ग्रामसेवक एकनाथ दत्तू मेरेंच्या भ्रष्ट्राचाराचे पाणी कुठ पर्यंत मुरले? उप मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह! इंगळे/मेरेंचे गॉडफादर कोण?

0
1700

पालघर, दसरा – दि. 25 ऑक्टोबर: जिल्ह्यातील ग्रामसेवक भ्रष्ट्राचाराची कोट्यावधींची उड्डाणे घेत असताना जिल्हा परिषद प्रशासन बघ्याची भूमिका घेत असल्यामुळे भ्रष्ट्राचाराचे पाणी कुठपर्यंत मुरते आहे याचा शोध घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. ग्रामपंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी टी. ओ. चव्हाण यांच्या बोटचेपे भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. डहाणू तालुक्यातील सोगवे ग्रामपंचायतीचा भ्रष्ट्राचार उघडकीस आणणारा उप सरपंच दत्तात्रय अर्जून जगोल याचे विरोधात ग्रामसेवक एकनाथ दत्तू मेरे याने शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करुन दबाव निर्माण केला आहे. ग्रामसेवक मेरे मात्र लॉक डाऊनच्या कालावधीत खरेदी केलेल्या होंडाई क्रेटा या आलिशान 18 लाखांच्या गाडीतून प्रकरण मिटवण्यासाठी मोकळा फिरतो आहे. सध्या त्याची वाडा तालुक्यात बदली झाली आहे. डहाणूत फ्लॅट, बंगला बांधल्यानंतर आता वाड्याचा विकास करण्यास सज्ज झाला आहे

डहाणू तालुक्यातील मनोज सारंगधर इंगळे या ग्रामसेवकाच्या विरोधात अनेक भ्रष्ट्राचाराची प्रकरणे उघडकीस आलेली असताना त्याच्यावर अजून कुठलीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे अन्य भ्रष्ट्राचारी ग्रामसेवकांचा आत्मविश्वास कमालीचा वाढलेला दिसतो आहे. टी. ओ. चव्हाणांना चौकशा करायला वेळ नसल्यामुळे ते ग्रामसेवकांवर देखरेख ठेवतात की त्यांचे गॉड फादर आहेत असा प्रश्न निर्माण झाला आहे.

