दिनांक 21 January 2018 वेळ 4:26 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » पर्यटन स्थळांची वाट बिकट, हिरड पाडा धबधबा विकासाच्या प्रतीक्षेत शासनाच्या उदासिनतेमुळे पर्यटन स्थळांचा विकास खुंटला

पर्यटन स्थळांची वाट बिकट, हिरड पाडा धबधबा विकासाच्या प्रतीक्षेत शासनाच्या उदासिनतेमुळे पर्यटन स्थळांचा विकास खुंटला

प्रतिनिधी
जव्हार, दि. 31 : महाराष्ट्रातील मिनी महाबळेश्वर संबोधले जाणारे उंच हवेचे ठिकाण म्हणजे JAVHAR HIRADPADA DHABDHABA. पर्यटकांना नेहमीच खुणवणार्‍या व ऐतिहासिक वारसा लाभलेल्या जव्हारमध्ये जुना राजवाडा, शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला शिरपामाळ, सूर्यास्ताचे मनोहारी दृश्य पाहावयास मिळणारे सनसेट पॉईंट आदी स्थळांसह पर्यटकांना येथील वारली आदिवासींची संस्कृती जवळून पाहावयास मिळते. मात्र शासनाच्या उदासिनतेमुळे येथील पर्यटन स्थळांचा विकास खुंटल्याचे चित्र आहे.
जव्हारमधील निसर्गरम्य ठिकाणांमध्ये दाभोसा धबधबा पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदु आहे. तसेच जव्हार शहरापासून सुमारे 13 किलोमीटर अंतरावर हिरड पाडा गावात खूप उंचीवरून कोसळणारा धबधबा आहे. मात्र हा धबधबा जास्त विकसित नसल्यामुळे धबधब्यापर्यंत जाण्यासाठी पुरेशी व्यवस्था नाही. हिरड पाडा ग्रामपंचायतीचे सरपंच माधव भोये यांनी अथक प्रयत्न करूनही शासनाच्या जाचक धोरणांमुळे पर्यटकांच्या पसंतीस उतरेल असे हे पर्यटन स्थळ विकासाच्या प्रतीक्षेत आहे. सदर धबधब्याचा विकास झाल्यास या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी होईल व त्यातून स्थानिक नागरिकांना रोजगार उपलब्ध होईल. विशेष म्हणजे तालुक्यातील भयंकर समस्या असलेले स्थलांतर यामुळे कमी होईल.
ग्रामपंचायतीकडून हे पर्यटन स्थळ विकसीत करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत. मात्र हा भाग वन विभागाच्या क्षेत्रातील असल्याने वन विभागाचे अधिकारी आम्हाला येथे विकास कामे करू देत नाही, अशी भावना सरपंच भोये यांनी व्यक्त केली. एकीकडे लोकप्रतिनिधी पर्यटनस्थळांचा विकास झाल्याचा सूर आवळत असताना शासनाला पर्यटन स्थळे विकासाचे केवळ कागदी घोडे नाचावण्यात रस असल्याचे यातून स्पष्ट होते.
पालघर जिल्हाधिकारी यांनी काही महिन्यांपूर्वी जव्हार येथे पर्यटन विकासासाठी सभा घेतली. या सभेत केवळ पर्यटन विकास आराखडा तयार करण्यात आला. मात्र निसर्गाने जी वरदान दिलेली पर्यटन स्थळे येथे आहेत. त्याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. या पर्यटन स्थळांचा विकास झाल्यास रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.

आम्ही हिरड पाडा धबधब्याच्या विकासासाठी ग्रामपंचायत स्तरावर प्रयत्न करीत आहोत. मात्र शासनाच्या जाचक धोरणांमुळे येथील पर्यटन स्थळांचा विकास खुंटला आहे.
-माधव भोये
सरपंच, हिरडपाडा ग्रामपंचायत

एकीकडे आम्ही जव्हारमधील पर्यटन स्थळे कसे विकसित होतील व पर्यटक कसे येथे आकर्षित होतील यासाठी प्रयत्न करीत आहोत. मात्र शासन दरबारी याबाबत उदासीनता दिसून येते त्यामुळे निराशा होते.
-पारस सहाणे
पर्यटन अभ्यासक, जव्हार

comments

About Rajtantra

Scroll To Top