दिनांक 23 January 2018 वेळ 3:17 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » वाड्यात भाजप – शिवसेनेत कडवी झुंज काँग्रेसनेही निर्माण केलेय आव्हान; बविआचे शर्थीचे प्रयत्न

वाड्यात भाजप – शिवसेनेत कडवी झुंज काँग्रेसनेही निर्माण केलेय आव्हान; बविआचे शर्थीचे प्रयत्न

वैभव पालवे
वाडा, दि. 10 : वाडा नगरपंचायतीच्या होत असलेल्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून सर्वच पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भारतीय जनता पक्षाने हायटेक प्रचारावर भर देत आघाडी घेण्याचा प्रयत्न केलाय तर शिवसेने समाजमाध्यमांच्या वापराबरोबरच सांस्कृतिक वारसा असलेले वासुदेव, कृषी संस्कृती दर्शवणार्‍या बैलगाडीचा वापर करत प्रचारात रंगत आणली आहे. या निवडणुकीत भाजप व शिवसेनेत कडवी झुंज असून काँग्रेसने शिवसेनेच्या बंडखोर उमेदवाराला उमेदवारी दिल्याने या दोन्ही पक्षांपुढे आव्हान उभे केले आहे. तर बहुजन विकास आघाडीदेखील विजयासाठी शर्थीचे प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे.
वाडा नगरपंचायत निवडणुकीत खरी लढत भाजप व शिवसेनेत आहे. हे दोन्ही पक्ष तुल्यबळ असल्याचे मागील निवडणुकांमध्ये दिसून आले आहे. या दोन्ही पक्षांच्या मतांच्या आकडेवारीत अवघ्या काही मतांचे अंतर असल्याने निवडणुकीत कोण बाजी मारतेय याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष WADA NAGARPANCHAYAT LEKH 1 Pic1लागले आहे. भाजपकडून नगराध्यक्षपदाकरिता राज्याचे आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांची कन्या निशा सवरा या निवडणुक लढवत आहेत. तर शिवसेनेकडून माजी आमदार शंकर आबा गोवारी यांची कन्या गीतांजली कोलेकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत. काँग्रेसने शिवसेनेने उमेदवारी नाकारल्यामुळे बंडखोर सायली पाटील यांना पक्षाची अधिकृत उमेदवारी दिली असून बहुजन विकास आघाडीने अमृता मोरे यांना तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने गुलाब दाभाडे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. त्यामुळे या निवडणुकीची रंगत वाढली असून उमेदवार वाढल्याने विजयाचे प्रमुख दावेदार असलेल्या भाजप व शिवसेनेच्या गोटात काही अंशी चिंतेचे वातावरण आहे. या दोन्ही पक्षांची शक्ती सारखी असल्याचे दिसत असले तरी शिवसेनेचे नेते असलेले माजी सरपंच गिरीश पाटील यांची कन्या सायली पाटील यांनी शिवसेनेने उमेदवारी नाकारल्यामुळे काँग्रेसची उमेदवारी घेत निवडणुक लढत असल्याने शिवसेनेला त्याचा फटका बसण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे भाजप व शिवसेनेत होत असलेल्या काटें की टक्करमध्ये सायली पाटलांच्या बंडखोरीवर भाजप विजयाचे मनोरे रचत असल्याचे दिसत आहे.

