दिनांक 16 January 2019 वेळ 3:13 PM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात संवाद भाईजीसे कार्यक्रम संपन्न भविष्यासाठी जलसाक्षरता आणि जलउपयोग दक्षता वाढविणे गरजेचे -जलतज्ञ राजेंद्र सिंह

सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात संवाद भाईजीसे कार्यक्रम संपन्न भविष्यासाठी जलसाक्षरता आणि जलउपयोग दक्षता वाढविणे गरजेचे -जलतज्ञ राजेंद्र सिंह

DANDEKAR-SANVAD BHAIJISEपालघर, दि. 21 : पाणी वापराच्या संदर्भात आजवर कोणताही ठोस कायदा झाला नसून भारतातील नागरिकांनी जलसाक्षरता आणि जलउपयोग दक्षता वाढविली पाहीजे, तरच भावी काळ आपला असेल, असे प्रतिपादन भारताचे जलतज्ञ राजेंद्र सिंह यांनी यावेळी काढले. सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळीच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त जलप्रबोधन होण्याकरिता संवाद भाईजीसे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास दांडेकर महाविद्यालय व पालघर परिसरातील शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ज्ञान आणि माहिती यात फरक असतो आपण ज्ञान मिळवावे आणि त्याचे उपयोजन मानवी कल्याणासाठी करावे, असे सांगून कोकणात पाण्याची उपलब्धता मोठा असल्याने एका अर्थाने तुम्ही देवाचे लाडके आहात. मात्र लाडकी मुले बिघडण्याची शक्यता असते, हे आपण लक्षात ठेवून प्रचंड प्रमाणात पडणार्‍या पावसाच्या पाण्याचे योग्य प्रकारे नियोजन केले पाहीजे, असे आवाहन राजेंद्र सिंह यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केले. भारतामध्ये महाराष्ट्र राज्यात पाण्याचे नियोजन अतिउत्कृष्ट होते. तरीही आत्महत्या का होतात याचा विचार आपण केला पाहीजे. पाण्याची उपलब्धता आणि त्याप्रमाणे पिकांची लागवड याच्यात समन्वय साधला नाही तर कितीही नियोजन केले तरी आपल्याला आत्महत्यासारख्या संकटांना सामोरे जावे लागेल, असे सिंह यावेळी म्हणाले.
आजवरचे आपले तंत्रज्ञान नैसर्गिक संपदा ओरबडण्यासाठी वापरले गेले. मात्र नैसर्गिक संपदांचे भरणपोषण करण्यासाठी तंत्रज्ञान निर्माण झालेच नाही असे निरीक्षण त्यांनी नोंदविले. सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळीने सुवर्णमहोत्सवा निमित्ताने पालघर जिल्हा आणि परिसरात पाण्याचे संरक्षण, संवर्धन, साक्षरता या क्षेत्रात भरीव कार्य केले पाहीजे अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.
पंचमहाभुते हिच ईश्वर आहेत, या पंचमहाभुतांनीच मानवाला निर्माण केले आहे. त्यांचे संरक्षण करणे हे माणसाचे आद्य कर्तव्य आहे. त्यांनी भगवान या शब्दाचा भ म्हणजे भूमी, ग म्हणजे गगन, व म्हणजे वायू, अ म्हणजे अग्नी आणि न म्हणजे नीर असे विश्लेषण केले. पिकांचे स्वरुप आणि पडणारा पाऊस यांच्यात मेळ साधणे, पावसाचे पाणी जमीनीत मुरविणे, सुर्यापासून पाणी वाचविणे ही कामे आपण केली तरच आपले भविष्य सुरक्षित होईल असे प्रतिपादन त्यांनी केले.
उपस्थित श्रोत्यांशी संवाद साधत असताना त्यांनी राजस्थानमध्ये झालेली जलक्रांतीची उदाहरणे दिली. तसेच उपस्थित श्रोत्यांना प्रश्‍न विचारत संवाद साधला. यशदाच्या विकास प्रशासन प्रबोधनीचे प्रा. डॉ. सुमंत पांडे यांनी विद्यार्थ्यांना 26 जानेवारी रोजी होणार्‍या ग्रामसभेस उपस्थित राहण्याचे आवाहन केले. जलमित्र अजित गोखले यांनी पाणी वापराच्या संदर्भात तांत्रिक आणि सांख्यिकीय बाबी सांगून उपस्थितांचे प्रबोधन केले. तर उपस्थित विद्यार्थ्यांनी जलसंरक्षण, जलसंवर्धन याबाबत प्रतिज्ञा घेतली.
या कार्यक्रमास उपाध्यक्ष चंद्रकांत दांडेकर, कोषाध्यक्ष हितेंद्र शहा, सचिव प्रा. अशोक ठाकूर, अतुल दांडेकर, सहसचिव जयंत दांडेकर तसेच पालघर पोलीस स्टेशनचे किरण कबाडी, सार्वजनिक बांधकाम सभापती दामोदर पाटील व पालघर परिसरातील मान्यवर उपस्थित होते.
संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. जी. डी. तिवारी यांनी सुवर्णमहोत्सवानिमित्त संस्थेत होणार्‍या विविध कार्यक्रमाबाबतची भूमिका विशद केली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण सावे यांनी प्रास्ताविक करुन उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले. पाहुण्यांचा परिचय अनघा पाध्ये-देशमुख यांनी करुन दिला. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विवेक कुडू यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यक्रम समन्वयक प्रा. महेश देशमुख यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाचे संपूर्ण संचालन हिंदी भाषेत केल्याने राजेंद्र सिंह यांनी संस्थेचे व महाविद्यालयाचे कौतुक केले.

comments

About Rajtantra

Scroll To Top