कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट पूर्ण करणार्‍या आरोग्य अधिकार्‍यांचा सत्कार

0
205

पालघर, दि. 13 : कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट पूर्ण केल्याबद्दल डहाणू व जव्हार तालुक्याच्या वैद्यकीय अधिकार्‍यांचा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा आरोग्य समिती सभापती निलेश सांबरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. जव्हार तालुका आरोग्य अधिकारी डॉ. किरण पाटील व डहाणू तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप गाडेकर यांना यावेळी गौरविण्यात आले.

आदिवासी लोकसंख्या अधिक असणार्‍या डहाणू व जव्हार या दोन तालुक्यांनी कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट पूर्ण करून उत्तम कामगिरी केली असून इतर तालुक्यांनी त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन त्यांनीही लवकरात लवकर आपले उद्दिष्ट पूर्ण करावे, असे प्रतिपादन यावेळी उपाध्यक्ष सांबरे यांनी केले.

कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करण्यामध्ये जव्हार तालुक्याने 120% तर डहाणू तालुक्याने 110% उद्दिष्ट पूर्ण केले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य शिबिरे आयोजित करून कोरोना काळात आतापर्यंत जव्हारने 447 उद्दिष्ट असताना 555 शस्त्रक्रिया केल्या. यात 9 पुरुष शस्त्रक्रियांचा समावेश आहे. तर डहाणू तालुक्याने 1229 उद्दिष्ट असताना 1331 शस्त्रक्रिया केल्या. यात 18 पुरुष शस्त्रक्रियांचा समावेश आहे. आरोग्य सेविकांनी यामध्ये विशेष मोलाची भूमिका बजावली.

यावेळी आरोग्य समितीचे सर्व सदस्य, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद सूर्यवंशी, अति. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद चव्हाण, डॉ. अजय ठाकरे, डॉ. सागर पाटील तसेच सर्व तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते.

Print Friendly, PDF & Email

comments