एकनाथ मेरेचा पाढा पुढीलप्रमाणे आहे:-

एकनाथ मेरेकडे वर्षभरापूर्वी डहाणू तालुक्यातील सोगवे ह्या पेसा अंतर्गत ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक पदाचा पदभार आला.
नोव्हेंबर 2019 मध्ये त्याने ग्रामपंचायतीची अस्तीत्वातील बोअरवेल 1 लाख 19 हजार 800 रुपये खर्चून पुन्हा खोदल्याचे दाखवले. हा खर्च नळपाणीपुरवठा योजना या शिर्षकाखाली 14 व्या वित्त आयोगाच्या निधीतून केला. त्याच्यावर वाटर प्यूरीफायर लावल्याचे दर्शवून 26 हजार 500 रुपयांचा खर्च केला. (ह्या पाणी पुरवठा योजनेचे पाणी गुप्त रित्या विशेष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत असावे असा अंदाज आहे.)
डिसेंबर 2019 मध्ये ग्रामसेवक एकनाथ मेरेने शाळा दुरुस्तीच्या नावाखाली 2 लाख 25 हजार रुपये रोखीने काढले व 2 लाख 95 हजार रुपयांचे धनादेश अदा केले. शाळा दुरुस्ती आधीच झालेली असताना पुन्हा नव्याने दुरुस्तीच्या नावाखाली 5 लाख 20 हजारांची बिले काढल्याची ग्रामस्थांना शंका आली. 26 जानेवारी 2020 च्या ग्रामसभेत यावर चर्चा होणार असल्याचे संकेत मिळाले. एकनाथ मेरेने 14 जानेवारी रोजी श्री साईकृपा सप्लायर्सला अदा केलेले 1 लाख 45 हजार रुपये व निरंकारी फॅब्रिकेशन या नावाने अदा केलेले 1 लाख 50 हजार रुपये त्यांच्याकडून धनादेशाद्वारे परत घेऊन ग्रामपंचायतीच्या बॅंक अकाऊंटमध्ये जमा केले आणि वेळ निभावून नेली.
पुन्हा मार्च 2020 मध्ये शाळा दुरुस्तीच्या नावाखाली 2 लाख 5 हजार रुपये काढले. आणि निरंकारी फॅब्रिकेशन कडून परत घेतलेले 1 लाख 50 हजार आणि साईकृपा सप्लायर्स कडून परत घेतलेले 1 लाख 45 हजार रुपयांचे नव्याने धनादेश काढून त्यांना देण्यात आले. (आधीचे धनादेश बोगस सह्यांनी काढल्याची शंका व्यक्त केली जात होती.) यात भर म्हणून लॉक डाऊन जाहीर झाल्यानंतर निरंकार फॅब्रिकेशन च्या नावे आणखी 1 लाख 30 हजार रुपये अदा करण्यात आले. शाळा दुरुस्तीवर मार्च 2020 मध्ये अधिकचे 3 लाख 35 हजार रुपये काढण्यात आले. 8 लाख 55 हजार रुपयांचा हिशेब मागण्यासाठी लॉक डाऊनमध्ये ग्रामसभा होणार नसल्याने एकनाथ मेरे कोव्हिड लाभार्थी ठरला होता. 30 मार्च 2020 रोजी एकनाथ मेरेने 18 लाखांची नवी कोरी आलिशान होंडाई क्रेटा (MH 48 BT 1460) खरेदी केली.

एकनाथ मेरेचे सर्व सुखाने चालले असताना 17 एप्रिल 2020 रोजी उपसरपंच दत्तात्रय जगोल यांनी सर्व माहिती मागितली. 1 जून 2020 रोजी जगोल यांना ही माहिती मिळाली. आता सर्व जगजाहीर झाले होते. पुन्हा 10 तारखेला एका विकासकामात भ्रष्ट्राचार होत असल्याची जगोल व सहकाऱ्यांना शंका आली. त्यांनी आवाज उठवला. त्यामुळे एकनाथ मेरेने पोलीस स्टेशनला धाव घेतली. पोलीस उप निरीक्षक राहुल पाटील यांनी दोन्ही पक्षात चर्चा घडवून आणली व प्रश्न सोडवला. मात्र त्यानंतर 13 जून रोजी एकनाथ मेरे याने पुन्हा पोलीस स्टेशनला धाव घेतली व 3 दिवस विलंबाने गावचा उपसरपंच दत्तात्रय जगोल, ग्रामपंचायत सदस्य राजेश बाबू तांडेल, ग्रामस्थ दिनेश देवू वळवी व लक्ष्मण नवशा तांडेल यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला.

उपसरपंच दत्तात्रय जगोल यांनी 14 जुलै रोजी पालघर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष निलेश सांबरे यांच्याकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी टी. ओ. चव्हाण यांना चौकशीचे आदेश दिले. चव्हाण यांना चौकशीसाठी वेळ मिळाला किंवा नाही ते अजून समोर आलेले नाही. तूर्तास प्रकरण नजरेआड करण्यासाठी एकनाथ मेरेची वाडा तालुक्यात बदली झाल्याचे समजते आहे. आता लवकरच एकनाथच्या डोक्याने वाडा तालुक्यातील एका ग्रामपंचायतीचा विकासाचा योग जुळून आलेला दिसणार आहे. तूलनेने निलेश सांबरे यांची जिल्हा परिषद प्रशासनावर चांगली पकड आहे. त्यांच्या पकडीमध्ये इंगळे/मेरेंवर मेहेरनजर दाखविणारे टी. ओ. चव्हाण बसतात कि निसटतात याकडे लोकांचे लक्ष लागले आहे.

Print Friendly, PDF & Email

comments