ऑनलाईन फसवणूक करणार्‍या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश

10 लाख रुपयांचा मुद्येमाल हस्तगत; वालीव पोलिसांची कारवाई!

0
701

वसई, दि. 7 : आपल्या मालकी हक्काच्या जागेत मोबाईल टॉवर उभारुन व त्यापोटी दर महिन्याला चांगली रक्कम देण्याचे आमिष दाखवून अ‍ॅग्रिमेंट (करार) च्या नावाखाली नागरीकांची लाखोंची लूट करणार्‍या आंतरराज्यीय टोळीला गजाआड करण्यात वालीव पोलिसांना यश आले आहे. 4 जणांच्या या टोळीकडून एकुण 10 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असुन यात एका एक्सयुव्ही कारसह लॅपटॉप्स, स्मार्टफोन्स, मेमरी कार्ड्स, सिमकार्ड्स, विविध बँकाचे एटीएम कार्ड्स, पॅनकार्ड, तसेच धनादेश पुस्तिकांचा (चेक बुक) समावेश आहे.

लॉकडाऊनच्या काळात देशभरात सामान्य नागरीकांना वेगवेगळ्या गुंतवणुकीच्या सुरस योजना सुचवून किंवा आवश्यक वस्तूंची होम डिलिव्हरी देण्याच्या नावाखाली तसेच इतर अनेक प्रकारच्या भुलथापा देऊन ऑनलाईन आर्थिक गंडा घालण्याच्या घटनांत आश्‍चर्यकारक वाढ झाली होती. त्यामुळे पालघर जिल्ह्यात अशा घटनांना आळा घालण्याकरीता ऑनलाईन फसवणूक करणार्‍या भामट्यांचा शोध घेऊन अपराधांची उकल करण्याबाबत पालघरचे पोलीस अधिक्षक दत्तात्रय शिंदे यांनी जिल्ह्यातील पोलिसांना सुचना केल्या होत्या. अशातच शुक्रवार, 4 सप्टेंबर रोजी वसईतील वालीव पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला ऑनलाईन फसवणूकीचे रॅकेट चालवणारा अजय व त्याचा साथीदार रफिक वसई पुर्वेतील रेंज ऑफिस येथील केटली नामक चहाच्या दुकानात येणार आहे, अशी माहिती मिळाली होती.

या माहितीच्या आधारे वालीव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी व गुन्हेप्रकटीकरण शाखेच्या अधिकारी, कर्मचार्‍यांनी मानवी सापळा रचुन दोघांना यशस्वीरित्या ताब्यात घेतले. यानंतर त्यांना वालीव पोलीस स्टेशनमध्ये आणून त्यांची चौकशी केली असता, अजय महेशनाथ पंडीत हा उत्तर प्रदेश येथील तर रफिक नन्नुशहापाशा शेख हा कर्नाटकातील रहिवासी असुन अजयचा पश्‍चिम बंगाल येथे राहणारा धाकटा भाऊ अभय पंडीत आणि त्याचा मित्र अविनाश आनंद दास असे चौघे मिळून हे रॅकेट चालवत असल्याचे समोर आले.

आरोपींच्या सखोल चौकशीत, अभय पंडित व अविनाश दास या दोघांनी कोलकात्यातील सॉल्टलेक येथे बेकायदा कॉलसेंटर सुरु केले होते. या कॉल सेंटरच्या माध्यमातुन ते विविध राज्यातील लोकांना संपर्क साधुन त्यांना भाडे तत्त्वावर मोबाईल टॉवर उभारणीकरीता जमिनीची मागणी करत असे व त्यापोटी मोठ्या रक्कमेचे मासिक भाडे देण्याचे खोटे आश्वासन देत असे. लोकांचा विश्‍वास संपादित केल्यानंतर हे भामटे त्यांच्याकडून टॉवर उभारणीच्या प्रक्रियेचा भाग म्हणून अग्रिमेंटच्या नावाखाली लाखोंची रक्कम उकळत असे.

स्वत:चे बँक खाते क्रमांक याकामी वापरल्यास पकडल्या जाण्याच्या शक्यतेमुळे हे भामटे गरीब व गरजु नागरीकांच्या आर्थिक विवंचनेचा गैरफायदा घेऊन त्यांना ठराविक रकमांचे आमिष दाखवुन त्यापोटी त्यांचे मुळ कागदपत्र प्राप्त करत असे. यानंतर त्यांच्या नावाने विविध बँक शाखांमध्ये बचत/चालु खाते उघडुन तसेच त्याच कागदपत्रांच्या आधारे मोबाईल सिमकार्ड मिळवुन या मोबाईल क्रमाकांचा नेट बँकिंगसाठी व ओटीपी मिळवण्याकरीता वापर करत होते. त्यामुळे तक्रारी प्राप्त होऊनही पोलीस या टोळीपर्यंत पोहोचू शकत नव्हते.

या टोळीने महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यातील कारधा भागात, मध्यप्रदेशातील छिंदवाडा भागात, कर्नाटकातील हसन जिल्ह्यात व ओडिसा राज्यातील बक्सी बाजार भागातील नागरीकांना अशाप्रकारचा गंडा घातल्याची कबुली दिली असुन या टोळीकडून एम.एच.48/ई.1212 या क्रमांकाची एक महिंद्रा एक्सयुव्ही कार, 2 लॅपटॉप, 8 स्मार्टफोन्स, मेमरी कार्ड, 3 सिमकार्ड, विविध बँकाचे व वेगवेगळ्या इसमांच्या नावाचे 25 एटीएम कार्ड्स, आरोपीतांनी स्थापलेल्या बोगस रुद्रा सोल्युशन कंपनीचे पॅनकार्ड, तसेच विविध बँकांचे एकुण 33 चेक बुक जप्त करण्यात आले आहेत.

वालीव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी विलास चौगुले, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश फडतरे, पोलीस हवालदार रविंद्र पवार, मुकेश पवार, मनोज मोरे, पोलीस नाईक राजेंद्र फड, अनिल सोनावणे, सतिष गांगुर्डे, पोलीस शिपाई बालाजी गायकवाड, स्वप्नील तोत्रे व सचिन बळीद यांनी ही कारवाई केली.

पालघर पोलिसांचे नागरीकांना आवाहन
नागरीकांनी आपल्या बँकेसंबंधी कुठलीही माहिती अनोळखी इसमांना प्रत्यक्ष अगर समाजमाध्यमावरुन किंवा मोबाईलवरुन अप्रत्यक्षपणे शेअर करु नये. तसेच कुठल्याही वाढीव परतावा देणार्‍या कपोलकल्पीत जीओ टॉवर गुंतवणुकीसारख्या योजनांना बळी पडु नये, असे आवाहन यानिमित्ताने पालघर पोलीस दलाकडुन नागरीकांना करण्यात आले आहे.

Print Friendly, PDF & Email

comments