पालघर : पथसंस्था संचालिकेच्या हत्येचा छडा लावण्यात पोलिसांना यश; 37 वर्षीय आरोपीला बेड्या

0
573

पालघर, दि. 13 : शहरातील श्री अष्टविनायक पतसंस्थेतील संचालिकेच्या हत्येचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले असुन सदर पतसंस्थेच्या शेजारीच असलेल्या इंग्लिश स्पिकिंग क्लासचालकाच्या भावाने डोक्यात हाथोडीने प्रहार करुन ही हत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. विशेष म्हणजे आरोपीनेच मृत महिलेच्या हत्येची माहिती तिच्या कुटूंबियांना दिली होती.

या गुन्ह्याबाबत माहिती देण्यासाठी पालघर पोलीस अधीक्षक कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी सांगितले की, पालघर शहरातील ओम शांती देवा अपार्टमेंटमधील रुम नं. 11 मध्ये सन 2006 पासून श्री अष्टविनायक नागरी सहकारी पतसंस्था सुरु आहे. येथे संचालिका म्हणून काम करणार्‍या साधना रामकृष्ण चौधरी (वय 57) यांचा गेल्या 9 जानेवारी रोजी कार्यालयातच रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी पालघर पोलिसांत अज्ञात इसमाविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करुन तपास सुरु करण्यात आला होता. मात्र गुन्ह्यानंतर कोणताही पुरावा मागे न सोडल्याने पोलिसांसमोर आरोपीपर्यंत पोहोचण्याचे आव्हान निर्माण झाले होते. अशात घटनास्थळावरील परिस्थिती तसेच तांत्रिक तपासावरुन काही धागेदोरे पोलिसांच्या हाती आले व पतसंस्थेच्या कार्यालयाशेजारी असलेल्या इंग्लिश स्पिकिंग क्लासचालकाच्या 37 वर्षीय भावाला संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आले. त्याची कसून चौकशी केल्यानंतर आपणच हाथोडीने डोक्यात प्रहार करुन साधना यांची हत्या केल्याची कबुली त्याने दिली.

या हत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट असुन गुन्ह्याचा पुढील तपास पालघरचे उप विभागीय पोलीस अधिकारी प्रशांत परदेशी करत आहेत.

  • आरोपीनेच दिली हत्येची माहिती
    साधना चौधरी या 9 जानेवारी रोजी आपल्या नेहमीच्या वेळेत कार्यालयातून घरी न परतल्याने त्यांच्या कुटूंबियांनी त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधला होता. मात्र साधना यांनी त्यास प्रतिसाद दिला नव्हता. त्यामुळे कुटूंबियांनी पतसंस्थेच्या कॅशियरशी संपर्क साधून ही बाब सांगितल्यानंतर कॅशियरने आरोपीलाच फोन करुन साधना कार्यालयात आहेत का हे पाहण्यास सांगितले होते. यानंतर आरोपीने आपण पाहतो असे सांगून काही वेळाने त्यांची हत्या झाल्याची माहिती दिली होती. आरोपी हा नेहमीच पतसंस्थेच्या कार्यालयात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच पोलीस तपासात आपण सहकार्य करत असल्याचा बनाव करुन त्याने पोलिसांना देखील गुंगारा देण्याचा प्रयत्न केला.
Print Friendly, PDF & Email

comments