करोना अपडेट : जाणून घ्या जिल्ह्यातील सध्याची परिस्थिती!

ग्रामीण तालुक्यांमधील दैनंदिन रुग्णांचा आकडा एकेरी!

0
679

पालघर, दि. 8 : गेल्या दोन ते अडीच महिन्यात महाराष्ट्रासह देशभरात करोनाच्या दुसर्‍या लाटेने हाहाकार माजवला. ऑक्सिजन बेड्स, व्हेंटीलेटर्स बेड्स व रेमडेसिविर इंजेक्शनच्या तुटवड्यामुळे अनेकांना या दुसर्‍या लाटेत आपला जीव गमवावा लागला. आता मात्र करोनाची परिस्थिती बर्‍यापैकी आटोक्यात येत असल्याचे आकडेवारीवरुन दिसुन येत असुन त्यामुळे देशातील विविध भागात लागू करण्यात आलेला लॉकडाऊन उठविण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. महाराष्ट्रातही 7 जूनपासुन टप्प्याटप्प्यात निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. सध्याच्या स्थितीत पालघर जिल्ह्यातील करोना रुग्णांची दैनंदिन आकडेवारी देखील दिलासादायक असुन विशेष करुन ग्रामीण तालुक्यांमध्ये संसर्गाचे प्रमाण लक्षणियरित्या कमी झाले आहे.

जिल्हा माहिती कार्यालयातर्फे जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, जिल्ह्यात (ग्रामीण) आज, मंगळवारी 126 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यात सर्वाधिक पालघर तालुक्यातील (64) रुग्णांचा समावेश असुन त्याखालोखाल वसई ग्रामीणमध्ये 45, विक्रमगडमध्ये 8, वाडा व तलासरीत प्रत्येकी 3 व डहाणूत 2 रुग्ण आढळून आले आहेत. मोखाड्यात आज एकही नवा रुग्ण आढळून आलेला नाही. तर वसई-विरार महानगर पालिका क्षेत्रात 114 अशा एकुण 240 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आजच्या आकडेवारीनंतर संपुर्ण जिल्ह्यात 2 हजार 958 अ‍ॅक्टिव रुग्ण असुन यात पालघर ग्रामीणमधील 1 हजार 574 तर वसई-विरार महानगर पालिका क्षेत्रातील 1 हजार 384 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत एकुण 1 लाख 7 हजार 294 रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली असुन 2 हजार 199 रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. यात वसई-विरार महानगर पालिका क्षेत्रातील 1 हजार 371 रुग्णांचा समावेश आहे.

पालघर जिल्ह्यातील दैनंदिन रुग्णांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास जव्हार, मोखाडा, वाडा, तलासरी, विक्रमगड अशा ग्रामीण तालुक्यांमधील आकडा आता एकेरी झाला आहे. तर पालघर, डहाणू व वसई ग्रामीणमध्ये दुहेरी आकड्यांमध्ये रुग्ण आढळून येत आहेत.

दरम्यान, करोनाचा संसर्ग सध्या कमी होत असला तरी तज्ज्ञांनी तिसर्‍या लाटेची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे नागरीकांनी निर्बंध शिथील केले म्हणून करोना संपला असे न समजता काटेकोरपणे करोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन वारंवार राज्य सरकार तसेच स्थानिक प्रशासनाकडुन करण्यात येत आहे.

Print Friendly, PDF & Email

comments