गिधाडांनी मानवी जन्म घेतला असेल का? त्यांना तारापूर एमआयडीसी गवसली असेल का?

(राजतंत्र मिडीया/संजीव जोशी) आज आम्ही गिधाडांविषयी का लिहितो आहोत? त्याला कारण तसेच आहे. तारापूर औद्योगिक क्षेत्रामध्ये गिधाडांनी मानवी जन्म घेतला असण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गिधाडांना माणसाने नीट जगू दिले नाही. ती तारापूर मध्ये आली असती तरी लबाड लांडग्यांनी सांडपाण्यावर प्रक्रिया न करता सोडलेल्या रासायनिक व घातक सांडपाण्यामुळे मृत झालेली जनावरे खायला मिळाली असती. त्यापेक्षा जीवंतपणी किंवा मेल्यावरही कोणाचेही लचके तोडून मोठे होण्याची प्रवृत्ती बाळगणाऱ्या माणसाचा जन्म घेतला तर? असा विचार करुनच काही गिधाडांनी मनुष्य जन्म घेतलेला दिसतो. त्यातूनच प्रदूषणावर नियंत्रण न ठेवणारे किंवा कारखान्यांच्या सुरक्षेची काळजी न घेणारे विकाऊ अधिकारी दुष्परिणामांचे बळी पडणाऱ्यांचे लचके तोडताना दिसत आहेत. कामगारांच्या हितासाठी संघटना चालवीत असल्याचा देखावा करीत प्रत्यक्षात परप्रांतीय कंत्राटी कामगार पुरविणारे ठेकेदार बनून कामगारांचे शोषण करताना दिसताहेत. आणि दुर्घटना घडल्यानंतर दोषींकडे यादी पाठवून पाकिटे स्वीकारणारे देखील दिसताहेत. फक्त गिधाडांनी मानवी जन्म घेतला असता तर त्याचा नक्कीच फायदा झाला असता. पण येथे अनेक प्रवृत्तींनी एकत्रित जन्म घेतलेला दिसतो आहे. 2 दिवसांपूर्वी एका कारखान्यात स्फोट होऊन एकाचा जागीच मृत्यू व 4 जखमी झाल्याची घटना घडली होती. आणखी एक जणाचा मृतदेह दुसऱ्या दिवशी सापडला. हे सर्व मृत व जखमी परप्रांतीय असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे ह्या घटनेच्या मुळाशी जाण्यात यंत्रणेला कितपत यश मिळेल याविषयी मनामध्ये शंका आहे. स्थानिक कामगारांचे मृत्यू पोटात सामावून घेण्याची प्रचंड क्षमता तारापूर एमआयडीसी मध्ये असल्याची जाणीव प्रस्तुत लेखातील एका प्रकरणाद्वारे सहजच स्पष्ट होऊ शकते. परप्रांतीय कष्टकऱ्यांचे मृत्यू तर अधिक सहज पोटात घेणे शक्य आहे.

गिधाड मृतभक्षक वर्गातील पक्षी असून ते प्राण्यांच्या मृतदेहांवर जगतात. वास्तविक गिधाडे निसर्गातील सफाई कर्मचारी मानली जातात. गिधाडे अन्न साखळीतील महत्त्वाचा दुवा आहेत. त्यांची ठेवण इतर शिकारी पक्ष्यांसारखी जरी असली तरी त्यांना शिकार करण्याचे कौशल्य फारच कमी असते. त्यांच्या डोक्यावर पिसे नसल्याने मृतदेहाच्या आतमध्ये डोकावून मांस खाणे त्यांना सोपे जाते. गिधाडांच्या अनेक जाती आहेत. या सर्व जातींचे कार्य एकच म्हणजे मृतदेहांचा फडशा हे असले तरी ह्या सर्व जाती एकमे़कांच्या साह्याने काम करत असतात. ही सर्व गिधाडे मुख्यत्वे उंच आकाशात विहार करत असतात व साधारणपणे कळपात एकमेकांपासून अंतर ठेऊन विहार करणे पसंत करतात. भिन्नभिन्न जातींची गिधाडेसुद्धा एकत्र विहार करतात. प्रत्येक गिधाडाची नजर इतर गिधाडांवर असते. बलशाली गिधाड जेव्हा खाद्य हेरते तेव्हा ते साहजिकच खाद्य जिथे असेल तिथे उतरते. त्याला उतरताना पाहून इतर गिधाडे पण उतरू लागतात व सगळ्या गिधाडांना खबर मिळ्ते, की खाद्य मिळाले आहे. खाद्यापाशी पोहोचल्यावर गिधाडे बराच वेळ वाट बघत असतात. मृतदेहांची कातडी बहुधा अत्यंत जाड झालेली असते व बहुतांशी गिधाडांना ती भेदणे आवाक्याबाहेरचे असते. त्यामुळे ताकदवान गिधाडाने येऊन पहिले काम फत्ते केल्यावर मग बाकी गिधाडांचे काम चालू होते व पाहता पाहता पूर्ण मृतदेहाचा अक्षरक्षः फडशा पडतो. मृतदेहाची हाडे सोडून इतर सर्व भाग पचवण्याची क्षमता गिधाडांमध्ये असते.

