दिनांक 16 January 2019 वेळ 4:32 PM
Breaking News
You are here: Home » थोडक्यात महत्वाची बातमी » कॉंग्रेसच्या बैठकीत कार्यकर्त्यांची खदखद

कॉंग्रेसच्या बैठकीत कार्यकर्त्यांची खदखद

IMG-20180216-WA0109प्रतिनिधी

वाडा, दि. १६ : आगामी निवडणुकांना सामोरे जाताना पक्षाची संघटनात्मक बांधणी करून बुथनिहाय कमिट्या तयार करण्याच्या उद्देशाने वाडा तालुका कॉंग्रेस पक्षाची बैठक वाड्यात आयोजित करण्यात आली होती. ह्या बैठकीच्या माध्यमातून कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता कार्यकर्त्यांनी तालुक्यातील पदाधिकारी, प्रदेश कार्यकारिणीवरिल पदाधिकारी व पक्षश्रेष्ठींच्या विरोधात चांगलीच खदखद व्यक्त केली. त्यामुळे वाढलेल्या गोंधळामुळे ही बैठक आवरती घेण्यात आली.
         पालघर जिल्हा कॉंग्रेसच्यावतीने प्रत्येक तालुक्यात अशाप्रकारच्या बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत. वाड्यात शुक्रवारी ( दि. १६ ) तालुकाध्यक्ष दिलीप पाटील यांच्या डेपोत उभारलेल्या सभामंडपात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष केदार काळे हे होते. तर या बैठकीला प्रदेश सरचिटणीस विश्वनाथ पाटील, प्रदेश सचिव विजय पाटील हे उपस्थित होते.
          यावेळी कार्यकर्त्यांनी आपली मते मांडताना प्रत्येक निवडणुकीत तालुक्यात  कॉंग्रेस पक्षाचे मताधिक्य कमी होत असून पक्षाच्या अवनतीस पदाधिकारी जबाबदार असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला. निवडणुकीत कार्यकर्ता मरमर राबतो. मात्र शेवटच्या दिवशी पदाधिकारी विकले जातात असा थेट आरोप कॉंग्रेसचे युवा कार्यकर्ते राजेश चौधरी यांनी केला. ज्यांचा जनाधार नाही असे लोक पदावर बसविल्यानंतर पक्ष टिकणार कसा? असा सवाल चौधरींनी  उपस्थित केला. तर हे पदाधिकारी जनतेत कॉंग्रेस पक्ष वाढवण्यासाठी काय काम करतात याचा जाब त्यांना विचारा असे उपस्थित नेत्यांना त्यांनी सुनावले.
        तर डिसेंबर महिन्यात झालेल्या वाडा नगरपंचायत निवडणुकीत येथील कॉंग्रेसच्या नेत्यांनीच विरोधी पक्षांना मदत केल्याने आपल्यासहित कॉंग्रेसचे अनेक उमेदवार पराभूत झाल्याचा आरोप  सर्फराज धांगे ह्या पराभूत उमेदवाराने केला. तर नगरपंचायत निवडणुकीकरिता आलेला पक्षनिधी नेमका गेला कुठे याचीही चौकशी पक्ष नेतृत्वाने करावी अशी मागणी उपस्थित सर्वच कार्यकर्त्यांनी केली. त्यावर जिल्हाध्यक्ष काळे यांनी याबाबत स्वतंत्र बैठक घेऊ असे सांगत याविषयी  अधिक चर्चा न वाढवण्याची सूचना  केली. त्यावर  ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक नीलेश भोईर यांनी या प्रश्नावर चर्चा व्हायलाच  हवी अशी भूमिका घेत कार्यकर्ता निष्ठेने काम करतो, त्यांना पदाची अपेक्षा नाही आणि अशावेळी पदाधिकारी, तालुक्यातील प्रदेश पातळीवरील नेते विकले जात असतील तर कार्यकर्त्यांनी पक्षाचे काम करायचे कशाला? असा सवाल करत कार्यकर्त्यांच्या भावना समजून घ्या असे सांगितले. त्यानंतर अनेक कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांविरोधात आपली खदखद व्यक्त केली. मात्र त्यानंतर व्यक्तिगत आरोप – प्रत्यारोप होऊन गोंधळ वाढू  लागल्याने अखेर जिल्हाध्यक्ष केदार काळे यांनी ही बैठक आटोपती घेतली.

comments

About Rajtantra

Scroll To Top