डहाणू नगरपरिषद निवडणूक 2017 निवडणूक निर्णय अधिकार्‍यांच्या विरोधात असंतोष

0
16

डहाणू नगरपरिषदेच्या 13 डिसेंबर 2017 रोजी होणार्‍या सार्वत्रिक निवडणूकीमध्ये पहिल्यांदाच ऑनलाईन पद्धतीने नामनिर्देशन अर्ज भरण्याची प्रक्रीया राबविण्यात आल्याने पूर्ण निवडणूक कार्यक्रमाचा बोजवारा उडला आहे. लोकांना ऑनलाईन प्रक्रीयेबाबत पुरेशी माहिती उपलब्ध न झाल्याने नगरसेवकपदासाठी एकही अपक्ष उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उतरु शकला नाही. राजकीय पक्षांनी कसरत करुन उमेदवारांचे अर्ज दाखल करुन घेतले असले तरी अनेक पक्षीय उमेदवारांना या गोंधळाचा फटका बसला व निवडणूक लढविण्यापासून ते वंचीत राहीले आहेत. यातून निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती आंचल गोयल यांच्यावर मनमानीपणाचा आरोप केला जात असून त्यांच्यावर कारवाईची मागणी होत आहे.

डहाणू नगरपरिषदेच्या 25 नगरसेवक पदांसाठी आणि 1 नगराध्यक्षपदासाठी 13 डिसेंबर रोजी निवडणूक होत असून यासाठी 18 ते 24 नोव्हेंबर दरम्यान उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत होती. मात्र लोकांना या प्रक्रीयेबाबत माहिती नसल्याने 23 नोव्हेंबर पर्यंत एकही उमेदवारी अर्ज भरला गेला नाही. डहाणू सारख्या ग्रामीण भागात WADA NAGARPANCHAYAT LEKH 1 Pic1खंडीत होणारा विजपुरवठा, इंटरनेटचे कमकुवत जाळे आणि संगणकसाक्षरतेचे कमी प्रमाण यामुळे ही निवडणूक सर्वसामान्यांसाठी उरलीच नव्हती. यातून राजकीय पक्षाच्या नेत्यांनी कसरती करुन जसेतसे उमेदवारी अर्ज भरुन घेतले. तरीही त्यात त्रुटी राहील्याच. नगराध्यक्ष व नगरसेवक पदांसाठी प्राप्त झालेल्या एकूण 142 नामनिर्देशन अर्जांमधून 31 अर्ज छाननीमध्ये बाद ठरविण्यात आले. या बाद अर्जांमध्ये विद्यमान नगरसेवक राजेंद्र माच्छी (राष्ट्रवादी) व सईद शेख (काँग्रेस) यांचा समावेश होता.

अनुसूचित जाती/जमातीचे उमेदवार व महिला यांना कुणीही वाली नव्हते!
या निवडणूकीमध्ये निवडणूक यंत्रणेकडून पुरसे मार्गदर्शन होत नसल्याने व लोकांना ऑनलाईन अर्ज भरण्यास सहाय्यभूत ठरणारी कुठलीही व्यवस्था निवडणूक कार्यालयात नसल्याने उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दुर्लक्षीत घटकांना दारोदारी भटकावे लागले. वास्तविक निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांप्रमाणे नामनिर्देशनपत्र भरण्यास उमेदवारांना सहाय्य व्हावे यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या स्तरावर आवश्यकतेनुसार एक किंवा अधिक मदत कक्षांची स्थापना करणे व जिल्ह्यातील सेतू, ई-सेवा केंद्र, इ. जास्त क्षमतेच्या इंटरनेट सुविधा असलेल्या ठिकाणी तसेच सायबर कॅफे व सीएफसी इ. ठिकाणी नामनिर्देशनपत्र भरण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन देणे बंधनकारक आहे. मात्र अशा सुविधा उपलब्ध करण्यात येथे पूर्णपणे अपयश आल्याचे निदर्शनास आले. अनुसूचित जाती/जमातीचे उमेदवार व महिला वर्ग पूर्णपणे राजकीय पुढार्‍यांवर अवलंबून होता.

मार्गदर्शन शिबीरे नाहीत
पहिल्यांदाच निवडणूक प्रक्रीया ऑनलाईन पद्धतीने होत असताना निवडणूक यंत्रणेकडून याबाबत मार्गदर्शन व जनजागृती करणारी शिबीरे घेण्यात आली नाहीत. कार्यालयाबाहेर मार्गदर्शनाचे कुठलेही फलक लावण्यात आले नाहीत. 23 आणि 24 तारखेला तर निवडणूक कार्यालयाला सोमवार बाजाराचे स्वरुप आले. यामुळे कुणीही सामान्य माणूस तेथपर्यंत पोहोचू शकत नव्हता. निवडणूक अधिकार्‍यांकडून रोज वेगवेगळी माहिती देण्यात येत होती. 23 नोव्हेंबर रोजी नव्याने काही प्रतिज्ञापत्रांचे नमुने देण्यात आले. यातून सर्वांनाच 24 नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज भरावा लागला. अपवाद फक्त 2 नगराध्यक्षपदांच्या उमेदवारांचा. उर्वरीत सर्व उमेदवारांनी 24 नोव्हेंबर रोजी अर्ज दाखल केले.

