दिनांक 18 December 2017 वेळ 3:09 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » वाड्यात शिवसेना-भाजपचा कस लागणार

वाड्यात शिवसेना-भाजपचा कस लागणार

WADA NAGARPANCHAYAT LEKH KARYALAYवैभव पालवे
वाडा ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांना निवडणुकीचे वेध लागलेत. त्यात प्रथमच नगराध्यक्षपदाची निवडणूक थेट पध्दतीने होत असल्याने अनेक कार्यकर्ते गुढग्याला बाशिंग बांधून आहेत. मात्र, वाडा ग्रामपंचायतीमध्ये गेली दहा वर्ष सलग सत्तेत असलेल्या शिवसेना – भाजप युतीला वाडा शहरात कोणतीच विकासकामे करता आली नाहीत. नागरी समस्यांत दिवसागणिक वाढ होत गेल्याने नागरिक त्रस्त झालेत. दरम्यानच्या काळात ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांवर भ्रष्टाचाराचे आरोप देखील झाले. त्याविरोधात आंदोलनेही झाली. त्यामुळे या दोन्ही पक्षांच्या विश्वासार्हतेचाच प्रश्‍न निर्माण झाला आहे. नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना व भाजप हे स्वबळावर लढण्याची शक्यता आहे. गेली दहा वर्ष सत्तेत असल्याने व कोणतीही विकासकामे न झाल्याने शिवसेना व भाजपचा या निवडणुकीत चांगलाच कस लागणार आहे.
ग्रामपंचायत असताना 2007 व 2012 साली झालेल्या निवडणुकीवेळी वाडेकर जनतेने शिवसेना – भाजपच्या पारड्यात भरभरून मतं टाकली व ग्रामपंचायतीचा कारभार युतीच्या हाती सोपविला. 2007 च्या निवडणुकीत सेना – भाजपकडे स्पष्ट बहुमत असताना शिवसेनेतील आपसातील साठमारीत शिवसेनेचे गिरीश पाटील व शिल्पा सोनटक्के हे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्याने अनुक्रमे सरपंच व उपसरपंचपदी विराजमान झाले. गिरीश पाटील हे आपण शिवसेनेचेच सरपंच असल्याचे मिरवत राहिले. शिवसेना – भाजपकडे मोठ्या विश्वासाने मतदारांनी बहुमताने सत्ता सोपविली होती. त्या सत्तेच्या माध्यमातून गावाच्या नागरी समस्या सोडवणे अपेक्षित होते. मात्र सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी आपसातील संघर्षातच ही पाच वर्ष कुजवली. त्यामुळे लोकांच्या नजरेत भरतील अशी कोणतीच विकासकामे गावात होऊ शकली नाहीत. एकप्रकारे ग्रामपंचायतीत ठेकेदारी राज आणण्याचाच प्रयत्न याकाळात झाला. अगदी कचरा उचलण्यासाठी देखील ठेकेदार नेमल्याने त्यात पदाधिकार्‍यांबरोबरच कथित विरोध करणार्‍यांचे हितसंबंध कसे गुंतले होते हे सर्वश्रुत होते. आपसातील टोकाचे दुराग्रह कुरवाळीत शिवसेना भाजपने ही पाच वर्ष अक्षरशः वाया घालविली.
त्यानंतर 2012 साली झालेल्या निवडणुकीत पुन्हा शिवसेना- भाजप युतीने लढले. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सक्षम उमेदवार देऊ शकली नाही. मतदारांपुढे सक्षम पर्याय नसल्याने पुन्हा एकदा शिवसेना- भाजप युतीकडे ग्रामपंचायतीची सत्ता आली. शिवसेनेचे उमेश लोखंडे हे सरपंचपदी तर भाजपचे रोहन पाटील हे उपसरपंचपदी विराजमान झाले. हे दोन्ही पदाधिकारी शिक्षित व तरुण असल्याने गावात काहीतरी बदल होईल, इथल्या नागरी समस्या सोडविण्यासाठी काही प्रयत्न होतील अशी भाबडी आशा होती. मात्र या पाच वर्षातही 20 वर्षांपासून नागरिकांना भेडसावणार्‍या समस्या कायम आहेत. त्यात काडीचाही फरक पडलेला नाही. नागरिकांना पाणी येत नाही, गटारी तुंबल्यात म्हणून वारंवार ग्रामपंचायत कार्यालय खेटे घालावे लागत आहेत. उमेश लोखंडे आणि रोहन पाटलांना तर आपल्या पदाचं महत्वच कळलं नाही. आपले अधिकार नेमके लोकहितासाठी कसे वापरले जायला हवेत याचं भानच या पदाधिकार्‍यांना नव्हते. त्या ऐवजी हे अधिकार आपले उखळ पांढरे करण्यासाठी कसे वापरले गेले हे त्यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांनी व त्यानंतर झालेल्या चौकशांनी सिध्द केलं आहे. त्यामुळे या पदाधिकार्‍यांच्या कर्तृत्वाने (!) शिवसेना- भाजप युतीचं नाकच कापलं. एव्हढी पक्षाची बदनामी क्वचितच कोणत्या पदाधिकार्‍यांनी केली असेल.
