दिनांक 23 February 2019 वेळ 8:06 PM
Breaking News
You are here: Home » संग्राह्य बातम्या » खासदार अ‍ॅड. चिंतामण वणगा यांचे निधन

खासदार अ‍ॅड. चिंतामण वणगा यांचे निधन

राजतंत्र न्यूज नेटवर्क

CHINTAMAN VANAGA NIDHANपालघर, दि. 30 : पालघर लोकसभा मतदार संघाचे खासदार अ‍ॅड. चिंतामण वणगा यांचे आज दिल्ली येथे हृदयविकाराच्या तिव्र धक्क्याने निधन झाले. ते 67 वर्षांचे होते. त्यांना राममनोहर लोहिया (दिल्ली) रुग्णालयात दाखल करून उपचार केले जात असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच जिल्ह्यामध्ये दुख:चे सावट पसरले. दिल्लीहुन त्यांचे पार्थिव विमानाने मुंबई येथे आणण्यात येणार असून अंत्यदर्शनसाठी उद्या (बुधवार, दिनांक 31 जानेवारी) सकाळी 7 ते 12 पर्यंत तलासरी येथे ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांचा अंत्यविधी तलासरी येथे होणार आहे.
35 वर्षांच्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीमध्ये वणगा हे निष्कलंक राहिले. स्वच्छ प्रतिमा व निस्पृह व्यक्तिमत्व यामुळे ते अजातशत्रू ठरले होते. मच्छीमारी करताना चुकून पाकिस्तानच्या हद्दीत घुसलेल्या आणि पाकिस्तानचे बंदीवान झालेल्या लोकांसाठी ते महाराष्ट्रासह गुजरातमध्ये देखील लोकप्रिय होते. सातत्याने पाठपुरावा करीत ते अशा लोकांची सुटका घडवून आणून त्यांना मायदेशी आणण्यात यशस्वी होत असत. माजी पंतप्रधान अटलबिहारी बाजपेयींसह अनेक ज्येष्ठ नेते वणगांना चिंतामणी या नावाने ओळखत असत. चिंतामणी या नावाचा दिल्ली दरबारात एक मोठा दबदबा आणि विश्वासार्हता होती.

पालकमंत्री तथा आदिवासी विकासमंत्री विष्णु सवरा यांची प्रतिक्रिया
वणगा साहेबांच्या व माझ्या राजकीय व सामाजिक जीवनाची सुरुवात एकत्र सुरु झाली. खांद्याला खांदा लावून आम्ही अनेक वर्ष संघर्ष करत इथपर्यंत पोहचलो मात्र आमची साथ अर्थवट सोडून आमचा साथीदार गेल्याचे आम्हाला अतीव दुःख आहे. पक्षाची भरून न येणारी हानी झाली असून पालघर जिल्ह्याची जनता पोरकी झाली आहे. ग्रामीण – दुर्गम भागातील जनतेच्या प्रश्‍नांसाठी सदैव जागरूक असणारा लोकप्रतिनिधी आपण गमावला असून आपल्यावर असणारे भावाचं छत्र हरपल्याची शोकाकुल प्रतिक्रिया राज्याचे आदिवासी विकास मंत्री व पालघरचे पालकमंत्री विष्णु सवरा यांनी व्यक्त केली आहे.

चिंतामण वणगा यांना मुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली
पालघरचे खासदार अ‍ॅड. चिंतामण वणगा यांच्या निधनाने आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी झटणारे ज्येष्ठ आणि समर्पित नेतृत्व हरपले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात, वनवासी कल्याण केंद्र आणि प्रगती प्रतिष्ठानच्या माध्यमातून आदिवासींच्या उन्नतीसाठी श्री. वणगा गेली अनेक वर्षे निष्ठेने कार्यरत होते. विधिमंडळ आणि संसदेमध्ये त्यांनी आदिवासी समुदायाच्या विविध प्रश्‍नांसाठी सातत्याने आवाज उठविला होता. अत्यंत साधे राहणीमान असलेल्या वणगा यांच्या निधनाने एक निस्पृह आणि ध्येयवादी व्यक्तिमत्त्व आपण गमावले आहे.

पालघर जिल्हा मराठी पत्रकार परिषदेची श्रद्धांजली

आजच्या जमान्यातील संत राजकारणी आपण गमावला आहे. राजकीय महत्वाकांक्षा नसताना सामाजिक जाणीवेच्या जोरावर पालघर जिल्हावासीयांच्या हृदयावर अधिराज्य करणारे आदर्श लोकप्रतिनिधी खासदार वणगांच्या जाण्याने जिल्ह्याचे भरुन न येणारे नुकसान झाले असल्याची प्रतिक्रिया पालघर जिल्हा मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष, तथा दैनिक राजतंत्रचे संपादक संजीव जोशी यांनी व्यक्त केली आहे.

