दिनांक 18 December 2017 वेळ 2:58 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » पालघरच्या महसूल पथकावर वाळू माफियांचा हल्ला

पालघरच्या महसूल पथकावर वाळू माफियांचा हल्ला

प्रतिनिधी VALU MAFIA
पालघर, दि. 22 : पालघर तालुक्यात बेकायदेशीरपणे मोठ्या प्रमाणावर वाळू उत्खनन होत असल्याची माहिती मिळाल्याने वसई व पालघर महसूल विभागाच्या पथकाने मंगळवारी (दि. 21) धडक कारवाई करत तालुक्यातील केळवेजवळील टेंभीखोडावे येथील वाळूकेंद्रावर छापा मारला असता वाळू माफियांनी या पथकांवर जोरदार दगडफेक केली. या हल्ल्यात एक तलाठी व दोन ग्रामस्थ जखमी झाले.
महसूल विभाग रेती उत्खननाकरिता विशिष्ट विभागात जाहीर लिलाव पध्दतीने परवाने देत असते. परंतु पालघर तालुक्यातील टेंभीखोडावे येथे परवानगी नसताना वाळू माफिया मोठ्याप्रमाणावर वाळूचे उत्खनन करत असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली होती. म्हणून वसई आणि पालघर तहसील कार्यालयाच्या अधिकार्‍यांनी संयुक्त कारवाई करण्याचे ठरविले होते. त्यानुसार एकाबाजूने वसई तहसीलचे पथक बोटीने खाडीतून येत कारवाई केली तर पालघर तहसीलच्या पथकाने टेंभिखोडावे भागातून कारवाईला सुरुवात केली असता या वेळी टेंभीखोडावेच्या कांदळवनामध्ये लपून बसलेल्या सुमारे दीडशेहून अधिक वाळू माफियांनी या दोन्ही पथकांवर दगडफेक करत हल्ला केला. या हल्ल्यात पालघरचे तहसीलदार महेश सागर थोडक्यात बचावले मात्र वसई पथकातील तलाठी निवृत्ती बांगर यांच्या डोक्याला दुखापत झाल्याने ते रक्तबंबाळ झाले तर किशोर पाटील व जयराम पाटील या दोन ग्रामस्थांनादेखील दुखापत झाली. या कारवाईत वसई तहसीलच्या पथकाने तीन बोटी जप्त केल्या तर पालघरच्या महसूल पथकाने दोन बोटी आग लावून उद्ध्वस्त केल्या.
या घटने संदर्भात केळवे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून जखमींंवर उपचार सुरू आहेत.

comments

About Rajtantra

Scroll To Top