दिनांक 22 February 2019 वेळ 4:01 AM
Breaking News
You are here: Home » संग्राह्य बातम्या » संविधानाचा संबंध मानवी जीवन व्यवहाराशी ज्येष्ठ विचारवंत सुभाष वारे यांचे प्रतिपादन

संविधानाचा संबंध मानवी जीवन व्यवहाराशी ज्येष्ठ विचारवंत सुभाष वारे यांचे प्रतिपादन

प्रतिनिधी
वाडा, दि. २७ : भारतीय संविधान हे केवळ कलमांचे पुस्तक नाही. त्याचा संबंध संसदेशी अथवा सर्वोच्च न्यायालयाशीच  आहे असा सर्वसामान्यांचा समज आहे. संविधान हे निव्वळ देशात सत्ता स्थापण्यासाठी नाही तर मानवी जीवन व्यवहार उन्नत करण्यासाठी,  नीतिमान समाज घडविण्याशी त्याचा संबंध असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत सुभाष वारे यांनी वाड्यात केले.
      येथील  राष्ट्र सेवा दलाच्या शाखेच्यावतीने  समाजात भारतीय संविधानाविषयी अधिक जागृती यावी म्हणून संविधान समजून घेताना या विषयावर मंगळवाIMG-20170927-WA0015री ( दि. २६ ) पी. जे. हायस्कूलच्या सभागृहात वारेंचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अधिक बोलताना ते म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर आपला देश राज्य घटनेप्रमाणे वाटचाल करू लागला. मात्र संविधान सर्वसामान्य जनतेला समजावून सांगण्यात आपण अपयशी ठरलो. संविधान हे केवळ कलमांचं पुस्तक नाही, तर ते तुमच्या आमच्या जीवन व्यवहाराशी संबंधित आहे. संविधान नागरिकांना जसे  अधिकार देते तसे कर्तव्यही देते. घटनेतील २५ कलमानुसार धार्मिक व उपासनेचे स्वातंत्र्य दिले आहे. मात्र हे स्वातंत्र्य व्यक्तीला दिलं आहे. त्याचा आपल्याला अनिर्बंध वापर करून जाती धर्मात तेढ निर्माण करण्याचे स्वातंत्र्य घटना देत नाही. असे ते म्हणाले. भारतीय संविधान बनताना त्याला भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा व सामाजिक चळवळीची पार्श्वभूमी आहे. त्यामुळे विविध भाषा, जाती, धर्म, प्रांत असलेला बहुसांस्कृतिक परंपरा असलेल्या देशाला सामावून घेणारी राज्यघटना संविधान निर्माते देवू शकले. संविधानात नागरिकांसाठी दिलेली कर्तव्य जर आपण नीट समजून घेतली आणि त्याप्रमाणे आपण वागू लागलो तर नीतिमान समाज निर्माण होईल. मानवी जीवन व्यवहार त्याप्रमाणे सुरु राहिले तर आपल्या समाजाची उन्नतीच होईल असे म्हणत संविधान नुसतं कलमांचं पुस्तक नाही तर मानवी जीवन व्यवहाराशी संबंधित असून  विविध  दाखले देत संविधानातील कलमं थेट माणसाच्या जगण्याशी  कसे जोडले गेलेत हे वारेंनी  उलगडून दाखवले.
      संविधान हे अस्मितेचा मुद्दा बनविण्याची गरज नाही. आणि त्याबाबतीत भीतीही बाळगण्याचे कारण नाही. काळानुरूप घटनेत बदल करण्याची तरतूद डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी करून ठेवली. त्या तरतुदींना अधीन राहून समाजाच्या भल्याकरिता बदल होणे अपेक्षित आहे. संविधान हा काही धर्मग्रंथ नाही असे असे सडेतोड मत त्यांनी मांडले. आपले संविधान हे नागरिकांना विकासाची हमी देणारं आहे. काही लोक धर्मनिरपेक्षता व समाजवाद हे प्रास्ताविकेत इंदिरा गांधींनी नंतर घुसडल्याचे आरोप करतात. मात्र त्यात तथ्य नाही. जे तत्व घटनेच्या पाना -पानावर आहे ते प्रस्ताविकेत इंदिरा गांधींनी घटनादुरुस्ती करून आणले आहेत, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी अनेक कलमं समाजाची सामाजिक, आर्थिक व राजकीय उन्नती करणारे कसे आहेत हे पटवून दिले.
     या कार्यक्रमास  प्रमुख पाहुणे म्हणून नॅशनल एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मुस्तफा मेमन, सेवादलाचे राज्य कार्यकारिणी सदस्य विद्याधर ठाकूर, वाडा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक पाटील, सामाजिक कार्यकर्ते सुनिल आहिरे आदी उपस्थित होते.व्याख्यानाला वाडेकर रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.  यावेळी चले जाव चळवळीच्या लोकजागर यात्रेत पथनाट्याद्वारे प्रबोधन करणाऱ्या वाडा मॅनेजमेन्ट कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा व पथनाट्याचे लेखन, दिग्दर्शन करणाऱ्या प्रा. किरण थोरात यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्र सेवा दलाचे तालुकाध्यक्ष हृषीकेश सावंत यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुका सचिव सुहास भेरे, संतोष सांबरे, सुनिल भडांगे, रूपेश मोकाशी, मिलिंद पालवे, आतीश बागूल, अनिल शेलार, निहेश गायकवाड, राहुल शिरसाठ यांनी विशेष मेहनत घेतली.

comments

About Rajtantra

Scroll To Top