डहाणूतील वैद्यकीय व्यावसाईकांबद्दल गैरसमज करुन घेऊ नका! – इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डहाणू शाखेचे आवाहन

0
1453

दिनांक 30 सप्टेंबर 2020:- कोरोना साथरोगाच्या काळात डहाणूतील खाजगी डॉक्टर आणि रुग्णालयांचे कर्मचारी जीवाची बाजी लावून लढत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याने एखादे नर्सिंग होम सील झाल्यामुळे बंद केल्याचा अपवाद वगळला तर नर्सिंग होम्स पूर्वीप्रमाणे निरंतर रुग्णसेवा देतच आहेत. त्यामुळे डहाणूतील वैद्यकीय व्यावसाईकांबद्दल गैरसमज करुन घेऊ नका व गैरसमज पसरवू नका असे आवाहन इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डहाणू शाखेतर्फे करण्यात आले आहे. शाखेच्या मानद सचिव डॉ. ज्योती बापट यांनी जारी केलेल्या एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे हे आवाहन केले आहे.

लॉकडाऊनच्या काळापासून डहाणूतील सर्व खाजगी डॉक्टर आपली जबाबदारी पूर्ण निष्ठेने पार पाडत आहेत. आजच्या घडीला सुद्धा २-३ रुग्णालये वगळता बाकी सर्व रुग्णालये खुली आहेत व डॉक्टर रुग्ण तपासत आहेत. जी रुग्णालये बंद आहेत, त्या रुग्णालयांचे डॉक्टर, स्वतः कोरोना बाधित झाले आहेत व ह्यातील काही डॉक्टर तर आजच्या घडीला मुंबईच्या रुग्णालयात दाखल असून उपचार घेत आहेत. डहाणूतील निदान १५ डॉक्टरांना कोरोनाची बाधा ही रुग्णसेवा करतांनाच झाली आहे. अशा डॉक्टरांचे कुटुंबीय देखील संक्रमित झाल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकात दिली असून 55 वर्षा वरील डॉक्टर व हेल्थ केअर वर्कर्स नी कोरोना काळात काम करू नये अशा सरकारची सूचना असताना डहाणूतील बहुतांश ज्येष्ठ डॉक्टर, सतत रुग्णसेवा करीत असल्याबद्दल त्यांचे कौतुक केले आहे.

प्रसिद्धीपत्रकातील अन्य ठळक मुद्दे:

 • काही प्रकारचे रुग्ण ( उदा. पूर्वनियोजित शस्त्रक्रिया ठरविलेले रुग्ण, गर्भारपणातील शेवटच्या आठवड्यातील स्त्रिया ) दाखल करताना कोरोना चाचणी करून दाखल केले जाणे ICMR GUIDELINES प्रमाणे आवश्यक असते. ह्या मार्गदर्शक तत्वांचेच पालन आम्ही रुग्णालयात सेवा देताना करीत आहोत.

 • आम्हाला उप जिल्हा रुग्णालय, डहाणू येथून सूचना मिळाल्यानुसार, दाखवायला आलेल्या रुग्णाला जर ताप, खोकला, श्वासाला त्रास, अर्थात कोरोना सदृश्य लक्षणे असल्यास, त्यांना RT-PCR अथवा रॅपिड ॲन्टीजेन टेस्ट करायला पाठवणे व अशा रुग्णांची पूर्ण माहिती, सरकारी अधिकाऱ्यांना कळविणे बंधनकारक आहे.

 • कोरोनासंदर्भात सुचनांचे उल्लंघन केल्यास, आम्हा खाजगी डॉक्टरांविरुद्ध, सध्या लागू असलेल्या साथरोग प्रतिबंधक कायदा (Pandemic Act) अंतर्गत, गुन्हा दाखल होऊ शकतो.

 • डहाणू परिसरातल्या खाजगी रुग्णालयांमधे कोरोनाग्रस्त रुग्णांना दाखल करून घेणे व उपचार करणे ह्याला मनाई आहे. जर कधी कोरोनाचा रुग्ण आढळला, तर तो दवाखाना अथवा रुग्णालय सील केले जाते. अश्याने कोरोनाची बाधा नसलेले सर्वसाधारण रुग्णांना उपचार देता येत नाही व त्यांचे हाल होतात.

 • कोरोनाचा फैलाव नियंत्रणात आणण्यासाठी, सरकारी यंत्रणेस आम्ही खाजगी डॉक्टर्स आमच्या परीने हातभार लावित आहोत. या दरम्यान काही रुग्ण दिलेला सल्ला मानत नाहीत व ‘त्यांना उपचार दिले जात नाही’ असा गैरसमज करून घेतात.

 • कोरोनाच्या विळख्यातून जनतेस वाचविण्यासाठी लोकांमधील आजाराबद्दलच्या गैरसमजांचे निरसन करणे व लोकांना चाचण्यांसाठी अधिक प्रवृत्त करणे याची नितांत गरज आहे. या बाबी आम्ही खाजगी डॉक्टर समजून आहोत व रुग्णांना समजाऊन देत आहोत.

Print Friendly, PDF & Email

comments