बोईसर : पास्थळ येथील दुहेरी हत्याकाडांतील आरोपीला युपीतुन अटक

0
1705
संग्रहित छायाचित्र

बोईसर, दि. 20 : काही दिवसांपुर्वी बोईसरमधील पास्थळ भागात स्थित छाया निवास संकुलातील एका फ्लॅटमध्ये दोन महिलांचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती. पोलिसांच्या प्राथमिक तपासात या दोन्ही महिलांची हत्या झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानुसार बोईसर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अधिक तपास करत उत्तर प्रदेश राज्यातील मिर्झापूर जिल्ह्यातून आरोपीला अटक केली आहे. या हत्याकांडामागील कारण अद्याप समोर आले नसुन पोलिस पत्रकार परिषद घेऊन याबाबत अधिकृत माहिती देणार असल्याचे कळते.

11 डिसेंबर रोजी छाया निवास या रहिवासी संकुलातील एका फ्लॅटमध्ये राहणारी 48 वर्षीय महिला व तिच्या 20 वर्षीय मुलीचा मृतदेह आढळून आला होता. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी परिसरातील सीसीटिव्ही फुटेज तपासल्यानंतर 6 डिसेंबर रोजी मृत महिलेच्या पतीनेच या हत्या केल्याचे स्पष्ट झाले. तसेच तपासादरम्यान पोलिसांना घरात काही कागदपत्रे सापडली होती. ज्याच्यावरुन मृत महिलेचा पती मुळचा उत्तर प्रदेशातील रहिवासी असताना आपले खरे नाव व ओळख लपवून बोईसर राहात असल्याचे समोर आले. दरम्यान, पोलिसांनी मृत महिलेच्या मुलाची चौकशी केल्यानंतर आरोपी आपल्या मुळगावी मिर्झापूर येथे लपून बसला असण्याची शक्यता व्यक्त करुन स्थानिक गुन्हे शाखेचे पथक उत्तर प्रदेशकडे रवाना झाले. येथे तपास केल्यानंतर अखेर आरोपी पोलिसांच्या हाती लागला. यानंतर त्याला बोईसर पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आले.

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आरोपीची कसून चौकशी करत आहेत. या हत्याकांडामागील कारण उद्याप समोर आले नसुन पोलिसांची चौकशी पुर्ण झाल्यानंतर लवकरच पत्रकार परिषद घेऊन याबाबत अधिकृत माहिती दिली जाण्याची शक्यता आहे.

Print Friendly, PDF & Email

comments