दिनांक 21 October 2018 वेळ 1:12 AM
Breaking News
You are here: Home » संग्राह्य बातम्या » नगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2017 दैनिक राजतंत्रच्या विरोधात निवडणूक निर्णय अधिकारी यांची तक्रार

नगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2017 दैनिक राजतंत्रच्या विरोधात निवडणूक निर्णय अधिकारी यांची तक्रार

facebook_15060021929492 डिसेंबर रोजी डहाणू तालुका विकास परिषदेच्या माध्यमातून दैनिक राजतंत्रचे संपादक संजीव जोशी यांच्या पुढाकाराने सर्व पक्षीय नगराध्यक्षपदाचे व नगरसेवक पदाचे उमेदवार एकाच व्यासपिठावर आणण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला लोकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. या कार्यक्रमामुळे सर्व उमेदवारांना खेळीमेळीच्या वातावरणात आपले विचार मांडण्याची संधी मिळाली. कार्यक्रमाचे सोशल मिडीयावरुन थेट प्रक्षेपण देखील करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी निवडणूक यंत्रणेद्वारे दिनांक 30 नोव्हेंबर 2017 रोजी जावक क्रमांक डनप/5146/2017-18 अन्वये ना हरकत पत्र देखील प्राप्त करण्यात आले होते. तसेच पोलीस यंत्रणेकडून दिनांक 30 नोव्हेंबर 2017 रोजी जावक क्रमांक/सभा परवाना/2025/2017 द्वारे परवाना प्राप्त करण्यात आला होता.

परवानगी घेताना शासकीय यंत्रणा व निवडणूक यंत्रणा यांना सौहार्दपूर्ण वातावरणात निवडणूका पार पडाव्यात यासाठी जनतेशी व उमेदवारांशी संवाद साधावयाचा असल्यास उपलब्धता ठेवण्यात आली होती. या व्यासपिठाचा वापर पोलीस यंत्रणेने उमेदवारांशी संपर्क साधण्यासाठी जरुर केला. निवडणूक यंत्रणेने या संपूर्ण कार्यक्रमाचे व्हिडीओचित्रण केले आहे. कार्यक्रम कुठलाही अनुचित प्रकार न होता पार पडला. कार्यक्रमाच्या वेळेची मर्यादा रात्री 10 वाजेपर्यंत असल्याने वेळेत समारोप करण्यात आला. याबाबत कुठल्याही यंत्रणेने काहीही आक्षेप नोंदविलेला नाही.

तथापी डहाणू नगरपरिषदेच्या निवडणूकीत नगराध्यक्ष व नगरसेवक पदांसाठी उमेदवारी अर्ज भरणार्‍या 142 अर्जांपैकी 31 उमेदवारी अर्ज छाननीमध्ये किरकोळ तांत्रिक कारणांनी बाद झाल्यानंतर यातील 6 उमेदवार दाद मागण्यासाठी न्यायालयात गेले. सर्व 6 जणांच्या बाजूने निकाल लागून निवडणूक निर्णय अधिकारी आंचल गोयल यांचे निर्णय रद्दबातल ठरले व 6 जण पुन्हा निवडणूकीच्या रिंगणात उतरु शकले. असे असले तरी उर्वरीत 25 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणाबाहेर फेकले गेले. यातून निवडणूक आयोगाला 13 डिसेंबर रोजी होणार्‍या निवडणूका 17 डिसेंबर रोजी पर्यंत पुढे ढकलाव्या लागल्या. दैनिक राजतंत्रने याबाबत निवडणूक निर्णय अधिकार्‍यांच्या विरोधात प्रखर भुमिका घेतली. या भुमिकेबाबत निवडणूक निर्णय अधिकारी अथवा जिल्हाधिकारी आजपर्यंत कुठल्याही प्रकारचा खुलासा करु शकले नाहीत. मात्र दबावतंत्राचा भाग म्हणून जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी कुठल्याही कायद्याचा आधार नसलेल्या नोटीसांचा सिलसिला चालू केला आहे.

