कॅम्लिन कंपनीतर्फे टिमा हॉस्पिटलला ऑक्सिजन प्लांटची भेट!

छोटखानी कार्यक्रमात पार पडला हस्तांतरण सोहळा!

0
410

बोईसर : सामाजिक बांधिलकी जपत बोईसर व आसपासच्या परिसरात विविध सामाजिक उपक्रम राबविणार्‍या येथील औद्योगिक परिसरातील नामांकित मे. कोकुयो कॅम्लिन लिमिटेड कंपनीने आपल्या उपयोगात असलेला नायट्रोजन प्लांट, ऑक्सिजन प्लांटमध्ये परावर्तित करुन करोना रुग्णांवर उपचार करणार्‍या टिमा हॉस्पिटलला भेट म्हणून दिला आहे. आज, मंगळवारी एका छोटेखानी कार्यक्रमात निवडक मान्यवरांच्या उपस्थितीतीत सदर ऑक्सिजन प्लांटचा हस्तांतरण सोहळा पार पडला.

करोनाच्या दुसर्‍या लाटेत संपुर्ण देशभरात निर्माण झालेल्या ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे पंतप्रधान कार्यालयाने उद्योजकांना आपल्या परिने सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत कॅम्लिन कंपनीने टिमा हॉस्पिटलच्या परिसरात विनामुल्य हा ऑक्सिजन प्लांट बसवून दिला आहे. केंद्र आणि राज्य सरकारने कोव्हिड संदर्भात घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांची पूर्णपणे अंमलबजावणी करून कंपनीचे उपाध्यक्ष श्रीराम दांडेकर, टिमा हॉस्पिटलचे ट्रस्टी पोद्दार व बोईसर पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक सुरेश कदम यांच्या हस्ते हा उद्घाटन आणि हस्तांतरण सोहळा पार पडला. याप्रसंगी टिमाचे नोडल अधिकारी डॉ. मनोज शिंदे तसेच उदयन सावे, गुप्ता, निलेश पाटील, कॅम्लिनचे किशोर वठे, अजित राणे, लायन्स क्लबतर्फे डॉ. सूर्यकांत संखे व डॉ. रत्नाकर माने आदींसह टिमा हॉस्पिटल आणि कोकुयो कॅम्लिन कंपनीचा मेंटेनन्स स्टाफ उपस्थित होता. उपस्थित सर्वांनी या सामाजिक व विधायक कार्यासाठी दांडेकर आणि कोकुयो कॅम्लिन व्यवस्थापनाचे कौतुक करून आभार मानले.

हवेतून ऑक्सिजन निर्माण करणार्‍या या प्लांटची प्रति तास 4.5 हजार लिटर प्राणवायू निर्माण करण्याची क्षमता असुन यामुळे 20 ते 25 बेडसाठी अविरत प्राणवायूचा साठा उपलब्ध होऊ शकणार आहे. याचा फायदा परिसरातील गरजू रुग्णांना होऊन त्यांचे प्राण वाचण्यास मदत होणार आहे.

Print Friendly, PDF & Email

comments