पालघरमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा!

0
301

जिल्ह्याची विकासाच्या दिशेने वाटचाल -पालकमंत्री दादाजी भूसे

पालघर, दि.26 : कृषी, क्रिडा, शिक्षण, आदिवासी विकास अशा क्षेत्रांमधुन पालघर जिल्हा विकासाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचा विश्वास कृषी, माजी सैनिक कल्याण मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भूसे यांनी व्यक्त केला. भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 71 व्या वर्धापन दिनानिमित्त येथील मुख्य शासकिय ध्वजारोहन पालकमंत्री भूसे यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमाप्रसंगी पालघरच्या नगराध्यक्षा उज्वला काळे, खासदार राजेंद्र गावीत, आमदार श्रीनिवास वनगा, जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा पोलिस अधिक्षक दत्तात्रय शिंदे तसेच विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी, नागरीक, स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरीक आदि उपस्थित होते. भूसे म्हणाले की, जिल्ह्यामध्ये विविध कृषी योजनेच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना फायदा झाला आहे. बिरसा मुंडा कृषी क्रांतीकारी योजना आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेमधून जिल्ह्यातील एकुण 1 हजार 65 शेतकर्‍यांनी लाभ घेतला आहे. जिल्ह्यातील जव्हार आणि मोखाडा तालुक्यात अति दुर्गम आदिवासी भागातील शेतकरी पारंपारिक भात, नाचणी व वराईची शेती करतात. आदिवासी शेतकरी स्वतः आधुनिक शेतीकडे वळले आहेत. त्यांनी कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली स्ट्रोबेरी झाडांची लागवड करून आपला आर्थिक स्थर उंचावला आहे. जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी 26 हजार स्ट्रोबेरीच्या रोपांची प्रायोगिक तत्त्वावर लागवड केली असून प्रती दिन 250 किलो स्ट्रोबेरीचे उत्पादन मिळत आहे. याची बाजारपेठेत प्रती किलो 200 रुपये प्रमाणे विक्री करण्यात येत आहे. तर जिल्ह्यात जवळपास 550 हेक्टर क्षेत्रावर मोगरा लागवड झाली आहे. यापासून शेतकर्‍यांना मोठा आर्थिक हातभार लागत आहे. मोगरा लागवड केलेल्या शेतकर्‍यांचे गट करून जव्हार येथे वृंदावन पुष्प उत्पादक शेतकरी कंपनी स्थापन करण्यात आली असून सर्व शेतकर्‍यांची फुले दादर-मुंबई बाजारपेठेत सकाळी लवकर पोहचत आहेत. शेतकर्‍यांची आर्थिक परिस्थिती सुधारावी याकरिता पिक पद्धतीत बदल करण्यावर भर देण्यात आला आहे. या माध्यमातून महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत 7281 लाभधारकांनी विविध फळपिकांची 3558.07 हेक्टरवर लागवड करून राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. यामध्ये प्रामुख्याने काजूच्या जवळ पास 2 लाख कलमांची लागवड करण्यात आली आहे. तसेच एक जिल्हा एक उत्पादन योजनेअंतर्गत चिकू पिकाची राज्यस्तरावरून निवड करण्यात आली असल्याचे पालकमंत्री दादाजी भूसे यांनी सांगितले.