यातील अभ्यासाचा विषय हा आहे कि, 5 डिसेंबर रोजी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जिल्हाधिकारी यांना पत्र लिहीले आणि लगेचच जिल्हाधिकारी यांनी जिल्हा माहिती अधिकारी यांना पत्र लिहीले. जिल्हा माहिती अधिकारी यांनी 7 डिसेंबर रोजी संजीव जोशी यांना पत्र दिले. आणि त्याच दिवशी संजीव जोशींकडून प्रत्युत्तर देण्यात आले. त्यांच्या नोटीसा व त्यावरील दैनिक राजतंत्रचे संपादक संजीव जोशी यांनी दिलेले उत्तर जनता जनार्दनाच्या माहितीसाठी सादर करीत आहोत.
जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, पालघर यांचे कार्यालय
(नगरपालिका शाखा)
पालघर, जिल्हा पालघर

क्र./न. प्रशासन /क-1/टे-1/न.प.सार्व. निवडणूक 2017/कावि-562/17 दि. 5.12.2017

प्रति,
जिल्हा माहिती अधिकारी तथा सदस्य सचिव, नगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2017

विषय :- नगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2017 च्या अनुषंगाने दैनिक राजतंत्र या वृत्तपत्रात छापून आलेल्या बातम्यांबाबत.

संदर्भ :- निवडणूक निर्णय अधिकारी, डहाणू नगरपरिषद यांचेकडील पत्र क्र.165 दि. 05/12/2017.

मा. राज्य निवडणूक आयोग यांचेकडील पत्र क्र. रानिआ/नप-2017/प्र.क्र.13/का-06 दि. 07/11/2017 अन्वये नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूका 2017 चा कार्यक्रम पारीत झालेला असुन सदर कार्यक्रमानुसार पालघर जिल्ह्यातील नगरपरिषद डहाणू, जव्हार व निवनिर्मित नगरपंचायत वाडा यांच्या सार्वत्रिक निवडणुका घेण्यात येत आहेत. सदर निवडणूकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडील आदेश क्र. न.प्रशासन/क1/टे1/न.प. व न.पं. सार्व. निवडणूक 2017/कावि-502/17 दि. 17.12.2017 नुसार पेड न्यूज समितीचे गठण करण्यात आले असुन सदर समितीच्या सदस्य सचिव पदावर आपली नेमणूक करण्यात आली आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी डहाणू नगरपरिषद यांनी संदर्भिय अहवाल या कार्यालयास सादर केला आहे. त्यानुसार दैनिक राजतंत्र या वृत्तपत्रात निवडणूक विषयक विविध बातम्या छापून आल्या आहेत. त्याचसोबत निवडणूक निर्णय अधिकारी डहाणू नगरपरिषद यांचेबाबतही आक्षेपित विधाने व बातम्या छापून आल्या आहेत. नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीकामी आदर्श आचारसंहिता सुरु असताना निवडणूक निर्णय अधिकारी सारख्या महत्वाच्या अधिकार्‍याच्या बाबतीत दिशाभूल करणारे आरोप लावून व त्याबाबत बातम्या छापून निवडणूक आयोगावर अविश्‍वास दाखविल्याची गंभीर बाब निदर्शनास आणून दिली आहे. तरी सदर प्रकरणी दैनिक राजतंत्र तसेच अशा आशयाच्या बातम्या छापणार्‍या इतर वृत्तपत्राचे बाबतीत नियमानुसार चौकशी करुन आवश्यक त्या कारवाईचा प्रस्ताव विनाविलंब या कार्यालयास सादर करावा.

स्थळप्रतीवर मा. जिल्हाधिकारी पालघर
यांची स्वाक्षरी असे,

सही/-
जिल्हाधिकारी पालघर करिता
प्रत. निवडणूक निर्णय अधिकारी, डहाणू नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2017
या नोटीसवजा पत्रांना दैनिक राजतंत्रचे संपादक संजीव जोशी यांनी दिलेले उत्तर

दिनांक: 7.12.2017
मा. सदस्य सचिव
डहाणू नगरपरिषद निवडणूक 2017

आपले सोबत जोडलेले पत्र ईमेल द्वारे प्राप्त झाले. आपले पत्र मोघम आहे. त्यातून आपणाला नेमके काय म्हणायचे आहे याचा बोध होत नाही. सोबत आपण जिल्हाधिकारी यांचे पत्र देखील जोडले आहे. त्यातही नेमकेपणा नाही. यामुळे जिल्हाधिकारी यांना देखील काय म्हणायचे आहे याचा बोध होत नाही. निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कथित जावक क्रमांक 165 चे दिनांक 5 डिसेंबर 2017 रोजीचे पत्र आपण सोबत पाठविलेले नसल्याने त्यांना काय म्हणायचे आहे याचा बोध होत नाही.

