डहाणूला आज तीन भूकंपाचे धक्के; आठवडाभरात 10 वेळा हादरला डहाणू तालुका

0
2620

डहाणू, दि. 8 : डहाणू तालुक्याला मागील आठवड्यापासुन सतत भूकंपाचे धक्के जाणवत असुन आज, मंगळवारी भूकंपमापक उपकरणावर तीन भूकंपाच्या धक्क्यांची नोंद झाली आहे. यात 3.8 रिश्टर स्केलच्या सर्वाधिक तीव्रतेच्या धक्क्याचा समावेश आहे. तर 4 सप्टेंबर रोजी येथे झालेल्या 4 रिश्टर स्केल तीव्रतेच्या मोठ्या भूकंपाच्या धक्क्याने नागरीकांमध्ये घबराट निर्माण केली होती.

डहाणू व तलासरी तालुक्यातील काही गावांना मागील दिड ते दोन वर्षांपासुन सतत लहान-मोठ्या भूकंपाच्या धक्क्यांचा सामना करावा लागत आहे. मागील महिन्यातही अनेकवेळा येथील जमिन भूकंपाच्या धक्क्याने हादरली आहे. तर 1 सप्टेंबरपासुन आतपर्यंत तब्बल 10 वेळा भूकंपाच्या धक्क्याची नोंद झाली आहे. आज, शुक्रवारी मध्यरात्रीपासुन येथील नागरीकांना 3 वेळा भूकंपाच्या धक्क्यांचा सामना करावा लागला आहे. शासनाच्या भूकंपाची माहिती देणार्‍या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यात आज मध्यरात्री 1 वाजून 5 मिनिटांनी 3.1 रिश्टर स्केल, सकाळी 9 वाजून 50 मिनिटांनी 3.8 रिश्टर स्केल, तर 10 वाजून 15 मिनिटांनी 2.5 रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले. यातील सर्वाधिक 3.8 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा केंद्रबिंदू अक्षांश 20.01 व रेखांश 72.80 या भौगोलिक भुगर्भात 10 किलोमीटर खोलवर असल्याचे नमुद करण्यात आले आहे. यापुर्वी 7 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजून 7 मिनिटांनी 3.5 रिश्टर स्केल, 6 सप्टेंबर रोजी पहाटे 4 वाजून 58 मिनिटांनी 2.0 रिश्टर स्केल, 5 सप्टेंबर रोजी सकाळी 6 वाजून 36 मिनिटांनी 2.7 रिश्टर स्केल व मध्यरात्री 12 वाजून 5 मिनिटांनी 3.6 रिश्टर स्केल, 4 सप्टेंबर रोजी रात्री 11 वाजून 41 मिनिटांनी आठवडाभरातील सर्वाधिक तीव्रतेचा 4 रिश्टर स्केल व सकाळी 10 वाजून 33 मिनिटांनी 2.8 रिश्टर स्केल तर 1 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजून 47 मिनिटांनी 2.5 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाची नोंद येथे झाली आहे.

दरम्यान, भूकंपाचे धक्के जाणवत असलेल्या धुंदलवाडी गावाला खासदार राजेंद्र गावीत यांनी काल, सोमवारी भेट देऊन भयभीत नागरीकांना धिर दिला. तसेच संबंधितांना आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सुचना दिल्या.

Print Friendly, PDF & Email

comments