पालघर जिल्हा परिषदेकडून श्रध्दांजली

पालघर लोकसभा मतदार संघाचे विद्यमान खासदार, सन्मानिय चिंतामणजी वनगा यांच्या आकस्मिक निधनाने कधीही न भरून निघणारी उणीव निर्माण झाली आहे. त्यांच्या कार्याची प्रेरणा व मार्गदर्शन अत्यंत उपयुक्त असून त्यांनी दाखविलेल्या मार्गाचा अवलंब करून प्रगत पालघरचे स्वप्न साकार करण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन. सामान्य जनतेविषयी त्यांची असलेली तळमळ, तळागाळातील लोकांशी त्यांचा असलेला संपर्क, अधिकारी वर्गाशी असलेला संबंध तसेच सकारात्मक विचारसरणी या सर्व बाबी खर्‍या अर्थाने त्यांना एक लोकनेता म्हणून आदर्श ठरवितात. त्यांच्या आत्म्यास चिरशांती मिळावी हि ईश्वर चरणी प्रार्थना. त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात संपूर्ण जिल्हा परिषद पालघर सहभागी आहे, अशी प्रतिक्रिया जिल्हा परिषद अध्यक्ष विजय खरपडे यांनी व्यक्त केली. तसेच पालघरचे लोकप्रिय खासदार आदरणीय चिंतामणजी वनगा यांच्या निधनाने अत्यंत दु:ख झाले. पालघर जिल्ह्याचे आधार स्तंभ असलेले वनगा साहेब सर्वांचेच मित्र होते. ते एक संवेदनशील नेते असून जनेतेच्या प्रश्‍नाबाबत जागरूकतेने कार्यशिल होते. तत्वनिष्ट, मीतभाषी, प्रामाणिक, निष्कलंक असा हा लोकनेता आज आपल्यातून निघून गेल्याने दु:ख अनावर झाले आहे. ईश्वर त्यांच्या कुटुंबियांना हे दु:ख सहन करण्यासाठी शक्ती देवो, अशी श्रद्धांजली उपाध्यक्ष निलेश गंधे यांनी वाहिली.

लढवय्या नेता

वैभव पालवे
पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अ‍ॅड. चिंतामण वनगा यांच्या निधनाने खर्‍याअर्थाने एका लढवय्या नेत्याचे पर्व संपले असेच म्हणावे लागेल. ठाणे – पालघर जिल्ह्यातील जनतेच्या जीवनमरणाच्या प्रश्‍नांवर कायम संघर्ष करणारा हा नेता काळाच्या पडद्याआड गेला. हे सर्वसामान्य जनतेला चटका लावणारे ठरले.
अत्यंत सामान्य कुटुंबात जन्माला येवून आपल्या कर्तृत्वाने त्यांनी राजकारण आपला वेगळा ठसा उमटवला. महाविद्यालयीन जीवनापासून ते समाजकार्याकडे ओढले गेले होते. वकिलीचे शिक्षण घेतल्यानंतर ते आदिवासी समाजाच्या प्रश्‍नांसाठीच आपली वकीली वापरू लागले. आपल्या वकिलीपेशाच्या माध्यमातून ते गोरगरिबांची सेवा करू लागले. यादरम्यानच ते राजकारणात सक्रीय झाले. भारतीय जनसंघाचे काम करू लागले. कम्युनिस्टांचा बालेकिल्ला असलेल्या तलासरी, डहाणू, जव्हार व मोखाडा सारख्या आदिवासी भागात त्यांनी जीव तळहातावर घेऊन जनसंघाचा विचार या भागात रुजवला. त्यावेळी अनेक हल्ले त्यांच्यावर झाले, मात्र ते डगमगले नाहीत. आपल्यातला लढाऊ बाणा त्यांनी या संघर्षाच्या काळातही कधी हरवू दिला नाही. या परिसरात जनसंघ व पुढे भारतीय जनता पक्ष रुजविण्यात व तो वाढविण्यात त्यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे.
भारतीय जनता पक्षाचे काम करताना त्यांनी येथील आदिवासी, शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांवर कायम आवाज उठविला. अनेक प्रश्‍नांवर त्यांनी आंदोलने उभारली. पाण्याचे प्रश्‍न, विविध धरणे, कुपोषण, जिल्हा विभाजन यासारख्या प्रश्‍नांवर त्यांनी टोकाचा संघर्ष केला. हे करताना त्यांनी आपल्या तत्वाशी कधी तडजोड केली नाही. राज्यात पहिल्यांदा 1995 ला शिवसेना – भाजप युतीचे सरकार सत्तेवर आले असतानाही जिल्हा विभाजन होत नाही. याने ते त्याकाळी प्रचंड व्यथित झाले होते. त्यावेळी तेदेखील खासदार होते. त्यामुळे सत्ता असूनही येथील जनतेला न्याय मिळत नाही. म्हणून ते पक्षाची सत्ता असताना जिल्हा विभाजनासाठी जव्हारमध्ये आमरण उपोषणाला बसले. त्यावेळी पक्षाच्या विरोधात भूमिका घेऊ नका असे त्यांना अनेक नेत्यांनी सूचविले. मात्र त्यांनी जनहितासाठी पक्षाच्या सरकार विरोधात ठाम भूमिका घेत आपले प्राण पणाला लावले. यातूनच त्यांची समाजाप्रती किती प्रामाणिक भूमिका होती हे दर्शवते. त्याचप्रमाणे ग्रामीण भागाच्या गतीमान विकासासाठी डहाणू-नाशिक रेल्वेच्या मागणीसाठी ते अखेरपर्यंत लढत राहिले.
राजकारणातील विजयाने ते कधी हरखून गेले नाहीत. तर पराभवाने कधी खचले नाहीत. सातत्याने सामान्यांच्या प्रश्‍नांवर लढत राहिले. येथील आदिवासी, शेतकरी गोरगरीब जनतेच्या जगण्याचे प्रश्‍न सुटावेत. विकासाच्या संधी आदिवासींच्या झोपडीपर्यंत याव्यात म्हणून ते सातत्याने लढत राहिले. त्यामुळे राजकारणात असताना-सत्तेच्या जवळ राहूनही त्यांच्यातील प्रामाणिकपणा निश्चल राहिला. सत्तेतून येणार्‍या अपप्रवृत्ती त्यांना कधी शिवल्या नाहीत. जनतेच्या प्रश्‍नांवर अविरत संघर्ष करणारा एक लढवय्या नेता हरपल्याने राज्याच्या राजकारणात निर्माण झालेली पोकळी न भरून येणारी आहे…!