भारतात एकेकाळी गेल्या १५ ते २० वर्षांपर्यंत गिधाडांची संख्या चांगली होती परंतु गेल्या काही वर्षात त्यांची संख्या झपाट्याने कमी झाली आहे. ती इतकी कमी झाली आहे की आता गिधाडे भारतातून नामशेष होणार की काय अशी भीती पक्षी निरीक्षकांना व पक्षीप्रेमींना वाटते आहे. गिधाडांची कोणी शिकार करत नाही. त्यांच्या लोकसंख्येला मुख्य फटका बसला आहे ते औषधे व रसायनांमुळे. पाळीव प्राण्यांना डायक्लोफिनॅक नावाचे औषध दिले जाते. औषध घेतलेले असे मेलेले प्राणी खाल्यामुळे गिधाडांमध्ये ते औषध जाते. त्यामुळे गिधाडांच्या शरीरात अनेक व्याघी होतात व ती मरतात. गिधाडे सुंदर नाहीत आणि ते मृतदेह खात असल्याने सामान्य माणसाला त्यांच्याबद्दल तिरस्काराची भावना असते. परंतु ते निसर्गातील अत्यंत महत्त्वाचे काम करतात. गिधाडे नसतील तर मृतदेह सडून रोगराई पसरण्याचा धोका असतो. भारतीय सरकारने या औषधांवर बंदी आणलेली असली तरी ती प्रत्यक्षात मात्र आलेली नाही. इथे माणसांचे मृत्यू बेदखल होतात. तिथे गिधाडांचे काय?

एखाद्या दुर्घटनेत किती चोचींना लचके तोडायला मिळत असतील, त्याचे एक उदाहरण अभ्यासण्यासारखे आहे. तारापूर औद्योगिक वसाहतीतील प्लॉट क्र. K 45/46 वरील एस एस फार्माकेम ह्या रासायनिक कारखान्यात दिनांक 7 ऑक्टोबर 2017 रोजी रोहिदास तुकाराम बारी ह्या कामगाराचा अपघाती मृत्यू झाला. कुठलासा पाईप दुरुस्त करताना वायुगळतीमुळे विषबाधा होऊन ह्या कामगाराने दम तोडला असे समजते. कारखान्याचा व्यवस्थापक सुनील तुकाराम झोपे याने रोहिदास यांना रिक्षामधून डॉ. पराग कुलकर्णी यांच्या गोसालिया पार्क येथील आशीर्वाद हॉस्पिटलकडे नेले. तेथील डॉ. पराग यांनी खाली उतरुन रोहिदास यांना तपासले व ते मृत असल्याचे सांगितले. रोहिदास मृत झाल्यामुळे रिक्षा चालकाने पुढे मृतदेह नेण्यास नकार दिल्यानंतर रुग्णवाहिका मागवून रोहिदास यांचा मृतदेह तृंगा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आला. तेथील डॉक्टरांनी मृतदेहाचा इसीजी काढून तो फ्लॅट आल्यामुळे हृदयविकाराने रोहिदासचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. (मृत माणसाचा इसीजी फ्लॅटच येणार हे सामान्य ज्ञान आहे.) तेथे रोहिदास यांच्या नातेवाईकांना बोलावून त्यांना 6 लाख 50 हजार रुपये नुकसान भरपाई व कामगार विमा देण्याचे आश्वासन देण्यात आले व त्यांच्याकडून रोहिदास यांचा मृत्यू हृदयविकाराने झाल्याचे लिहून घेण्यात आले. तडजोड झाल्यानंतर शवविच्छेदन न करता मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यांनी तडियाळे (डहाणू तालुका) मृतदेह आणून अंत्यसंस्कार केले. तडजोड नोटरी हेमंत पाटील यांच्यासमोर 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर स्वाक्षांकित करण्यात आली. पोलिसांना हिस्सा न देता हा प्रकार घडल्यामुळे पोलिसांनी 9 ऑक्टोबर 2017 रोजी जा. क्र. 7403 अन्वयेच्या समजपत्राद्वारे प्रकरणावर ‘चोच’ मारली. दबाव निर्माण करुन आपले काम फत्ते झाल्यावर कुठलीही कारवाई न करता प्रकरण बंद केले. दरम्यान व्यवस्थापनाने 17 नोव्हेंबर 2017 रोजी विमा कंपनीकडे रोहिदासच्या अपघाती मृत्यूसाठी विमा मिळविण्यासाठी प्रस्ताव दाखल केला. त्यासाठी आवश्यक मृत्यूचा दाखला सालवड ग्रामपंचायतीकडून बिनदिक्कतपणे मिळवण्यात आला. विमा कंपनीने मात्र शवविच्छेदन अहवाल नसल्यामुळे, पोलिसांकडे अपघाताची नोंद नसल्यामुळे व नातेवाईकांनी मृत्यू अपघाती नसून हृदयविकाराने झाल्याचे मान्य केल्यामुळे विमा नाकारला. त्यानंतर नातेवाईकांनी हातपाय आपटण्यास सुरुवात केली. मात्र त्यांचे हातपाय नोटरीसमोर केलेल्या लिखाणाने बांधले गेले होते. वेळ निघून गेली होती.

परवा अपघात झाल्यानंतर 4 जखमींवर तृंगा हॉस्पिटलमध्ये उपचार चालू असल्याचे कळल्यानंतर हा सर्व प्रकार आठवला. आणि गिधाडांनी मानवी जन्म घेतल्याची शंका दाटून आली. अशा गिधाडांचा बंदोबस्त करण्याची वेळ आता आलेली आहे हे मात्र नक्की.

Print Friendly, PDF & Email

comments