दैनिक राजतंत्रमध्ये छापून येणार्‍या बातम्यांबाबत निवडणूक निर्णय अधिकारी यांनी आपली बाजू कधी आमच्याकडे कळविलेली नाही. माहिती जनसंपर्क विभागाने देखील कधी कुठलाही खुलासा पाठविलेला नाही. यामुळे आमच्या कुठल्या बातम्या आपणास आक्षेपार्ह्य वाटतात हे समजून येत नाही. पर्यायाने आम्ही याबाबत काही म्हणणे मांडू शकत नाही.

आपण पेड न्यूज समितीच्या माध्यमातून हे पत्र पाठवीत असलात तरी संपूर्ण पत्रात पेड न्यूजबाबत काहीही भाष्य नाही. आपण कुठल्या कायद्याप्रमाणे व कुठल्या अधिकारात हे नोटीस वजा पत्र पाठविलेले आहे हे पत्रात नमूद नाही. राज्यात आणीबाणी घोषीत झालेली नसल्याने वृत्तपत्र स्वातंत्र्य अबाधित आहे व या संविधानिक अधिकारावर आपण आक्रमण करण्याचा प्रयत्न केल्यास संविधानिक पद्धतीने स्वतःचा बचाव करू इतकेच याबाबत म्हणता येईल.

वस्तुस्थिती अशी आहे कि, डहाणू नगरपरिषदेच्या निवडणूक निर्णय अधिकारी आंचल गोयल यांनी बेजबाबदार पद्धतीने निवडणूक प्रक्रिया राबवून लोकशाहीचे नुकसान केले आहे. त्यांनी तांत्रिक कारणाने 31 उमेदवारी अर्ज बाद केले आहेत. यातील 6 जणांनी न्यायालयात अपील दाखल केल्यानंतर गोयल यांचे निर्णय रद्द करून न्यायालयाने (कृपया पालघर जिल्हा न्यायालयातील निवडणूक याचिका क्रमांक 1 ते 6/2017 चे अवलोकन करावे) सर्व 6 जणांना निवडणूक लढविण्यास पात्र ठरविलेले आहे. पालघर जिल्हा न्यायालयाने 5 निकालांत गोयल या राज्य निवडणूक आयोगाने काढलेल्या 1 एप्रिल 2017 रोजीच्या परिपत्रकाच्या प्रतिकूल वागल्याचा निष्कर्ष काढलेला आहे. या शिवाय न्यायालयात गोयल यांनी असे म्हणणे मांडले आहे कि, दिनांक 24 नोव्हेंबर 2017 रोजी एकाच दिवसात 138 उमेदवारी अर्ज आल्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने काढलेल्या 1 एप्रिल 2017 रोजीच्या परिपत्रकाप्रमाणे अर्ज नीट तपासून स्विकारता आले नाही. यामुळे त्यांची अकार्यक्षमता त्यांनी न्यायालयात देखील मान्य केली आहे. त्यांच्या या गोंधळामुळे अन्य 25 उमेदवार निवडणूक लढविण्यापासून वंचित राहिले आहेत. गोयल यांच्या विरोधात सर्वसामान्यांच्यात असंतोष आहे. या असंतोषाची दखल घेऊन कामगिरीत सुधारणा करण्याऐवजी दबाव निर्माण करण्यासाठी माझ्यावर बिनबुडाचा आरोप केला आहे.

कृपया मा. जिल्हाधिकारी यांनी देखील याबाबत सखोल चौकशी करून कांगावा करणार्‍या आंचल गोयल यांच्यावर कारवाई करून निवडणुका पारदर्शी व निर्विवाद पद्धतीने पार पाडण्यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात हि विनंती.

आपला स्नेहांकित
(संजीव जोशी)
संपादक : दैनिक राजतंत्र

या पत्राची प्रत जिल्हाधिकारी आणि निवडणूक आयोगाला देखील पाठविण्यात आली आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top