कै. चिंतामण वणगा यांची कारकीर्द

चिंतामण वणगा यांचा जन्म तलासरी तालुक्यातील कवाडा येथे 1 जून 1950 रोजी झाला. त्यांनी कला शाखेतून पदवी घेऊन त्यानंतर वकिलीची पदवी घेतली. वकिलीच्या पेशातून जव्हारसारख्या ग्रामीण आदिवासी भागात गोरगरिबांसाठी न्याय मिळवून देण्याचे काम केले. वणगा 3 वेळा खासदार आणि 1 वेळा आमदार झाले. 11 व्या लोकसभेमध्ये 1996 साली ते सर्वप्रथम खासदार झाले. 1998 च्या 12 व्या लोकसभेसाठी झालेल्या मुदतपूर्व निवडणूकीत ते शंकर नम यांच्याकडून पराभूत झाले. त्यानंतर पुन्हा 1999 च्या 13 व्या लोकसभा निवडणूकीत वणगा विजयी झाले. 2004 व 2009 च्या लोकसभा निवडणूकीत ते अनुक्रमे काँग्रेसचे दामू शिंगडा आणि बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव यांच्याकडून पराभूत झाले. यानंतर त्यांनी 2009 साली विक्रमगड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली व आमदार झाले. 2014 सालच्या निवडणूकीत आमदार असतानाच पुन्हा लोकसभा निवडणूक लढविली व तिसर्‍यांदा खासदार झाले.
त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून राजकीय कारकीर्द सुरु केली. आजच्या राजकारणी प्रतिमेला ते अपवाद ठरले. 1982 ते 84 या काळात ते भाजपचे ठाणे जिल्हा सचिव होते. 1984 ते 86 त्यांनी भाजपच्या युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश सचिवपद सांभाळले. 1987 ते 1990 या काळात ते जव्हार तालुक्याचे अध्यक्ष झाले. 1990 ते 1995 या काळात ते ठाणे जिल्हा अध्यक्ष झाले. 1995 ते 97 मध्ये ते महाराष्ट्राचे आदिवासी आघाडी प्रमुख झाले. 1997 ते 1998 ते राष्ट्रीय कार्यकारीणीचे सचिव राहिले.
त्यांचा अनेक सामाजिक संघटनांशी संबंध राहिलेला आहे. ते जव्हार येथील प्रगती प्रतिष्ठानचे खजिनदार, तलासरीच्या वनवासी विकास प्रकल्पाचे उपाध्यक्ष, तसेच दादरा नगर हवेली सहकारी साखर कारखान्याचे संचालक होते. 1992 ते 1995 या काळात ते ठाणे जनता सहकारी बँक या अग्रगण्य बँकेचे संचालक होते.

 

comments

About Rajtantra

Scroll To Top