दिनांक 23 February 2019 वेळ 9:02 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » डहाणू नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विनोद डवले यांना लाच स्विकारताना अटक

डहाणू नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विनोद डवले यांना लाच स्विकारताना अटक

VINOD DAVLEदि. 19 : डहाणू नगरपालिका परिषदेचे मुख्याधिकारी विनोद डवले (51) यांना 95 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. त्यांना अटक करण्यात आली असून उद्या पालघर येथील सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. डहाणू नगरपरिषदेत अलीकडेच सत्ता स्थापन करणार्‍या भाजपसाठी हा धक्का मानला जात आहे. डवले हे भाजपच्या मर्जीतले मानले जात होते.
विनोद डवले यांनी यापूर्वी 2 वेळा मुख्याधिकारी पदाची धुरा सांभाळलेली आहे. आमदार मनीषा चौधरी या डहाणूच्या नगराध्यक्ष असताना डवले हे डहाणूचे मुख्याधिकारी होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या हातातील सत्ता हस्तगत करण्यासाठी भाजपने आपल्या मर्जीतील मुख्याधिकारी नेमला असल्याचे मानले जात होते. डवले हे निर्णय न घेणे व प्रक्रिया रखडवणे यासाठी वादग्रस्त ठरले होते. ते ठेकेदारांकडून बिले अदा करण्यासाठी 10 टक्के लाच घेत असल्याच्या तक्रारी होत्या. कामे पूर्ण झाल्यानंतर ठेकेदारांची सुरक्षा अनामत परत करताना देखील त्यांची 5 टक्के लाचेची मागणी असे. यातून ते लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले.
डहाणू नगरपरिषदेतील एक ठेकेदार जयंत कुंभार यांनी एक काम पूर्ण केल्यानंतर व सुरक्षा अनामतेची मुदत संपल्यानंतर ती मागितली असता डवले यांनी 95 हजार रुपयांची लाच मागितली. कुंभार यांनी याबाबत ठाणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचला असता आज सायंकाळी 4.30 वाजता 95 हजार रुपये स्विकारताना डवले यांच्यावर झडप घालण्यात आली. त्यांना अटक करण्यात आली असून कसून चौकशी चालू आहे. त्यांच्या निवासस्थानी देखील धाड टाकण्यात आली असून नेमके काय घबाड सापडले याबाबतचा तपशील हाती आलेला नाही.
2 दिवसापूर्वीच डवले यांच्यावर ट्रॅप टाकण्यात आला होता. मात्र त्यावेळी अन्य ठेकेदार राजेंद्र पाटील यांनी नगरपरिषदेत येऊन मुख्याधिकारी डवले हे 10 टक्के लाच घेऊन देखील बिले मंजूर करीत नसल्याचा आरोप करीत हंगामा केला होता. यावेळी डवले कार्यालयातून लवकर निघून गेले. त्यामुळे ते त्यावेळी बचावले असले तरी आज अडकले.

comments

About Rajtantra

Scroll To Top