दिनांक 25 March 2019 वेळ 5:25 AM
Breaking News
You are here: Home » महान्यूज़ » डहाणूत विधी सेवा शिबिर संपन्न 4 हजारपेक्षा अधिक लोकांना लाभ

डहाणूत विधी सेवा शिबिर संपन्न 4 हजारपेक्षा अधिक लोकांना लाभ

VIDHI SEVA SHIBIRशिरीष कोकीळ

डहाणू दि. 30: शासनामार्फत चालवल्या जाणार्‍या विविध योजनांचे एका छताखाली लाभार्थ्यास प्रत्यक्ष व थेट लाभ मिळवून देण्यासाठी गरजु लोकांना योजनेशी जोडणारे शिबीर डहाणू तालुक्यात आयोजित करण्यात आले होते. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (दिल्ली), महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण (मुंबई), जिल्हा विधी सेवा प्राधिकरण ठाणे आणि डहाणू व तलासरी तालुका विधी सेवा समितीमार्फत आज नरेशवाडीच्या के. जे. सोमय्या माध्यमिक शाळा येथे हे शिबीर पार पडले. या शिबीराचा 4 हजारपेक्षा अधिक गरजूंनी लाभ घेतला.
शिबिराच्या उद्घाटनपर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण ठाणेचे डी. वाय. गौड होते. व्यासपीठावर डहाणूचे प्रथमवर्ग न्यायाधिश जे. आर. मुलाणी, ज्येष्ठ विधिज्ञ सी. एम. बोथरा, वकील संघटनेचे अध्यक्ष भरत माच्छी व सचिव राहूल कडू उपस्थित होते. वकील माच्छी यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर डहाणूचे तहसीलदार राहूल सारंग, तलासरीचे गटविकास अधिकारी राहूल धूम, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी गणेश खेडकर, तलासरीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. देशमुख, डहाणूचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गाडेकर, तालुका कृषी अधिकारी ईभाड, पालघर उप आयुक्त कामगार कार्यालयाचे आर. टी. चव्हाण, जिल्हा कौशल्य विकास अधिकारी एम. एच. संखे, एकात्मिक बाल विकास प्रकल्प संरक्षण अधिकारी संभाजी पवार, स्वयंसेवक शिलींद लहांगे यांनी आपापल्या विभागामार्फत चालविल्या जाणार्‍या विविध योजनांची व त्या योजना प्राप्त करुन घेण्यासाठी करावयाच्या कार्यवाहीची माहिती उपस्थितांना करुन दिली.
न्यायाधीश जे. आर. मुलाणी यांनी विधी सेवा प्राधिकरणाच्या विविध योजनांची माहिती उपस्थितांना करुन दिली तसेच गरजु आदिवासी नागरिकांना शासनामार्फत मोफत वकीलांची सेवा उपलब्ध असून याकामी कार्यरत असलेल्या वकीलांची त्यांनी उपस्थितांना ओळख करून दिली. त्यांनी उपस्थित लाभार्थ्यांशी प्रेमाने संवाद साधून कौटुंबिक नाते तयार केल्यामुळे आदिवासी बंधू भगिनींच्या चेहर्‍यावरील ताण कमी झाल्याचे दिसून आले. डी. वाय. गौड यांनी उपस्थितांना सर्व योजनांची नीट माहिती करून घेण्याची कळकळीची विनंती केली आणि कोणत्याही कार्यालयात न घाबरता प्रवेश करुन हक्काने आपले काम करून घ्यावे असे सांगितले. आपण सगळे एक असून मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सर्व शासकीय योजनांचा ताबडतोब लाभ आपल्याला मिळावा म्हणून आम्ही सर्व इथे आलो आहोत असे सांगून जास्तीजास्त लोकांनी या संधीचा फायदा करुन घेतला तरच कार्यक्रम यशस्वी झाला असे म्हणता येईल असे प्रतिपादन केले.
शाळेच्या इमारतीतील वर्गांमध्ये विविध विभागांची कार्यालये सुरू करण्यात आली होती. येथून जातीचे दाखले, रेशनकार्ड, रहिवासी दाखला, हयातीचा दाखला, जन्म दाखला, आधार कार्ड, सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे, विविध शासकीय आर्थिक लाभाच्या योजना लाभार्थिंना मिळवून देणे या व अशा अनेक योजनांचा लाभ लाभार्थ्यांना या शिबिराच्या माध्यमातून त्वरीत मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. डहाणू व तलासरी या दोन्ही तालुक्यातील लोक आवश्यक त्या कागदपत्रांसह मोठ्या प्रमाणात उपस्थित राहीले होते.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी डहाणूचे दिवाणी न्यायाधीश जे. आर. मुलाणी यांच्या मार्गदर्शनाखाली डहाणू व तलासरी तालुक्यातील विविध शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली. पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने कार्यक्रम शांततेत पार पडला. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण ठाणे येथील अधिक्षक जी. एस. हिरवे व त्यांचे सहकारी यांचे मोलाचे सहकार्य कर्मचार्‍यांना लाभले. डहाणू येथील जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रमेश शिर्के व त्यांचे सहकारी यांनी देखील आयोजनात विशेष सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डहाणू न्यायालयातील विधिज्ञ सौ. श्रुती कुलकर्णी यांनी केले.

comments

About Rajtantra

Scroll To Top