दिनांक 21 January 2018 वेळ 4:24 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » कोकण सरस महोत्सवात विक्रमी 42 लाखांची उलाढाल

कोकण सरस महोत्सवात विक्रमी 42 लाखांची उलाढाल

पालघर, दि. 28 :KOKAN SARAS2 पालघर जिल्हा परिषद व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कोकण सरस महोत्सवात यंदा विक्रमी 42 लाखांची उलाढाल झाल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली आहे. 23 ते 27 डिसेंबर दरम्यान आयोजित या महोत्सवात पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे व नाशिक जिल्ह्यातील महिला बचत गटांनी एकुण 122 स्टॉल्स लावले होते.
या पाच दिवसात साहित्य विक्री स्टॉल्सद्वारे 24 लाख 80 हजार 419 रुपये व खानावळ स्टॉल्सद्वारे 16 लाख 44 हजार 475 रुपये अशा एकुण 41 लाख 24 हजार 894 रूपयांची उलाढाल झाली. स्टॉल्सला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल कोकणातील विविध जिल्ह्यातून आलेल्या या महिला बचत गटांनी समाधान व्यक्त केले असून प्रशासनातर्फे पुरविण्यात आलेल्या सोईसुविधांबाबत आभार व्यक्त केले. आम्हाला पालघर सरसमध्ये व्यवसाय करण्याची संधी मिळाल्याने येथे वस्तुंची मोठ्या प्रमाणावर विक्री करता आली. तसेच पुन्हा संधी मिळाल्यास आपण आवर्जुन सहभागी हाणार असल्याचे रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील आदर्श महिला बचत गटाच्या नयना करळकर यांनी सांगितले. तर आमच्या स्टॉलमधील पदार्थांचा दर्जा चांगला असल्याने ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला व भरपूर ऑर्डर्सही मिळाल्याने या महोत्सवाद्वारे आम्हाला विक्रीची सुवर्ण संधी मिळाल्याचे घरगुती मसाल्यांचा स्टॉल उभारलेल्या ठाण्यातील जागृती महिला बचत गटाच्या नंदा जाधव यांनी सांगितले.
या महोत्सवात विविध स्टॉल्ससह शासनाच्या अनेक विभागांमार्फत जनजागृतीसाठी उभारण्यात आलेल्या स्टॉल्सलाही नागरिकांनी मोठ्या प्रमणात भेट दिली. यात आरोग्य विभागातंर्गत महिलांची मोफत आरोग्य तपासणी, रक्त गट तपासणी आदी सुविधा पुरविण्यात आल्या होत्या. यावेळी विविध जिल्ह्यातून आलेल्या महिला बचत गटांच्या महिलांची तपासणी करण्यात आली. तसेच कृषी विभागाच्या स्टॉलद्वारेे विविध फळे, भाज्या, शेती औजारे व विविध योजनांबाबत माहिती देण्यात आली. तर पशु संवर्धन विभागाच्या स्टॉलद्वारे विविध योजना, बंधिस्त शेळी पालनाचे मॉडल, पक्षी, शेळी, विविध जातींच्या कोंबड्या आदींबाबत विस्तृत माहिती देण्यात आली. शिक्षण विभागाकडून विविध शैक्षणिक साहित्यांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. प्रदर्शनास भेट देणारे शिक्षण प्रेमी, पालक व मुलांनी आवर्जुन या दालनाला भेट दिली. यात चालती बोलती प्रयोग शाळा, इंग्रजी आणि गणित विषयातील कठीण संकल्पना खेळाच्या माध्यमातून स्पष्ट करण्याची युक्ती व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विशेष शैक्षणिक साहित्य मांडण्यात आले होते. तर पाणी व स्वच्छता विभागामार्फत आदर्श गावाचा देखावा निर्माण करण्यात आला होता.
या महोत्सवात दररोज सायंकाळी जनतेच्या मनोरंजनासाठी आयोजित विशेष सांस्कृतिक कार्यक्रमांना मोठ्या संखेने प्रतिसाद लाभला. महोत्सवाच्या दुसर्‍या दिवशी मोखाडा तालुक्यातील आदिवासी बांधवांनी मुखवट्यांचे नृत्यनाट्य अर्थात बोहाडा हा नृत्य प्रकार सादर केला. तसेच ढोल नाद, तारपा आदि नृत्यांचे कार्यक्रमही आयोजित करण्यात आले होते. तिसर्‍या दिवशी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी गुणदर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यात जिल्हाभरातून मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेले उत्साही नृत्यविष्कार प्रेक्षकांना ठेका धरायला लावणारे होते. त्याचप्रमाणे चौथ्या दिवशी जिल्हा परिषद सदस्य, अधिकारी आणि कर्मचार्‍यांचे सांकृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमांमध्ये जिल्हा परिषदेचे सदस्य सहपरिवार सहभागी झाल होतेे.
याप्रसंगी आमदार अमित कृष्णा घोडा, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व शिक्षण समिती सभापती निलेश गंधे, मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी जेजुरकर, जिल्हा परिषद माजी अध्यक्षा तथा सदस्य सुरेखा थेतले, सदस्य प्रकाश निकम, शुभांगी कुटे, नीता पाटील, विपुला सावे, वैष्णवी रहाणे, रंजना संखे, चित्रा किणी आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी बच्चे कंपनीसाठी मनोरंजन म्हणून विविध खेळ व मोटू पतलू, मिकी माऊस आदि कार्टून बाहुले ठेवण्यात आले होते.

comments

About Rajtantra

Scroll To Top