माजी मंत्री विष्णू सवरा अनंतात विलीन; सवरा यांचे कार्य नेहमीच स्मरणात राहील -देवेंद्र फडणवीस

0
1254

वाडा, दि. १० : माजी आदिवासी विकास मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री विष्णू सवरा यांच्या पार्थिवावर आज, गुरुवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास त्यांच्या मुळगावी वाडा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राज्याचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सवरा यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी वाड्यात आले होते. या प्रसंगी बोलताना त्यांनी सवरा यांच्यासोबत काम करतानाच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला व सवरा यांनी केलेली कामे नेहमीच स्मरणात राहतील, अशा भावना व्यक्त केल्या.

सवरा यांचे पार्थिव गुरुवारी सकाळी त्यांच्या राहत्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पालघर व ठाणे जिल्ह्यासह राज्यभरातून भाजपचे आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. वाड्यातूनही मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.

विष्णू सवरा यांचे काल, बुधवारी दीर्घ आजाराने निधन झाले. ते 70 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी जयश्री, पुत्र डॉ. हेमंत व संदेश, कन्या निशा असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने पालघर जिल्ह्याने एक मितभाषी व हाडाचा कार्यकर्ता असलेला निगर्वी नेता गमावला आहे.

विष्णू सवरा यांचे शिक्षण बी. कॉम. पर्यंत झाल्यानंतर त्यांनी दापचरी येथे रोखपाल पदावर नोकरी केली. त्यानंतर स्पर्धा परिक्षेद्वारे त्यांची स्टेट बॅंकेच्या सेवेत निवड झाली. सवरा हे विद्यार्थीदशेपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडले गेले. 1980 मध्ये त्यांनी स्टेट बॅंकेची नोकरी त्यागून भाजपचे पूर्ण वेळ कार्य सुरु केले. 1980 व 1985 साली त्यांनी वाडा येथून विधानसभा निवडणूक लढवली. 1990 मध्ये ते निवडणूक जिंकले व त्यानंतर अपराजित राहिले. त्यांनी त्यानंतर सलग 4 वेळा वाडा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. 2009 मध्ये ते भिवंडी ग्रामीण मतदारसंघातून निवडून आले. 2014 मध्ये त्यांनी विक्रमगड मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी 2019 ची विधानसभा निवडणूक लढवली नव्हती.

सवरा यांनी भाजपमध्ये विविध पदांवर दीर्घकाळ काम केले. त्यांनी 1995 मध्ये युतीच्या सत्ताकाळात बांधकाम मंत्री पदाची व 2014 ते 2019 या कालावधीत आदिवासी विकास मंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली होती.

Print Friendly, PDF & Email

comments