निशा सवरांच्या उमेदवारीने भाजपला बळ
============================
भारतीय जनता पक्षाने नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर होताच निशा सवरांची उमेदवारी जाहीर केली. तर शिवसेनेत उमेदवारीवरून प्रचंड संघर्ष होत राहिला. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम क्षणी गीतांजली कोलेकरांची उमेदवारी निश्चित झाली. सायली पाटील यांना शिवसेनेने उमेदवारी न दिल्याने त्या काँग्रेसच्या तिकिटावर निवडणुक लढत आहेत. भाजपने लगेच उमेदवार जाहीर केल्याने व उमेदवार मंत्री सवरांची कन्या असल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला. संघटनात्मक पातळीवर भाजप पक्ष म्हणून अधिक बळकट बनला. तर त्याचवेळी शिवसेनेला बंडखोरीने ग्रासले. उमेदवार म्हणून निशा सवरा या आज उजव्या असल्याचे दिसत आहे. मुळात निशा सवरांना राजकीय वारसा कुटुंबाकडून असला तरी त्या स्वतंत्र विचाराच्या आहेत. राजकारणापेक्षा त्यांचा पिंड समाजकारणाचा आहे. त्या जरी राजकारणात सक्रिय असल्या तरी सामाजिक प्रश्‍नाबाबत त्या अधिक संवेदनशील आहेत. त्यामुळे त्यांचा समाजकारणाकडे अधिक ओढा आहे. आसमंत संस्थेच्या माध्यमातून वंचीत समाजाच्या आर्थिक सबलीकरणासाठी त्या झटत आहेत. उच्च शिक्षण घेतलेल्या आणि प्रागतिक दृष्टी असलेलं त्यांचे व्यक्तिमत्त्व राजकारणाचा पोत बदलणारे आहे. स्वत:ची एक भूमिका घेऊन काम करण्याची त्यांची वृत्ती. कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता तथाकथित परंपरागत राजकारणाची चौकट मोडणारे त्यांचे व्यक्तिमत्त्व नगराध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून निश्चितच उजवे ठरत आहे. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीमुळे केवळ मंत्री सवरांची मुलगी म्हणून नव्हे तर खर्‍याअर्थाने एक सक्षम उमेदवार भाजपला मिळाल्याने विरोधकांपुढील आव्हान वाढले आहे.
===============================

गीतांजली कोलेकरांना बंडखोरीचा ताप
=========================

शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीतांजली कोलेकरांनादेखील राजकीय पार्श्वभूमी आहे. त्यांचे वडील दिवंगत शंकर आबा गोवारी हे वाडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. त्यांच्याविषयी वाडेकर जनतेमध्ये एक वेगळी आस्था आहे. एक प्रामाणिक राजकारणी म्हणून आजही त्यांचे नाव लोकांच्या ओठी आहे. त्यामुळे शिवसेनेने त्यांच्या कन्या गीतांजली कोलेकर यांना बरोबर हेरून उमेदवारी दिली आहे. त्या पाटबंधारे विभागात शासकीय कर्मचारी म्हणून निवृत्त झाल्यानंतर समाजकारणात सक्रिय आहेत. राजकीय वारसा असला आणि राजकारणाची समज असली तरी त्या शासकीय नोकरीमुळे राजकारणात सक्रिय नव्हत्या. परंतु शासकीय नोकरीमुळे त्यांना प्रशासकीय कामाची चांगली समज आहे. त्याचा फायदा नगरपंचायतीचे प्रशासन चालवताना होण्याइतकी त्यांची क्षमता असल्याने ग्रामपंचायत असताना शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांवर जे भ्रष्टाचाराचे आरोप झाले ते पाहता निवडणूक जिंकायची असेल तर कोलेकरांसारख्या राजकीय वारसा असलेल्या आणि स्वच्छ प्रतिमेच्या उमेदवाराशिवाय शिवसेनेपुढे पर्याय नव्हता. त्यामुळे त्या पक्षात नवख्या असल्या तरी शिवसेनेने गीतांजली कोलेकरांना उमेदवारी देत निशा सवरांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे. शहरात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचे जाळे मोठे आहे. मतदारही शिवसेनेच्या पाठीशी आहे. मात्र मागील काही निवडणुकांत भाजप-शिवसेना आमने-सामने लढल्यानंतर या दोन्ही पक्षाच्या मतांमधील अंतर अत्यल्प असल्याने व त्यातच सायली पाटील यांनी बंडखोरी करत काँग्रेसकडून निवडणूक लढविल्याने कोलेकरांपुढील व शिवसेनेपुढील डोकेदुखी वाढली आहे.
================================

सायली पाटलांच्या उमेदवारीने काँग्रेसमध्ये चैतन्य
================================

