मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, पारसी व जैन या धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना 1 ली ते 10 पर्यंत शिष्यवृत्तीची योजना! 31 ऑक्टोबर – ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख!

0
496
Eklavya Investment

पालघर, दि.17 :- मा. पंतप्रधान यांनी घोषित केलेल्या 15 कलमी कार्यक्रमानुसार राज्यातील मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, पारसी व जैन या धार्मिक अल्पसंख्याक इयत्ता 1 ली ते 10 वी च्या वर्गातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना केंद्र शासनाद्वारे प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. यासाठी नवीन व नुतनीकरण विद्यार्थ्यांना 31 ऑक्टोबर 2020 या अंतिम तारखेपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करता येतील.

प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना पुर्णपणे केंद्र पुरस्कृत असून शालेय व क्रीडा विभागामार्फत दरवर्षी राबविण्यात येते. इयत्ता 1 ली ते 10 वीच्या सर्व शासकीय/निमशासकीय/ खासगी अनुदानित / विना अनुदानित/ कायम विना अनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित मान्यताप्राप्त शाळांकडून शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी ही लागू करण्यात आली आहे. अर्जदार विद्यार्थी मागील वर्षी 50 टक्के पेक्षा जास्त गुणाने उत्तीर्ण झालेला असावा. फक्त इयत्ता 1 लीच्या विद्यार्थ्यांसाठी गुणांची अट लागू राहणार नाही. या योजनेसाठी पालकाचे वार्षिक उत्पन्न रुपये एक लाखापेक्षा कमी असावे. एका कुटुंबातील 2 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार नाही.

अर्ज भरताना विद्यार्थ्यांचा धर्म, कुटुंबाचे उत्पन्न, गुण व टक्केवारी इत्यादी माहिती अचूक भरवी. धर्म, उत्पन्न, गुणपत्रक, आधारकार्ड/ आधार नोंदणी पावती, विद्यार्थ्यांचा फोटो, बँक पासबुकच्या पाहिल्या पानाची प्रत इत्यादी कागदपत्रे मुख्याध्यापकांना सादर करणे बंधनकारक आहे. पालकांचे वार्षिक उत्पन्नाचे प्रमाणपत्र हे सक्षम अधिकाऱ्याने प्रमाणित केलेले असणे आवश्यक आहे. इतर तत्सम शिष्यवृत्तीचा लाभ घेतलेल्या विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करता येणार नाही. एकूण पात्र विद्यार्थ्यांपैकी 30 टक्के शिष्यवृत्ती विद्यार्थीनींसाठी राखीव आहे.

सन 2019-20 मध्ये शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या / शिष्यवृत्ती मिळालेल्या आणि यावर्षी शिष्यवृत्तीच्या अटी पूर्ण करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी सन 2020-21 करिता नुतनीकरण विद्यार्थी म्हणून ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे. नवीन अथवा नूतनीकरण यापैकी एकाच प्रकारचा अर्ज विद्यार्थ्यांना भरता येईल. तसेच एका विद्यार्थ्याने नवीन/ नूतनीकरणासाठी दोनदा अर्ज भरला असेल, तर असे अर्ज बाद ठरवले जातील. विद्यार्थ्यांचे बँक खाते राष्ट्रीयकृत बँकेचे असले पाहिजे, नसल्यास पालकांच्या राष्ट्रीयकृत बँक खात्याची माहिती अर्जात भरता येईल. इयत्ता 1 ली ते 10 वी मधील विद्यार्थ्यांचे नवीन व नुतनीकरणाचे अर्ज National Scholarship Portal (NSP 2.0)(www.scholarships.gov.in) या संकेतस्थळावर भरण्याची जबाबदारी संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांची राहील. हे अर्ज www.minorityaffairs.gov.in या संकेतस्थळावर सुद्धा उपलब्ध आहेत. अर्ज भरताना भ्रमणध्वनी क्रमांक लिहिणे आवश्यक आहे.

Print Friendly, PDF & Email

comments