बोईसर ग्रामपंचायतीच्या देणगी बँक खात्यात सव्वा कोटी रुपयांचा गैरव्यवहार?

0
881

प्रतिनिधी
पालघर, दि. 14 : तालुक्यातीलBOISAR GRAMPANCHAYAT GAIRVYAVHAR औद्योगिकीकरणासाठी देशभरात प्रसिद्ध असलेल्या बोईसर ग्रामपंचायतीने सन 2007 मध्ये पाणीपुरवठा लाइन सुधारणा या नावाने उघडलेले बँक खाते कालांतराने लुप्त झाल्याचे उघडकीस आले असून या अचानकपणे ग्रामपंचायत दफ्तरी व्यवहारातून गायब झालेल्या बँकेच्या खात्यामधून सुमारे सव्वा कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे या बँक खात्याचे ऑडिट झालेले नसून या खात्यातील व्यवहाराच्या नोंदीही कॅशबुकमध्ये सापडत नसल्याने या प्रकारणामध्येे ग्रामपंचायत कर्मचार्‍यांपासून काही तत्कालीन पदाधिकारी गुंतले असल्याची शक्यता वर्तविली जात असून याप्रकरणी जिल्हा परिषद प्रशासनाकडून चौकशी सुरू करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
बोईसर ग्रामपंचायत ही औद्योगिक कारखानदारीसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे या परिसरात प्रचंड कारखानदारी वाढल्याने नागरी वस्तीही मोठ्याप्रमाणावर वाढली. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या उत्पन्नातही मोठी वाढ झाली आहे. ग्रामपंचायतीला एमआयडीसीच्या पाणीयोजनेद्वारे पाणीपुरवठा केल जातो. मात्र वाढत्या लोकवस्तीमुळे पाण्याची समस्याही वाढल्याने ग्रामपंचायतीने एमआयडीसीच्या पाणी बिलांच्या थकबाकी भरल्यानंतर बोईसरसाठी सहा इंचाची नवीन जलवाहिनी मंजूर करण्यात आली. खैराफाटक, धनानीनगरपासून भिमनगर यादरम्यान ही नवीन जलवाहिनी टाकण्यात येणार होती, मात्र त्याकरिता ग्रामपंचायतीकडे आवश्यक निधी उपलब्ध नव्हता. त्यावेळी प्रत्येक विकासकांकडून प्रती फ्लॅट अडीच हजार रुपये देणगी स्वरूपात घेऊन ही रक्कम वेगळ्या बँक खात्यामध्ये जमा करण्याचे ठरले. ग्रामसभेने घेतलेल्या ठरावानुसार ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बोईसर शाखेत तत्कालीन ग्रामविकास अधिकारी यांनी मे 2007 मध्ये बँक खाते क्र. 19236 हे उघडले. त्यानंतर या बँक खात्याचा व्यवहार सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांच्या संयुक्त स्वाक्षरीने करण्याचा ठराव करण्यात आला. या बँक खात्याची नोंद तत्कालीन कॅशबुकला असल्याचे व या बँक खात्याचे ऑडिट झाल्याचे हे खाते उघडणारे ग्रामविकास अधिकारी जयप्रकाश संखे यांनी सांगितले आहे.
दरम्यान निवडणकीनंतर बोईसर ग्रामपंचायतीची नवीन कार्यकारिणी जुलै 2016 मध्ये कार्यरत झाली. त्यांनी पूर्वीच्या कार्यकाळात झालेल्या अनेक गैरप्रकाराची प्रकरणे उघडकीस आणण्याचा सपाटा लावला व पालघर जिल्हा परिषदेकडे त्यासंदर्भात तक्रारी केल्या. बोईसर ग्रामपंचायतीचे पाणी पुरवठा विभागाचे देणगी खाते असल्याचा सुगावा लागल्यानंतर ठाणे जिल्हा सहकारी बँकेकडून माहिती मागविल्यानंतर त्या देणगी खात्याची माहिती पुढे आली आहे. बोईसरच्या ग्रामविकास अधिकारी व सरपंच यांनी हे बँक खाते अथवा त्याची माहिती आपल्याला पदभार देताना संबंधित दप्तरासोबत दिली गेली नसल्याचे विद्यमान सरपंच वैशाली बाबर यांनी कळविले असून पाणी पुरवठा कॅशबुकमध्ये या खात्यामधील व्यवहाराची कोणतीही नोंद आढळली नसल्याचे या तक्रार अर्जामध्ये नमूद करण्यात आले आहे. या देणगी बँक खात्यामधून सुमारे साडे दहा लाख रुपये ग्रामपंचायतीकडे वर्ग केल्याचे, अकरा लाख स्वतः काढल्याचे, 17 लाख रुपये काही खात्यांकडे वर्ग केल्याचे तसेच इतर रक्कम काही संशयास्पद खात्यामध्ये वर्ग करून सव्वा कोटी रुपयांचा व्यवहार झाल्याचे दिसून येत आहेत. या बँक खात्यामधून लाखो रुपयांच्या व्यवहार झाला असून यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे आरोप बोईसरचे उपसरपंच राजेश करवीर व ग्रामपंचायत सदस्यांनी केले आहेत.
दरम्यान या प्रकरणासंदर्भात जिल्हा परिषदेकडे तक्रार प्राप्त झाली असून या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तातडीने पालघरच्या गटविकास अधिकार्‍यांमार्फत चौकशी सुरु असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी सांगितले.

Print Friendly, PDF & Email

comments