शाळा बंद असल्या तरी शिक्षण चालू – डहाणूच्या आदिवासी प्रकल्प अधिकारी आशिमा मित्तल उतरल्या मैदानात

0
2103

डहाणू – दिनांक: 6 नोव्हेंबर 2020

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात मागील 9 महिन्यांपासून लॉक डाऊन चालू आहे. शाळा महाविद्यालये बंद आहेत. खासगी व विना अनुदानित शाळांनी Online पद्धतीचा वापर करुन काही प्रमाणात शिक्षण सुरु ठेवले आहे. पुरेशी काळजी घेऊन विद्यार्थ्यांपर्यंत कसे पोहोचता येईल यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र अनुदानित शाळांकडून सातत्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा व संसर्गाच्या धोक्याचा बाऊ करुन शाळा सुरु करण्यास विरोध व्यक्त केला जात आहे. एकात्मिक आदिवासी विकास विभागाच्या डहाणू प्रकल्प कार्यालयाच्या प्रकल्पाधिकारी तथा डहाणूच्या सहाय्यक जिल्हाधिकारी आशिमा मित्तल मात्र कोंडी फोडून आदिवासी विद्यार्थ्यांपर्यत शिक्षण पोचविण्यासाठी मैदानात उतरल्या आहेत. त्यांनी “शाळा बंद, पण शिक्षण आपल्या दारी” हा उपक्रम सुरु करुन तो यशस्वी करण्यासाठी कंबर कसली आहे. त्यांनी स्वतः खडू हाती घेऊन मुलांना शिक्षणाचे धडे देणे सुरु केले आहे.

सोगवे (डहाणू तालुका) येथे मुलांना शिकविताना आशिमा मित्तल

“कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या संकटकाळात पूर्ण देश एकजुटीने लढत आहे. या परिस्थितीतही पोलीस, डॉक्टर्स, नर्सेस, प्रशासन, सफाई कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशासेविका कर्तव्य बजावत असताना शिक्षकांनीही अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी अनलॉक लर्निंगसाठी योगदान द्यावे आणि हा उपक्रम यशस्वी करावा!”
श्रीम. आशिमा मित्तल (भा.प्र से.)
प्रकल्प अधिकारी
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प डहाणू.

सध्या आश्रमशाळा सुरु करणे जिकिरीचे असल्याने आदिवासी विकास विभागाने अनलॉक लर्निंग उपक्रमांतर्गत मुलांना आश्रमशाळेत न आणता शिक्षकांनी त्यांच्या दारात जाऊन त्यांना शिक्षणाचे धडे देणे सुरु केले आहे. डहाणू प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रात 55 आश्रमशाळा असून त्यातून 29 हजार आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आदिवासींकडे स्मार्टफोन/कॉम्प्युटर, इंटरनेटसारख्या सुविधा नसल्यामुळे या विद्यार्थ्यांना Online शिक्षणापासून वंचित रहावे लागले होते. आता आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन व तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करुन मनोरंजक पद्धतीने विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून शिक्षण देण्याचा प्रयत्न केला जात आहे. शिक्षकांनी देखील यासाठी चांगला प्रतिसाद दिला आहे.

आदिवासी प्रकल्प कार्यालयाचे प्रयत्न चालू असताना, काही शिक्षकांनी छुपा विरोध सुरु केला असून त्यासाठी येणाऱ्या अडचणींचा पाढा वाचला जात आहे. महाराष्ट्र राज्य अनुदानित आश्रमशाळा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेने आश्रमशाळा शिक्षकांना “शिक्षण आपल्या दारी” उपक्रमातून मुक्त करावे अशा आशयाची मागणी केली होती. मित्तल यांनी या मागणीला दाद न तेता कांगावेखोर शिक्षकांचे कान उपटले आहेत. त्या स्वतः पाड्यापाड्यावर जाऊन उपक्रम यशस्वी व्हावा यासाठी मेहनत घेत असून मुलांना स्वतः शिक्षणाचे धडे देत आहेत. त्यांच्या या भूमिकेचे शिक्षण क्षेत्रातून स्वागत होत आहे.

Print Friendly, PDF & Email

comments