त्रकार व माध्यम प्रतिनिधींना प्रवेश नाकारला.
निवडणूक प्रक्रीयेचे तिन तेरा वाजत असताना आपले अपयश झाकण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी माध्यम प्रतिनिधींना कार्यालयाच्या आवारात प्रवेश नाकारला. यामुळे पत्रकारांना आतील गोंधळाविषयी काहीही माहिती उपलब्ध होत नव्हती. हा गोंधळ बाहेर पडेपर्यंत वेळ हाताबाहेर निघून गेली होती.

निवडणूक निर्णय अधिकार्‍यांच्या नवखेपणाचा फटका
डहाणू नगरपरिषदेच्या निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून भारतीय प्रशासन सेवेतील आंचल निमित गोयल या काम पहात असल्याने व निवडणूकांची ही त्यांची पहिलीच वेळ असल्याने निवडणूक प्रक्रीया वादात सापडली. गोयल या भारतील प्रशासन सेवेतील असल्याने अहंकाराच्या भावनेतून त्यांच्यात व त्यांचे सहकारी सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा तहसिलदार राहूल सारंग व मुख्याधिकारी विनोद डवले यांच्यात विसंवाद राहील्याचे चित्र होते. यातून निवडणूक यंत्रणेकडून टिमवर्कने काम झाले नाही. वास्तविक 1 एप्रिल 2017 रोजी राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशात इच्छुक उमेदवाराने सादर केलेल्या नामनिर्देशनपत्राची निवडणूक निर्णय अधिकारी अथवा त्यांच्या हाताखालील कर्मचार्‍यांमार्फत प्राथमिक तपासणी करण्यात यावी. प्राथमिक तपासणीत लक्षात आलेल्या त्रुटी उमेदवारांच्या निदर्शनास आणून देण्यात याव्यात व त्रुटी दूर करण्याची त्यांना संधी देण्यात यावी. जेणेकरुन नामनिर्देशनपत्रावर उमेदवार, सूचक, अनुमोदक यांनी स्वाक्षरी करावयाचे राहून गेले असल्यास अथवा इतर काही त्रुटी असल्यास त्या दुरुस्त करण्याची संधी मिळू शकेल असे स्पष्ट केलेले असताना डहाणू नगरपरिषद निवडणूकीमध्ये उमेदवारांचे अर्ज सरसकट काहीही न तपासता स्विकारण्यात आले आणि छाननीत ते फेटाळण्यात आले. आंचल गोयल यांच्या अज्ञानाचा फटका या उमेदवारांना बसला.

छाननीत फेटाळले गेलेल्या उमेदवारांचे अपिल
या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक राजेंद्र माच्छी यांना या प्रक्रीयेत 3 वेळा ऑनलाईन अर्ज भरावे लागले. या गोंधळात त्यांनी शेवटी भरलेल्या अर्जावर सूचकाची स्वाक्षरी न झाल्यामुळे त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला. असाच फटका राष्ट्रवादीच्या महिला उमेदवार राणी पवार, भाजपचे यशवंत कडू, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार रुपाली राठोड व अशा काही उमेदवारांना बसला. या सर्व उमेदवारांनी पालघर येथील अपर जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली असून या याचिकेवर तातडीने 29 नोव्हेंबर रोजी सुनावणी ठेवण्यात आली आहे. काँग्रेसचे नगरसेवक सईद शेख यांचा अर्ज 3 अपत्य असल्याचे कारण दाखवून फेटाळण्यात आला असून ते देखील अपिलात गेले आहेत.

सईद शेख यांना 3 अपत्ये असून त्यांच्या हयात अपत्यांची संख्या 2 आहे. त्यांचे 2 रे अपत्य मृत्यूमुखी पडल्यानंतर 3 रे अपत्य जन्माला आले. सईद यांना 3 अपत्य असल्याच्या कारणाने अपात्र करावे यासाठी पालघरचे जिल्हाधिकारी यांच्याकडे याचिका दाखल झाल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी त्यांचे नगरसेवक पद रद्द केले. तथापी जिल्हाधिकारी यांच्या निकालावर राज्यमंत्र्यांनी स्थगिती दिलेली असताना व आजही ही स्थगिती कायम असताना राज्यमंत्र्यांच्या स्थगिती आदेशाला केराची टोपली दाखवत आंचल गोयल यांनी 3 अपत्याचे कारण दाखवत सईद यांचा उमेदवारी अर्ज छाननीमध्ये बाद ठरवला आहे.

Print Friendly, PDF & Email

comments