डहाणू नगरपरिषद निवडणूक 2017 न्यायालयाची निवडणूक यंत्रणेला चपराक 5 उमेदवारांच्या बाजूने निकाल; 1 अर्ज नामंजूर

संजीव जोशीfacebook_1506002192949
दि. 4: डहाणू नगरपरिषदेच्या 13 डिसेंबर रोजी होणार्‍या सार्वत्रिक निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे प्रभाग क्रमांक 10 ब मधून उमेदवारी अर्ज दाखल करणारे राजेंद्र माच्छी व 12 ब मधील उमेदवार राणी महेश पवार यांच्या पाठोपाठ प्रभाग क्र. 1 ब मधून उमेदवारी अर्ज भरणारे यशवंत नारायण कडू (भाजप), प्रभाग 9 अ च्या दिपा किसन कणबी (शिवसेना), प्रभाग 10 ब चे ज्ञानेश्‍वर चौधरी (अपक्ष) यांना पालघर येथील जिल्हा न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. या सर्वांचे उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी तथा डहाणूच्या सहय्यक जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी अर्जावर उमेदवाराची अथवा सुचकाची स्वाक्षरी नसल्याच्या कारणाने फेटाळले होते. या निर्णया विरोधात न्यायालयात दाद मागितली असता जिल्हा न्यायाधिश एस. एस. गुल्हाणे यांनी निवडणूक निर्णय अधिकार्‍याचे निर्णय चुकीचे ठरवून या सर्वांना निवडणूक लढविण्याची मुभा दिली आहे.

डहाणू नगरपरिषदेच्या 25 नगरसेवक पदांसाठी 133 उमेदवारांनी आणि 1 नगराध्यक्षपदासाठी 9 उमेदवारांनी नामनिर्देशन पत्रे भरली होती. नगराध्यक्ष व नगरसेवक पदांसाठी प्राप्त झालेल्या एकूण 142 नामनिर्देशन अर्जांमधून 31 अर्ज छाननीमध्ये बाद ठरविण्यात आले. या बाद अर्जांमध्ये विद्यमान नगरसेवक राजेंद्र माच्छी (राष्ट्रवादी) व सईद शेख (काँग्रेस) यांचादेखील समावेश होता. माच्छी यांना दिलासा मिळाला असला तरी सईद शेख यांचा अर्ज मात्र न्यायालयाने फेटाळला आहे.

सईद शेख यांचा अर्ज फेटाळला

प्रभाग क्रमांक 2 ब मधून उमेदवारी अर्ज भरणारे सईद शेख यांच्या पत्नीला उमेदवारी अर्ज भरण्यास वैद्य ठरविणार्‍या आंचल गोयल यांनी सईद यांना मात्र अवैद्य ठरविले होते. या प्रकरणी तूर्तास तरी निवडणूक निर्णय अधिकार्‍यांचा निर्णय कायम ठेवण्यात आला असून सईद यांना जिल्हा न्यायालयाने दिलासा दिलेला नाही. असे असले तरी सईद हे उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती सईद यांनी दिली आहे.
सईद यांच्या तर्फे आज जिल्हा न्यायालयाचे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाच्या आजच (5 डिसेंबर 2017 रोजी) निकाल दिल्या गेलेल्या अनिता रहंगडाळे विरुद्ध निवडणूक आयोग प्रकरणाच्या रिट पिटीशन क्रमांक 6547/2017 कडे लक्ष वेधण्यात आले. या प्रकरणी उच्च न्यायालयाने अर्जदार महिलेला दुसर्‍या अपत्याचा मृत्यू झाल्यानंतर तिसरे अपत्य झाले असताना सरपंच पदाची निवडणूक लढविण्यास 3 अपत्य असल्याचे कारण दाखवून अपात्र ठरविण्याचा संबंधीत निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिलेला निर्णय फिरवला आहे. या निकालाची आज सही शिक्क्याची प्रत उपलब्ध होऊ न शकल्याने व निवडणूक प्रकरणातील याचिकांना वेळेच्या बंधनात तारखा देता येत नसल्याने जिल्हा न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निकाल विचारात न घेता सईद यांना अपात्र ठरविणारा निर्णय कायम ठेवला आहे. आता सईद यांचा फैसला उच्च न्यायालयात होणे अपेक्षीत आहे.

Print Friendly, PDF & Email

comments