डहाणूचे सुपूत्र राजेश पारेख अनंतात विलीन! कुटूंबीयांच्या सांत्वनासाठी शरद पवारांचा रविवारी डहाणू दौरा!

0
15692

डहाणू दि. 8: डहाणूरोड जनता सहकारी बॅंकेचे चेअरमन राजेशभाई पारेख यांच्यावर आज डहाणूतील मल्याण स्मशानभूमीत अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी डहाणूचे आमदार विनोद निकोले, माजी आमदार पास्कल धनारे, विक्रमगडचे आमदार सुनील भुसारा, डहाणूचे नगराध्यक्ष भरत राजपूत, जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती काशिनाथ चौधरी यांसह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संस्थापक अध्यक्ष श्री शरद पवार हे देखील रविवारी (11 ऑक्टोबर) पारेख कुटूंबीयांचे सांत्वन करण्यासाठी डहाणूत येत आहेत.

काल (बुधवार दि. 7) रात्री 10.10 वाजता हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. ते अवघ्या 57 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी हीना, पुत्र वरुण व कन्या स्तुती असा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने थोरले बंधू सतिष, अजय, मुकेश व त्यांचे कुटूंबीय, सर्व काका व त्यांचे कुटूंबीय यांचा समावेश असलेल्या पारेख कुटूंबीयांचा आधारस्तंभ हरपला आहे. राजेशभाई हे सध्या एच. एम. पी. स्कूलचे विद्यमान चेअरमन होते. त्यांनी डहाणू नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद व लॉयन्स क्लब ऑफ डहाणूचे 2 वेळा अध्यक्षपद भूषविले आहे. ते 1993 पासून एक टर्मचा अपवाद वगळता 2017 पर्यंत डहाणू नगरपरिषदेचे सदस्य होते. त्यानंतर राजेशभाई यांनी तरुणांना संधी देण्यासाठी निवडणूकीच्या राजकारणातून निवृत्ती घेतली.

काल (दि. 7) रात्री 9 च्या सुमारास राजेशभाई यांनी मित्र परिवारासह पावभाजीचे जेवण घेतले. त्यानंतर त्यांना छातीत जळजळ व अस्वस्थपणा जाणवू लागला. पावभाजी तिखट लागल्यामुळे किंवा ॲसिडीटीमुळे त्रास होत असावा असे सुरुवातीला त्यांना वाटले व त्यांनी ॲसिडीटीचे औषध घेऊन पाहिले. मात्र त्रास कमी न झाल्यामुळे मित्र जिग्नेश ठक्कर यांच्या बरोबर स्कूटरवरुन डॉ. देव यांचे श्रद्धा नर्सिंग होम गाठले. तेथे डॉ. देव यांनी राजेशभाईंचा ईसीजी काढला असता तो सामान्य निघाला. डॉ. देव यांनी थोडा वेळ विश्रांती घेण्याचा सल्ला दिला. मात्र पुढील 15 मिनिटांत राजेशभाईना हृदयविकाराचा तीव्र धक्का बसला. त्यात राजेशभाईंची प्राणज्योत मालवली. ही बातमी वाऱ्यासारखी पसरुन रुग्णालयाबाहेर लोकांनी गर्दी केली. डॉ. कांबळे, डॉ. पूनावाला, डॉ. पंडित, डॉ. कन्सारा अशा ज्येष्ठ डॉक्टरांची फौज रुग्णालयात दाखल झाली. मात्र उपचारांची कुठलीही संधी मिळाली नाही. रात्री 10.10 वाजता राजेशभाईंना मृत घोषित करण्यात आले. डहाणूचे नगराध्यक्ष भरत राजपूत हे देखील त्वरेने रुग्णालयात पोहोचले व पहाटेपर्यंत परिस्थितीवर लक्ष ठेवत उपस्थित राहिले.

आज सकाळी राजेशभाईंचे पार्थिव, त्यांच्या दिनक्रमाप्रमाणे प्रथम एचएमपी स्कूल व त्यानंतर जलाराम मंदिर मार्गे, त्यांच्या कार्यालयाकडून स्मशानभूमीत नेण्यात आले. राजेशभाईंचा मोठा चाहता वर्ग पाहता गर्दीची विभागणी करुन राजेशभाईंना अंतिम निरोप देण्यात आला.

Print Friendly, PDF & Email

comments