दिनांक 21 January 2018 वेळ 4:24 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » निरोगी राष्ट्र बनविण्यासाठी नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद महत्वाचा -जिल्हा परिषद अध्यक्ष विजय खरपडे

निरोगी राष्ट्र बनविण्यासाठी नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद महत्वाचा -जिल्हा परिषद अध्यक्ष विजय खरपडे

VISHESH PRACHAR ABHIYANपालघर, दि. 29 : देशाचा प्रत्येक नागरिक निरोगी असला पाहिजे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून शासन आणि आरोग्य विभागाची पूर्ण यंत्रणा दिवस-रात्र राबत आहे. आपण त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला आणि शासनाने उपलब्ध करून दिलेल्या सेवा आणि योजनांचा लाभ घेतला तरच एक निरोगी देशाचे स्वप्न पूर्ण होणे शक्य आहे. जर आपण या कडे दुर्लक्ष केले तर शासनाचे सर्व प्रयत्न वाया जातील. आपल्याला असे होऊ द्यायचे नाही, असे प्रतिपादन पालघर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विजय खरपडे यांनी केले. ते पालघर तालुक्यातील सोमटा येथे केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालय अंतर्गत येणार्‍या क्षेत्रीय प्रचार संचालनालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या विशेष प्रचार कार्यक्रमात बोलत होते. कुष्ठरोग, क्षयरोग, मिशन इंद्रधनुष आणि परिवारविकास या योजनांवर केंद्रित हा कार्यक्रम जिल्हा आरोग्य विभागाच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला होता. या वेळी जिल्हा परिषद सदस्य चेतन धोडी आणि जयवंत गुरोडा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष गायकवाड, अलर्ट इंडियाचे प्रकाश देवारकर, डॉ. किरण सोनवणे, क्षयरोग पर्यवेक्षक मनोज थोरात, बर्‍हाणपुरचे सरपंच शांताराम तुंबडा आदी मान्यवर उपस्थित होते.
खरपडे पुढे म्हणाले की शासनाच्या विविध योजनांना लोकांपर्यंत पोहचविण्याचे पूर्ण प्रयत्न करण्यात येत आहे. लोकांच्या सहकार्यामुळेच आपला पालघर जिल्हा हगणदारीमुक्त झाला आहे. पण आपल्याला अजून सतर्क राहून ही स्वच्छता कायम ठेवावी लागेल. तसेच कुष्ठरोग, क्षयरोग आणि कुपोषणापासून मुक्तीसाठीसुद्धा तेवढ्याच जोमाने प्रयत्न करावे लागतील. तसेच कुपोषण थांबविण्यासाठी बालविवाह आणि घरी प्रसूती सारख्या परंपरा पूर्णपणे सोडाव्या लागतील. या वेळी डॉ. संतोष गायकवाड यांनी आरोग्यविभागातर्फे राबविण्यात येणार्‍या विविध योजनांची माहिती दिली. कुष्ठरोग विभागाचे सहायक संचालक व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत खंदारे यांनी कुष्ठरोगाचे कारण आणि त्याच्या उपचारासंदर्भात मार्गदर्शन केले. बालविकास प्रकल्प अधिकारी नवनाथ घंतोडे यांनी कुपोषणाचे कारण विशद करून पोषण आहाराच्या संदर्भात माहिती दिली.
या वेळी अलर्ट इंडिया या संस्थेतर्फे कुष्ठरोग तपासणी तसेच आरोग्याविभागातर्फे महिला व बालकांची तपासणी करण्यात आली. कुष्ठरोग, क्षयरोग, समेकित बालविकास योजना इत्यादी विभागातर्फे माहिती स्ट़ॉल्स लागवण्यात आले होते. कार्यक्रमात आशा कार्यकर्ती यांनी आदिवासी तारपा नृत्य सादर केले. या वेळी कुष्ठरोगावर आर. टी. गावडे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी, क्षयरोग व अन्य आजारांवर आशा रहाटे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी तसेच मिशन इंद्रधनुष, स्वच्छ भारत मिशन व अन्य योजनांवर जागृती राऊत आणि सहकार्‍यांनी एकांकिका सादर केल्या. या वेळी भारती माळी व सहकार्‍यांनी स्वागत गीत व आशा गीत, तर स्वाती चुरी यांनी पोलिओ गीत सादर केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना क्षेत्रीय प्रचार अधिकारी पराग मांदळे यांनी या विशेष प्रचार कार्यक्रमाच्या आयोजनाचे उद्दिष्ट विशद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास तापकीर यांनी तसेच आभार प्रदर्शन डॉ. अभिजीत खंदारे यांनी केले. या वेळी क्षेत्रीय प्रचार संचालनालयातर्फे घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेचे पारितोषिक मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सोमटा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दिलीप इंगळे, सदाशिव मलखेडकर, दुधे, पांडुरंग मेंगाळ, फिरोज देशमुख, राहुल वनगा, हेमांगी पाटील, वृषाली घरत, कविता चुरी, आरोग्य विभागाच्या गटप्रवर्तक, कर्मचारी व आशा, अंगणवाडी पर्यवेक्षिका व कार्यकर्ता, शासकीय माध्यमिक आश्रमशाळा खुटल व नानिवली येथील मुख्याध्यापक व शिक्षक इत्यादींनी परिश्रम घेतले

सोमटा येथे आयोजित या विशेष प्रचार कार्यक्रमाचे दीप प्रज्ज्वलन करून उद्घाटन करताना पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष विजय खरपडे, क्षेत्रीय प्रचार अधिकारी पराग मांदले, सहायक संचालक कुष्ठरोग डॉ. अभिजीत खंदारे, सीडीपीओ नवनाथ घंतोडे, अलर्ट इंडियाचे प्रकाश देवारकर, सरपंच शांताराम तुंबडा.

comments

About Rajtantra

Scroll To Top