पालघर जिल्हा न्यायालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा

0
164

पालघर, दि. 25 : पालघर जिल्हा न्यायालयात जिल्हा न्यायाधीश तथा पालघर विधी सेवा समितीचे अध्यक्ष डी. एच. केळुसकर यांच्या अध्यक्षतेखाली आज, सोमवारी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात आला. पालघर बार असोसिएशनचे अध्यक्ष संजय पाटील यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना सादर केली. तद्नंतर प्रमुख वक्ते दांडेकर महाविद्यालयाच्या मराठी विषय विभागाचे प्रमुख प्राध्यापक विवेक कुडू यांनी मराठी भाषा संवर्धन व आपली जबाबदारी या विषयावर सखोल मार्गदर्शन केले.

माणसांचा जो विकास झाला त्यात भाषेचे विशेष महत्त्व आहे. भाषा ही केवळ संपर्क साधन नसून आपली संपत्ती आहे. भौतिक संस्कृतीत वावरताना अभौतिक संस्कृती लयास जाणार नाही याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. प्राण्यांची भाषा मर्यादीत असते. केवळ त्यांच्या जातीचे संवर्धन आणि संरक्षण या भोवतीच फिरत असते. या उलट माणसांची भाषा परिपूर्ण असते. म्हणूनच माणसांनी आपली भाषा जपली पाहिजे. प्रमाण भाषा आणि बोली भाषा या टिकल्या पाहिजेत. एका सर्वेक्षणानुसार दर 15 दिवसात एक बोली भाषा नाहिशी होते. म्हणूनच प्रमाण भाषेप्रमाणे बोली भाषेचे जतन झालेच पाहिजे. प्रमाण मराठी भाषा ही सोय आहे. प्रत्येक बोली भाषेचा एक वेगळा लहेजा आहे. म्हणूनच आपणच जास्तीत जास्त आपल्या भाषेतून बोलले पाहिजे तरच आपल्या भाषेचे संवर्धन होण्यास मदत होईल, असे प्रा. कुडू म्हणाले. कुसुमाग्रजांनी म्हटल्याप्रमाणे भाषा ही स्विकारार्य असणे आवश्यक आहे. ज्याप्रमाणे इंग्रजी भाषा जेथे जाईल तेथील नवीन शब्द स्विकारते त्यामुळेच इंग्रजी भाषा विस्तारत गेली. भाषा संपत्ती आहे, भाषा ही संस्कृती दर्शक आहे, भाषा ही मुल्यदर्शक आहे. त्यामुळे आपली भाषा आपणच टिकवली पाहिजे, असे प्रा. कुडू यांनी उपस्थितांना संबोधित केले.

अ‍ॅडव्होकेट सुधीर गुप्ता आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, केंद्र सरकारच्या कायद्यांचे मराठी भाषेत अनुवाद तसेच कोर्टाची भाषा मराठी असल्यामुळे संपूर्ण कामकाज मराठी भाषेत सुरू करण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत. इतर राज्यांप्रमाणे मुंबई उच्च न्यायालयात सुद्धा महाराष्ट्र राज्याच्या राज भाषेतून जास्तीत जास्त कामकाज चालावे याबाबतीत न्यायालयाने आणि वकिलांनी पुढाकार घ्यावा, असे मत गुप्ता यांनी याप्रसंगी व्यक्त केले.

अ‍ॅड. संजय दळवी यांनी उपस्थितांचे आभार मानले आणि कार्यक्रमाची सांगता केली. या विशेष कार्यक्रमात सह दिवाणी न्यायाधीश ए. बी. जाधव व श्रीमती एस. डी. साबळे यांच्यासह पालघर बार असोसिएशनचे उपाध्यक्ष अ‍ॅड. सुरेश महाडिक, सचिव अ‍ॅड. प्रशिला मोरे, तालुका विधी समितीचे पॅनल वकिल, पालघर कोर्टातील वकील तसेच न्यायालयातील इतर कर्मचारी उपस्थित होते.

Print Friendly, PDF & Email

comments