अखेर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ जागे झाले; एसीजी असोसिएटेड कॅप्सुल वर कारवाईचा बडगा

डहाणू दि. 27: आशागड येथील रिकाम्या औषधाच्या कॅप्सुल बनविणाऱ्या एसीजी असोसिएटेड कॅप्सुल कंपनीवर अखेर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) कारवाईचा बडगा उभारला आहे. एमपीसीबीने कंपनीची 5 लक्ष रुपयांची बॅंक गॅरंटी देखील जप्त केली आहे.

एमपीसीबीने 23 जुलै 2020 रोजी कंपनीला भेट देऊन पहाणी केल्यानंतर तारापूर येथील विभागीय कार्यलयाने 1 सप्टेंबर 2020 व 17 ऑक्टोबर 2020 रोजीच्या पत्रान्वये वरिष्ठ कार्यालयाकडे कायदेशीर कारवाईची शिफारस केली होती. वरिष्ठ कार्यालयाने 24 नोव्हेंबर 2020 रोजी शिफारस मंजूर केल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी एमपीसीबीने कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. कंपनीच्या परिसरातील भूजल प्रदूषित केल्याच्या कारणांमुळे आशागड ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेने कंपनीच्या विस्तारास ना हरकत पत्र नाकारले होते. मात्र कंपनी व्यवस्थापनाने भ्रष्ट्र मार्गांचा अवलंब करीत ग्रामसेवक मनोज इंगळे याला हाताशी धरुन बोगस इतिवृत्ताच्या आधारे ना हरकत पत्र मिळवले होते. कंपनीकडे पुरेशी सांडपाणी प्रक्रीया करण्याची यंत्रणा उपलब्ध नसल्यामुळे जिलेटीन युक्त प्रदूषित सांडपाणी प्रक्रीया न करता उघड्यावर सोडले जाते. मात्र वर्षानुवर्षे चालणाऱ्या या प्रकाराकडे एमपीसीबी यंत्रणेने पुर्णता दुर्लक्ष केलेले होते.

केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने डहाणू तालुका पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील घोषित केलेला असल्यामुळे कंपनीला यापूर्वी विस्तार करण्यास परवानगी नाकारण्यात आलेली होती. मात्र कंपनीने उत्पादन क्षमता परस्पर दुपटीने वाढवलेली होती. दरम्यान एमपीसीबीने 100 टक्के सांडपाण्यावर प्रक्रिया करुन पुनर्वापर करण्याच्या अटीवर कंपनीच्या विस्तारास परवानगी दिली होती.

एमपीसीबीच्या नोटीसीतले मुद्दे काय आहेत?

 • कंपनीने कुलींग टॉवर व बगीच्यासाठी 100 टक्के प्रक्रीया केलेले सांडपाणी पुनर्प्रक्रिया करुन वापरण्याच्या अटीचा भंग केला आहे.
 • कंपनीकडे 1000 केव्हीए क्षमतेची 3 व 1250 केव्हीए क्षमतेची 4 विद्युत जनित्रे असून त्याचे ध्वनीप्रदूषण मर्यादित ठेवण्यात कंपनीला अपयश आलेले आहे.
 • कंपनीच्या आवाराबाहेर प्रदूषित व प्रक्रीया न केलेले सांडपाणी सोडले जाते.
 • अस्तीत्वातील सांडपाणी प्रक्रीया केंद्रे अपुरी आहेत.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने कंपनी व्यवस्थापनावर पर्यावरणाचे रक्षण करणे व प्रदूषण नियंत्रित करणेकामी गंभीर दुर्लक्ष व हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवला आहे. व कारणे दाखवा नोटीस बजावून 5 लक्ष रुपयांची बॅंक गॅरंटी जप्त केली आहे. कंपनीला 7 दिवसांत खूलासा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

कारणे दाखवा नोटीसीमध्ये नमूद मुद्दे पुढीलप्रमाणे:-

 • कंपनीला उत्पादन बंद करण्याचे आदेश का देण्यात येऊ नयेत व कंपनीकडून पर्यावरणाचा ऱ्हास केल्याबद्दल नुकसानभरपाई का वसूल करण्यात येऊ नये?
 • कंपनीचा वीजपुरवठा व पाणीपुरवठा बंद करण्याचे निर्देश का पारित करु नयेत?
 • कंपनीवर कायदेशीर कारवाईची प्रक्रीया का सुरु करु नये?

कंपनीला 7 दिवसांत खूलासा करण्याचे निर्देश देण्यात आले असून अन्यथा कायदेशीर कारवाईस प्रारंभ करुन कंपनी बंद करण्याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा नोटीसमध्ये देण्यात आला आहे.

Print Friendly, PDF & Email

comments