लविनो कपूर कॉटन्स: त्या कामगाराला पुढील उपचार व हक्काचा पगारही मिळणार!

0
367

दि. 14 सप्टेंबर: तारापूर औद्योगिक वसाहतीतील प्लॉट क्र. एच 1 मधील लविनो कपूर कॉटन्स कारखान्यात 9 महिन्यांपूर्वी अपघातग्रस्त झालेल्या परवेश दर्शन ह्या कामगाराच्या हातांवर शस्त्रक्रिया करण्यासाठी आवश्यक ती एमआरआय तपासणी व्यवस्थापनाकडून करुन घेण्यात आली आहे. आता त्याच्यावरील पुढील शस्त्रक्रियेची दिशा ठरणार आहे. त्याला अपघात झाल्यापासूनच्या कालावधीतील पगार देण्याचे निर्देश देखील कामगार उपायुक्त किशोर दहिफळकर यांनी दिले आहेत.

परवेश दर्शन या कंत्राटी कामगाराला 8 डिसेंबर 2019 रोजी लविनो कपूर कॉटन्स कारखान्यात काम करताना कापूस हाताळणी करणाऱ्या यंत्रात हात जाऊन अपघात झाला होता. त्याच्यावर बोईसरच्या आनंद हॉस्पिटलमध्ये उपचार झाले होते. त्यानंतर त्याच्या हाताच्या पंजाची हालचाल होत नव्हती. त्याची एमआरआय तपासणी केल्यानंतर पुढील शस्त्रक्रिया करणे शक्य होणार होते. मात्र व्यवस्थापनाने त्याला पुढील उपचारासाठी कुठलाही प्रतिसाद न देता वाऱ्यावर सोडले होते. परवेशची आई नियमितपणे कारखान्याच्या अधिकाऱ्यांना विनवणी करित होती. मात्र कुठलाही प्रतिसाद मिळाला नव्हता. दैनिक राजतंत्रने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर परवेशला हक्क मिळण्याची प्रक्रिया काही अंशी सुरु झाली आहे.

ह्या घटनेची कामगार उपायुक्त किशोर दहिफळकर यांनी दखल घेऊन व्यवस्थापनाची झाडाझडती घेतल्यानंतर आता परवेशला दुखापतग्रस्त झाल्यापासूनचा हक्काचा पगार मिळणार आहे. तसे निर्देश दहिफळकर यांनी दिले आहेत. परवेश हा एम्प्लॉईज स्टेट इन्श्युअरन्स कॉर्पोरेशन (ESIC) कडून विमा लाभ मिळविण्यास पात्र असून त्यातूनही भरपाई मिळणे शक्य आहे. मात्र लविनो कपूर व्यवस्थापन व संबंधित कंत्राटदार ESIC चा हप्ता भरला म्हणजे आपले उत्तरदायित्व संपले अशा भावनेत असल्याने परवेशची फरफट थांबताना दिसत नाही. 16 मार्च 2020 रोजीच्या ESIC च्या वसई शाखेने मरोळ (अंधेरी) कार्यालयाला दिलेल्या पत्रानंतर ESIC कडील प्रकरण लाल फितीमध्ये सध्यातरी अडकलेले आहे.

कारखाना निरिक्षकांची व्यवस्थापनाला क्लिन चिट! पोलिसांकडे नोंद नाही!

दरम्यान औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाच्या कारखाना निरिक्षकांनी ह्या अपघातात व्यवस्थापनाला क्लिन चिट देण्याची औपचारिकता आधीच पूर्ण केलेली आहे. ज्या मशिनमध्ये परवेशचा हात गेला, त्या मशिनला सेफगार्ड असल्यामुळे कारखाना व्यवस्थापन निर्दोष असल्याचे निरीक्षक पाटील यांचे म्हणणे आहे. बोईसर पोलिसांपर्यंत ही घटना पोहोचलीच नसल्यामुळे पोलिसांकडून त्याबाबत काहीही चौकशी झालेली नाही.

Print Friendly, PDF & Email

comments