सलग दहा वर्ष सत्ता मिळूनही शिवसेना भाजप युतीला वाडा शहराच्या विकासाचे नियोजन करता आले नाही. गेली 20 वर्ष त्याच प्रश्‍नांवर निवडणुका लढविल्या जात आहेत. हे खूप खेदजनक आहे. प्रत्येक निवडणुकीत नागरी प्रश्‍न सोडविण्याची आश्वासनं दिली जातात. प्रत्यक्षात मात्र समस्यांमध्ये अधिक भर पडत गेली. लोखंडे आणि पाटील यांच्या काळात तर पंचायत समिती, जिल्हा परिषद, राज्यात व केंद्रात भाजप – शिवसेना युतीची सत्ता आहे. त्या माध्यमातून वाडा शहराच्या विकासासंबधी काही ठोस करता आले असते. परंतु इच्छाशक्तीच्या अभावापायी कोणताही विकासाचा अजेंडा शिवसेना- भाजप युती राबवू शकली नाही हे वास्तव आहे.
वाडा शहराची लोकवस्ती दिवसेंदिवस वाढतेय. वाढत्या नागरीकरणामुळे पाणी, रस्ते, मल:निसारण, डंपींग ग्राउंडसारख्या समस्या अधिक जटील बनल्यात. आधुनिकतेच्या आणि प्रगतीच्या गप्पा करण्याच्या काळात वाड्यातील जनतेला अक्षरशः गढूळ पाणी प्यावे लागतेय. याउप्पर इथल्या जनतेचं दुर्दैव काय असू शकतं? अनेक नगरांना पाणीपुरवठा होत नाही. 20 वर्षापूर्वीच्या पाणी योजनेवर प्रचंड विस्तारलेलं शहर अवलंबून आहे. वाढत्या शहराकरिता नवीन पाणी योजना मंजूर होणं आवश्यक आहे. मात्र सत्ताधार्‍यांना त्याचं कोणतंही सोयर-सुतक नसल्याने नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. त्याचप्रमाणे कचर्‍याची समस्याही गंभीर बनली आहे. डंपींगग्राउंड नसल्याने वाडा-भिवंडी महामार्गालगत कचरा टाकण्याची वेळ ओढवली आहे. कचरा व्यवस्थापनाबाबत कोणत्याही उपाययोजना केल्या गेल्या नाहीत. शहरात जागोजागी कचरा निर्माण होत असून तो उचलण्यात ग्रामपंचायतीची यंत्रणा अपूरी पडत असल्याने वाडा हे तालुक्याचं ठिकाण असताना त्याला बकाल स्वरूप आलंय. पदाधिकार्‍यांना प्रश्‍नांची समजच नसल्यानं सत्तापदं मिळूनही शहराच्या मूलभूत समस्यांची सोडवणूक व्हावी म्हणून कोणतेही प्रयत्न होताना दिसले नाहीत. ही शिवसेना आणि भाजप समोरील सर्वात मोठी डोकेदुखी या निवडणुकीत ठरणार आहे. शिवसेना- भाजपकडे दहा वर्ष सत्ता असूनही शहराच्या समस्या सुटण्याऐवजी त्यात अधिक भर पडल्याने हे दोन्ही पक्ष नगरपंचायत निवडणुकीत जरी स्वबळावर लढत असले तरी त्यांना गेल्या दहा वर्षातील नाकर्तेपणाचे उत्तर जनतेला द्यावे लागणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत शिवसेना व भाजपचा चांगलाच कस लागणार आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top