विरार दुर्घटना : मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली घटनास्थळाला भेट

मृतांच्या नातेवाईकांना महापालिकेच्या वतीने 5 लाखांची मदत जाहीर!

0
502

वसई, दि. 23 : नाशिकमधील ऑक्सिजन गळती दुर्घटनेमुळे संपुर्ण देश हादरला असतानाच आज मध्यरात्री 3.13 वाजेच्या सुमारास वसई विरार शहर महानगरपालिका हद्दीतील विजय वल्लभ हॉस्पिटलमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागून 13 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच तातडीने पालकमंत्री दादाजी भुसे व त्यानंतर राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी दोन्ही मंत्र्यांनी घटनेबाबत माहिती घेऊन संबंधितांना घटनेच्या अनुषंगाने विविध निर्देश दिले. तर नगरविकास मंत्री शिंदे यांनी या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारने घोषित केलेल्या मदतीच्या व्यतिरिक्त महापालिकेच्या वतीने 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली.

विरार पश्‍चिमेतील तिरुपती फेज 1 भागातील विजय वल्लभ या चार मजली रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केले जात होते. या रुग्णालयात एकूण 90 कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत होते. आज 23 एप्रिल रोजी पहाटे 3 वाजून 13 मिनिटांनी रूग्णालयाच्या दुसर्‍या मजल्यावर असलेल्या आयसीयु युनिटमध्ये एसी स्पार्क होऊन स्फोट झाला व आयसीयु युनिटमधील यंत्रणा ठप्प होऊन आग लागली. घटनेची माहिती मिळताच महानगरपालिका अग्निशमन विभागाने तात्काळ घटनास्थळी जाऊन आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र त्यापुर्वीच या विभागात उपचार घेणार्‍या 17 रुग्णांपैकी 13 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला होता. या रुग्णांना व्हेन्टीलेटर्स व ऑक्सिजन यंत्रणा जोडली होती असल्याने ते हालचाल करू शकले नाही. त्यामुळे आगीत होरपळून त्यांचा मृत्यू झाला.

मृतांमध्ये 5 महिला व 8 पुरुषांचा समावेश असून त्यांची नावे खालीलप्रमाणे :
1) उमा सुरेश कनगुटकर (63 वर्षे, महिला)
2) निलेश भोईर (35 वर्षे, पुरुष)
3) पुखराज वल्लभदास वैष्णव (68 वर्षे, पुरुष)
4) रजनी आर. कुडू (60 वर्षे, महिला)
5) नरेंद्र शंकर शिंदे (58 वर्षे, पुरुष)
6) जनार्दन मोरेश्वर म्हात्रे (63 वर्षे, पुरुष)
7) कुमार किशोर दोशी (45 वर्षे, पुरुष)
8) रमेश टी. उपयान (55 वर्षे, पुरुष)
9) प्रवीण शिवलाल गोडा (65 वर्षे, पुरुष)
10) अमेय राजेश राऊत (23 वर्षे, पुरुष)
11) शमा अरुण म्हात्रे (48 वर्षे, महिला)
12) सुवर्णा एस. पितळे (64 वर्षे, महिला)
13) सुप्रिया देशमुख (43 वर्षे, महिला)

दरम्यान, अशा प्रकारच्या दुर्घटना घडू नयेत, यासाठी पालिका आयुक्तांसह वरिष्ठ अधिकार्‍यांची आढावा बैठक घेऊन तातडीने सर्व रुग्णालयांचे फायर ऑडिट, इलेक्ट्रिक ऑडिट करण्याचे निर्देश मंत्री शिंदे यांनी यावेळी दिले. त्यासाठी व्हिजिलन्स पथक स्थापन करून खासगी तज्ज्ञांचीही मदत घेण्याचेही शिंदे म्हणाले. याप्रसंगी पालघरचे पालकमंत्री दादा भुसे, आमदार रवींद्र फाटक, बहुजन विकास आघाडीचे प्रमुख हितेंद्र ठाकूर, आमदार क्षितीज ठाकूर, पालघरचे जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त आदी उपस्थित होते.

शिंदे म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच, राज्य सरकारच्या वतीने मृतांच्या नातलगांना 5 लाख रुपये आणि जखमींना 1 लाख रुपयांची मदतही जाहीर केली आहे. याखेरीज महापालिकेच्या वतीनेही मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची मदत शिंदे यांनी जाहीर केली.

  • जखमी रुग्णांची योग्य काळजी प्रशासन घेणार! -पालकमंत्री भुसे
    विरार येथील विजय वल्लभ रुग्णालयातील घटना अत्यंत दुर्दैवी असून अशा घटना भविष्यात पुढे घडू नये यासाठी ठोस उपाययोजना करण्यात येणार आहेत तसेच या घटनेतील जखमींची जिल्हा प्रशासन योग्य काळजी घेत आहे, असे कृषी, माजी सैनिक कल्याण मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.
Print Friendly, PDF & Email

comments