20 नोव्हेंबर रोजी माजी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भाजपचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

0
849

डहाणू दि. 18 नोव्हेंबर: भारतीय जनता पक्षातर्फे शुक्रवार, दिनांक 20 नोव्हेंबर रोजी विविध प्रश्नांसाठी पालघर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढणार असल्याचे निवेदन जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला दिले आहे. चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत भूमिका मांडली होती.

निवेदनात मांडलेले मुद्दे पुढीलप्रमाणे:-

 • शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 50 हजार रुपयांची नुकसानभरपाई मिळावी.
 • डहाणू नगरपरिषदेचे मुख्याधिकारी (येथे भाजपची सत्ता आहे), पालघर नगरपरिषद, विक्रमगड व वाडा नगरपंचायत (येथे भाजपची सत्ता नसल्यामुळे सरसकट) मधील भ्रष्ट्राचाराची चौकशी करणे.
 • प्रलंबीत वन दावे तातडीने मंजूर करावेत.
 • रोजगार हमी योजनेची कामे त्वरित सुरु करावीत.
 • आदिवासी विद्यार्थ्यांना नामांकित शाळेत प्रवेश द्या.
 • जिल्ह्यातील मंजूर रस्त्यांची कामे त्वरित सुरु करा. जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागातील भ्रष्ट्राचारी अधिकारी व ठेकेदारांची चौकशी करा.
 • जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयाच्या भ्रष्ट्राचाराची चौकशी करा.
 • वाढीव वीज बिले त्वरित रद्द करा.
 • भात खरेदी केंद्र त्वरित चालू करा.
 • आदिवासींना त्वरित खावटी कर्ज द्या.
 • कुपोषण निर्मूलनातील भ्रष्ट्राचार व बालमृत्यू रोखा.
 • सी.एस.आर. फंडातील भ्रष्ट्राचाराची चौकशी करा.
 • अदानी उद्योग, सद्भावना तपासणी नाका, कॅप्सुल कंपनीमध्ये स्थानिकांना रोजगार द्या.
 • मुंबई बडोदा जलदगती महामार्गांसाठी जमीन घेताना शासकीय निकषांनुसार नुकसानभरपाई द्या.
 • भूकंपप्रवण क्षेत्रातील लोकांना नुकसानभरपाई द्या.

हे मुद्दे वगळले:-

रविंद्र चव्हाण यांनी पत्रकार परिषदेमध्ये सोगवे ग्रामपंचायतीचा ग्रामसेवक एकनाथ दत्तू मेरेच्या भ्रष्ट्राचाराच्या चौकशीची मागणी केली होती. ही मागणी निवेदनातून आता वगळण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागातील उप मुख्य कार्यकारी अधिकारी टी. ओ. चव्हाण हे रविंद्र चव्हाणांच्या पालकमंत्रीपदाच्या कार्यकाळात आलेले व रविंद्र चव्हाणांच्या मर्जीतील अधिकारी मानले जातात. भाजपच्या जिल्हा परिषदेच्या कारकिर्दीतील प्रोटीन घोटाळा व आशागड ग्रामपंचायतीचा शासकीय भूखंड विकणारा ग्रामसेवक मनोज इंगळे यांच्या चौकशा मॅनेज झालेल्या आहेत. ग्रामसेवक मेरेचा भ्रष्ट्राचार काढला तर अन्य ग्रामसेवकांचे भ्रष्ट्राचार पुन्हा बाहेर येतील या काळजीने मेरेला अभय दिल्याचे संकेत आहेत.

Print Friendly, PDF & Email

comments