भारतीय हत्यार कायदा कलम 3, 25(1) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर या घटनेनंतर मोखाडा पोलिसांनी दहा संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची किर्वे यांना प्रत्यक्ष बोलावून ओळख परेड केली. मात्र, यात दरोडेखोर नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मध्यवस्तीत, सर्वत्र लोकांची रेलचेल असताना, दरोड्याची घटना घडल्याने तसेच दरोडेखोरांनी व्यापार्‍यांची नावे सांगून पुन्हा दरोडा टाकण्याची धमकी दिल्याने, मोखाडा तालुक्यातील व्यापारी भयभीत झाले आहेत. त्यामुळे मोखाडा आणि खोडाळा या बाजारपेठांमध्ये रात्री पोलिसांची गस्त ठेवण्याची मागणी व्यापार्‍यांनी केली आहे. तर या घटनेचे तातडीने तपासकार्य सुरू केल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश सोनवणे यांनी दिली असुन पोलीस उपनिरिक्षक ए. एस. काळे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत. दरम्यान, सदरची घटना आमच्या कुटुंबाची संपूर्ण माहिती घेऊन नियोजन पूर्वक केली असल्याचा संशय किर्वे यांनी व्यक्त केला आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top