जिल्ह्यामध्ये महाआवास अभियान राबवण्यात येत आहे. या अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेत 25 हजार 759 लाभार्थ्यांना घरकुले मंजूर करण्यात आली आहेत. त्यापैकी 21 हजार 195 घरे आज अखेर पूर्ण झालेली आहेत. याच बरोबर राज्य पुरस्कृत रमाई, शबरी आणि आदिम योजनेंतर्गत 6106 लाभार्थ्यांना घरकुले मंजूर करण्यात आली असून यापैकी 4006 घरकुले पूर्ण झालेली आहेत. या अभियानांतर्गत जिल्ह्याचे शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. जल जीवन मिशन योजने अंतर्गत सन 2020-21 मध्ये 68,843 कुटुंबांना वैयक्तिक स्वरूपात नळाने पाणीपुरवठा पुरविण्यासाठी कनेक्शन पुरविण्यात आले आहेत. जिल्ह्यामध्ये कातकरी उत्थान अभियानंतर्गत खाजगी जागेवरील 3188 घरांचे, बॅवन विभागाच्या जागेवरील 820 घरांचे, शासकीय जागेवरील 393 घरांचे, आणि गावठाण जागेवरील 2755 घरांचे अतिक्रमण नियमानाकूल करून आदिवासीच्या नावे करून दिली आहेत. जिल्हा वनहक्क समिती कक्ष स्थापन करून वनहक्क दावे मंजूरीचे कामे मोठ्या प्रमाणात चालू आहेत. जिल्ह्यात वनहक्क कायद्यांतर्गत आजअखेर 44 हजार 522 वैयक्तिक वनहक्क दावे मंजूर करण्यात आले असून त्याचे क्षेत्र 50 हजार 385 एकर इतके आहे. मागिल 4 महिन्यात 4229 वैयक्तिक वनहक्क दावे मंजूर करून, आदिवासींना हक्क देण्यात आले आहेत. तसेच 437 सामुहिक वनहक्क दावे मंजूर असून त्याचे क्षेत्र 55 हजार 41 एकर इतके आहे, अशी माहिती भूसे यांनी याप्रसंगी दिली.

  • रोजंदारीवर काम करणार्‍या मजूरांना पौष्ठीक अन्न माफक दरात मिळावे यासाठी शिवभोजन योजना चालू करण्यात आली होती. या योजनेला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. या वर्षभरात 4 लाख 53 हजार 119 थाळ्यांचे वाटप करण्यात आले आहे. शिवभोजन केंद्रामधून प्रति दिन 2850 थाळ्यांचे वाटप करण्यात आले असल्याचे पालकमंत्री दादाजी भूसे यांनी सांगितले.
  • क्यार व महा चक्रीवादळामुळे झालेल्या अवेळी पावसामुळे शेतीपिकांच्या नुकसानीपोटी आपद्ग्रस्तांना विशेष दराने मदत देण्यासाठी 42 कोटी 74 लाख 78 हजार रुपये इतके अनुदान शासनामार्फत वाटप करण्यात आलेले आहे.
  • जुन ते ऑक्टोबर 2020 मध्ये अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे शेतपिकांच्या नुकसानीपोटी आपद्ग्रस्तांना विशेष दराने मदत देण्यासाठी रक्कम रुपये 25 कोटी 58 लाख 52 हजार रुपये अनुदान वाटप करण्यात आले.
  • जिल्ह्यात मजुरांना गावातच रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी 9 हजार 550 रुपये एवढ्या मोठ्या प्रमाणावर कामे उपलब्ध करुन दिली असल्याचे पालकमंत्री म्हणाले.

जिल्ह्यासाठी 19 हजार 500 कोव्हिशिल्ड लस प्राप्त झाली असून 17 हजार 411 जणांना लस देऊन उद्दिष्ट गाठायचे आहे. यात पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचार्‍यांना ही लस देण्यात आली आहे, असे सांगतानाच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकार झालेले माझे कुटुंब माझी जबाबदारी या अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यात जनजागृती करुन कोव्हिड रुग्णाच्या संख्येत नियत्रंण आणण्यात आले आहे. त्यामुळे कोव्हिड रुग्ण बरे होण्यामध्ये पालघर जिल्हा आघाडीवर आहे. जिल्ह्यात एकुण 45 हजार कोव्हिड रुग्ण आढळून आले होते. यापैकी 97 टक्के रुग्ण बरे झाले असल्याचे पालकमंत्री दादाजी भूसे यांनी सांगितले.

Print Friendly, PDF & Email

comments