वाड्याचे माजी सरपंच व शिवसेनेचे भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख गिरीश पाटील यांची कन्या सायली पाटील या शिवसेनेकडून नगराध्यक्षपदाकरिता उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्नशील होत्या. शिवसेनेतील वरिष्ठ नेतेही सायली पाटलांच्या उमेदवारीवर सकारात्मक होते. परंतु स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केलेल्या विरोधामुळे पक्ष नेतृत्वाने सायली पाटलांचे तिकीट कापले. त्यामुळे दुखावलेल्या सायली पाटलांनी थेट काँग्रेस पक्षाची उमेदवारी घेत शिवसेनेला आव्हान दिले आहे. वाडा शहरात काँग्रेस पक्षाची खूप ताकद नसली तरी काँग्रेसचा पारंपरिक मतदार आहे. त्यातच सायली पाटील या कुणबी समाजाच्या स्नुषा असल्याने त्यांच्याविषयी कुणबी समाजात एक वेगळी सहानुभूती आहे. त्याचप्रमाणे त्यांचे वडील राजकारणात सक्रिय असल्याने व सरपंच म्हणून त्यांनी काम केलं आहे. त्यामुळे त्यांचा लोकसंपर्क दांडगा असून सर्व पक्षीयांशी असलेले त्यांचे व त्यांच्या कुटुंबियांचे असलेले संबंध पाहता सायली पाटील या सक्षम दावेदार ठरल्या आहेत. त्यांच्या उमेदवारीने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्येही चैतन्य निर्माण झाले असून काँग्रेस पक्ष पर्याय म्हणून निश्चितपणे मतदारांपुढे आल्याने तुल्यबळ तिरंगी लढतीची शक्यता निर्माण झाली आहे. सायली पाटलांची बंडखोरी शिवसेनेला डॅमेज करत असल्याने त्याचा आपसूक फायदा भाजपला होताना दिसत आहे.
===============================
बविआचे शर्थीचे प्रयत्न
================
नगरपंचायत निवडणुकीत बहुजन विकास आघाडीने अमृता मोरेंना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. नगराध्यक्षपदाकरिता बविआ, राष्ट्रवादी काँग्रेस व आरपीआय या पक्षांची आघाडी असल्याने अमृता मोरेंनीही प्रस्थापित पक्षांसमोर आव्हान उभे केले आहे. मागील ग्रामपंचायत निवडणुकीत कोणीही गृहीत न धरलेल्या बविआने चार जागा जिंकत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. चार जागांचं संख्याबळ मिळविलेल्या बविआने सक्षम विरोधीपक्षाची भूमिका चांगल्याप्रकारे निभावल्याने त्यांच्याविषयी एक वेगळी प्रतिमा उभी करण्यात ते यशस्वी झालेत. बविआचे तालुका सरचिटणीस अनंत सुर्वे यांनी ग्रामपंचायतमधील भ्रष्टाचार बाहेर काढत आंदोलने केल्याने सत्ताधारी शिवसेना- भाजपचे चांगलेच वाभाडे निघाले. त्याचा फायदा घेत बविआ ही निवडणूक जिंकण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे.
=================================
==========================
नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेने भाजपला पराभूत करण्यासाठी प्रचाराच्या पातळीवर आघाडी घेतली असली, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदेंनी वाड्यात सभा घेऊन थेट आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरांना आव्हान दिले असले तरी मागील काही निवडणुकांमधील भाजप व शिवसेनेच्या मतांची आकडेवारी पाहता या दोन्ही पक्षात कडवा संघर्ष पहायला मिळत आहे.
