बोईसर : दुहेरी हत्याकाडांतील आरोपींना 25 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी

0
2056

घरगुती वादातून पतीनेच केली कथित पत्नी व मुलीची हत्या

बोईसर, दि. 23 : पास्थळ स्थित छाया निवास संकुलातील दुहेरी हत्याकांडाप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींना पालघर जिल्हा न्यायालयाने 25 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात, या गुन्ह्यातील मुख्य आरोपी रविंद्र राजाराम पवार हा आपलं नाव बदलून बोईसरमध्ये रहात असल्याचे व त्याने मृत महिलेव्यतिरीक्त आणखी दोन महिलांशी विवाह केल्याचे समोर आले आहे. दरम्यान, घरगुती वादातून 6 डिसेंबर रोजी रविंद्र पवारने आपली कथित पत्नी व मुलीची हत्या केली होती. यानंतर तो उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथे फरार झाला होता.

छाया निवास या रहिवासी संकुलातील एका फ्लॅटमध्ये राहणार्‍या 48 वर्षीय लक्ष्मी पवार व त्यांच्या 20 वर्षीय मुलीचा राहत्या घरी मृतदेह आढळून आला होता. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी परिसरातील सीसीटिव्ही फुटेज तपासल्यानंतर 6 डिसेंबर रोजी ही घटना घडल्याचे व यादरम्यान एक इसम संशयास्पदरित्या इमारतीतून ये-जा करत असल्याचे आढळून आले होते. तसेच तपासादरम्यान पोलिसांना घरात काही कागदपत्रे सापडली होती. ज्याच्यावरुन मृत महिलेचा पती मुळचा उत्तर प्रदेशातील रहिवासी असताना आपले खरे नाव व ओळख लपवून बोईसरमध्ये रहात असल्याचे समोर आले होते. अधिक तपासानंतर आरोपी आपल्या मुळगावी मिर्झापूर येथे लपून बसला असण्याची शक्यता व्यक्त करुन स्थानिक गुन्हे शाखेचे पथक उत्तर प्रदेशकडे रवाना झाले होते. यानंतर आरोपीला अटक करण्यात आली. तर या गुन्ह्यात त्याला मदत करणारा हरिश्‍चंद्र यादव याला बोईसरमधुन अटक करण्यात आली.

अटकेनंतर दोन्ही आरोपींना पालघर जिल्हा न्यायालयात हजर केले असताना न्यायालयाने दोघांनाही 25 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपी रविंद्र पवारने लक्ष्मी पवार यांच्या व्यतीरिक्त अन्य दोन महिलांशी देखील विवाह केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.

Print Friendly, PDF & Email

comments