राज्यात तीन आठवड्यांचा कडक लॉकडाऊन? मदत व पुनर्वसन मंत्र्यांचे संकेत

0
967
मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार

मुंबई, दि. 9 : 5 एप्रिलपासुन लागू करण्यात आलेले कडक निर्बंध व वीकेण्ड लॉकडाऊनने राज्यात करोना परिस्थिती आटोक्यात येणार नसल्याची चिन्हे असुन, त्यामुळे पुढील तीन आठवडे राज्यात कडक लॉकडाऊन जाहीर करावे, अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याची माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे. रेल्वे प्रवासावर निर्बंध आणण्याचे संकेत देखील त्यांनी दिले आहेत. त्यामुळे सरकारतर्फे पुढील काही दिवसात निर्बंध शिथील होतील, अशी अपेक्षा व्यक्त करणार्‍या नागरीकांसह व्यापारी वर्गाची चिंता वाढली आहे.

करोना रुग्णांची झपाट्याने वाढत असलेली संख्या पाहता राज्य सरकारने 5 एप्रिलपासुन कठोर निर्बंध लादले आहे. यात शनिवार व रविवारी कडक लॉकडाऊनचा देखील समावेश आहे. या निर्बंधांमध्ये जीवनावश्यक वस्तुंची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश असल्याने व्यापारी वर्गाकडून त्याला कडाडून विरोध होत आहे. असे असताना आता मदत व पुनर्वसन मंत्री वडेट्टीवार यांनी पुढील तीन आठवडे लॉकडाऊन लादण्याचे संकेत दिले आहेत.

वडेट्टीवार म्हणाले की, राज्यात वीकेण्ड लॉकडाऊनची नितांत आवश्यकता होती. मात्र सध्या ज्या गतीने रुग्णसंख्या वाढत आहे ते पाहता वीकेण्ड लॉकडाऊन पुरेसा नाही. कारण पुढच्या दहा दिवसांत करोना रुग्णांचा एकूण आकडा 10 लाखांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. आम्ही कितीही उपाययोजना केल्या तरी मनुष्यबळ कमी पडणार आहे. डॉक्टर, नर्स कमी पडतील. हे सगळे आणणार कुठून? त्यामुळे किमान तीन आठवड्यांचा पूर्ण लॉकडाऊन लावावाच लागेल. आपत्ती व्यवस्थापन खात्याचा मंत्री म्हणून मी आज मुख्यमंत्र्यांना ही विनंती करणार आहे. कडक लॉकडाऊनशिवाय लोकांचे प्राण वाचवणं अशक्य आहे. एकीकडं महाराष्ट्रातील दिवसेंदिवस परिस्थिती चिघळत आहे आणि दुसरीकडे केंद्र सरकारने मदतीचा हात आखडता घेतला आहे. त्यामुळे आपल्याला लॉकडाऊनची गरज असल्याचे वडेट्टीवार म्हणाले.

दरम्यान, मुंबई लोकल ट्रेनमधील गर्दी कमी करणेही आवश्यक आहे. आता सरसकट सुरू असलेल्या लोकलवर बंधन आणावी लागतील. प्रवासावर निर्बंध आणावे लागतील. काही वेळा ठरवून द्याव्या लागतील. आरोग्य यंत्रणेला बाधा येणार नाही हे पाहावं लागेल, असंही वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं.

Print Friendly, PDF & Email

comments