सन 2014 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदा भाजप व शिवसेना हे पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढले. त्या निवडणुकीत वाडा शहरात झालेल्या मतदानात शिवसेनेचे उमेदवार शांताराम मोरे यांना मिळालेल्या मतांपेक्षा भाजपच्या शांताराम पाटील यांना सुमारे दोनशे मते अधिक मिळाली होती. त्यामुळे वाडा शहरावर आपलीच ताकद असल्याचा दावा करणार्‍या शिवसेनेचा खर्‍याअर्थाने फुगा फुटला होता. तर त्यानंतर अवघ्या काही महिन्यांत झालेल्या पालघर जिल्हा परिषद व वाडा पंचायत समितीच्या निवडणुकीतही शिवसेना व भाजपच्या मतांमध्ये अत्यल्प फरक राहिला. त्यावेळी भाजपकडून संदीप पवार हे निवडणूक लढले व शिवसेनेकडून विद्यमान जिल्हा परिषद उपाध्यक्ष नीलेश गंधे हे निवडणूक लढले होते. त्यावेळी गंधेंनी पवारांचा पराभव करत विजय मिळवला असला तरी वाडा शहरात गंधे व पवारांना झालेल्या मतांची आकडेवारी पाहता अवघी 76 मते शिवसेनेला भाजपपेक्षा अधिक मिळाली आहेत. तर त्याचवेळी शिवसेनेच्या पंचायत समितीच्या उमेदवार वर्षा गोळे यांचा 44 मतांनी पराभव करत भाजपच्या माधुरी पाटील विजयी झाल्या होत्या. त्यामुळे हे दोन्ही पक्ष तुल्यबळ असून या निवडणुकीत शिवसेना – भाजपमध्ये जिंकण्यासाठी टोकाचा संघर्ष पहावयास मिळत आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजप बॅकफूटवर होता. त्यावेळी तिरंगी लढत झाली होती. शिवसेना, भाजप व बहुजन विकास आघाडी या पक्षांचे तीनच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. 2012 जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपच्या संदीप पवारांकडून झालेल्या पराभवाचे उट्टे काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसने उमेदवारच उभे न करता शिवसेनेच्या पाठीशी आपले बळ उभे केले होते. त्याचप्रमाणे मनसेनेदेखील शिवसेनेबरोबर युती करून आपली मते शिवसेनेच्या पारड्यात टाकली होती. पेसा कायद्यान्वये वर्ग 3 व 4 च्या नोकर्‍यांमध्ये आदिवासी समाजाला शंभर टक्के आरक्षण दिल्याने बिगर आदिवासी समाजात असंतोष होता. त्यामुळे कुणबी सेनेनेदेखील उघडपणे भाजपच्या विरोधात भूमिका घेत शिवसेनेला मदत केली होती. सर्व पक्ष भाजपच्या विरोधात एकवटले होते. त्यामुळे भाजपच्या पवारांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे नीलेश गंधेंच्या विजयात शिवसेनेबरोबरच अन्य राजकीय पक्षांचा देखील मोठा वाटा आहे.
मागील निवडणुकांमधील वरील राजकीय समिकरणे पाहता नगरपंचायत निवडणुकीतील राजकीय परिस्थिती मात्र वेगळी दिसत आहे. भाजपला मंत्रीपद लाभूनही विकासकामे करता आली नाहीत. त्यामुळे ंटी इन्कम्बन्सीचा सामना करावा लागतोय. तर शिवसेनेला बंडखोरीचा फटका बसण्याची शक्यता असून ग्रामपंचायत सत्तेच्या काळात सरपंचांवर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप पाहता शिवसेना बचावात्मक परिस्थितीत आहे. त्याचवेळी शिवसेनेच्या बंडखोर सायली पाटील ह्या काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढत आहेत. त्यांनाही मतदारांचा वाढता पाठिंबा मिळत असून आदिवासी व कुणबी समाजाच्या मतांच्या धृविकरणामुळे त्यादेखील शर्यतीत असल्याने तिरंगी लढतीत नेमका कोणाला फायदा होतोय हे 14 तारखेला स्पष्ट होईल. त्याचप्रमाणे मनसेने शिवसेनेसोबत न जाता स्वतंत्र निर्णय घेण्याची भूमिका घेतल्याने मनसे भाजपकडे अथवा काँग्रेसकडे वळण्याची दाट शक्यता आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसने नगराध्यक्षपदाकरिता बविआसोबत आघाडी केली असली तरी या दोन्ही पक्षात अनेक प्रभागात मैत्रीपूर्ण लढत होत असल्याने या आघाडीत बिघाडीच झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेस आपली मते कोणाच्या पारड्यात टाकते हे महत्वाचे आहे.त्यामुळे नगरपंचायत निवडणुकीत भाजप – शिवसेनेत खरी लढत होत असली तरी मतांचे गणित पाहता शिवसेना सद्यस्थितीत बॅकफूटवर दिसत आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top