दिनांक 23 February 2019 वेळ 9:07 PM
Breaking News
You are here: Home » पाठपुरावा » पालघर : बचत गटांच्या विविध मागण्यांसाठी कष्टकरी संघटनेचा जिल्हा परिषदेवर मोर्चा

पालघर : बचत गटांच्या विविध मागण्यांसाठी कष्टकरी संघटनेचा जिल्हा परिषदेवर मोर्चा

BACHAT GAT MORCHAपालघर दि. 16 : अंगणवाड्यांमधील बालकांना पोषण आहार पुरविणार्‍या बचत गटांची 9 महिन्यांपासुन थकीत असलेली बिले तात्काळ अदा करावी या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी कष्टकरी संघटनेतर्फे जिल्हा परिषद कार्यालयावर आज मोर्चा काढण्यात आला. विविध बचत गटातील शेकडो महिला या मोर्चात सहभागी झाल्या होत्या.
अंगणवाड्यांमधील 6 वर्षांखालील मुलांना स्थानिक बचत गटांकडून खिचडी, उसळ, लापशी व लाडू आदींचा समावेश असलेला पोषण आहार पुरविला जातो. या पोषण आहाराच्या खर्चाची बिले एकात्मीक बाल विकास यंत्रणेने दरमहा अदा करणे अपेक्षित असताना गेल्या 9 महिन्यांपासुन या बचत गटांच्या कामाची बिले अदा करण्यात आली नसल्याचा आरोप आहे. यामुळे जिल्ह्यात कुपोषणाची तीव्रता वाढण्याची शक्यता असुन या बचत गटांना वेळेत ही रक्कम न मिळाल्याने हे बचत गट आर्थिक दृष्ट्या तोट्यात जातील व परिणामी ज्या महिलांना सक्षम करण्याचा प्रयत्न केला जात आहे, त्या महिला अक्षम बनतील, अशी भिती व्यक्त करतानाच पोषण आहार व बाल विकास यासाठी अर्थसंकल्पीय तरतूदीत कपात करण्याचा आणि विशेषत: आदिवासी भागात पोषण आहार कार्यक्रमाच्या अंमलबजावणीतील निष्ठूरतेचा या मोर्चातून निषेध व्यक्त करण्यात आला. शासनाने अंगणवाड्यांना पुरक पोषण आहार पुरविणार्‍या बचत गटांची बिले तात्काळ अदा करावीत, मध्यान्ह भोजन योजनेंतर्गत स्वयंपाक्याचे थकीत मानधन व इतर थकीत बिले तात्काळ अदा करावीत, तसेच ही थकीत बीले व त्यातील काही रक्कम जिल्हा परिषद अथवा नियोजन विभाग यांच्याकडील सध्याच्या अखर्चित रक्कमेतून भागविण्यात यावी व महिला बचत गटांशी संबंधित आर्थिक व्यवहारात पारदर्शकतेचा अवलंब करावा, आदी मागण्या या मोर्चाद्वारे करण्यात आल्या. सदर मागण्या मान्य न झाल्यास येत्या 26 जानेवारीपासुन अंगणवाड्यांना पोषण आहार पुरविणे बंद करण्याचा इशाराही जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात देण्यात आला.
कष्टकरी संघटनेचे मधू धोडी, सुनंदा सदाशिव कोंब, सुमन पांडू गावित, श्‍वेता एकनाथ कातवारे व निमा मधूकर वलासाडा यांच्यासह शेकडो महिला या मोर्चात सहभागी झाल्या होत्या.

comments

About Rajtantra

Scroll To Top