डहाणूचे नगराध्यक्ष भरत राजपूत व मुख्याधिकारी अतुल पिंपळे यांचे वाद पोलिसांच्या दारात

0
6110

डहाणूचे नगराध्यक्ष भरत राजपूत आणि मुख्याधिकारी अतुल पिंपळे यांच्यातील वाद आता पोलिस स्टेशनपर्यंत पोहोचला आहे. शनिवारी दुपारी दोघांनी परस्परांच्या विरोधात तक्रारी दाखल करुन घेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. पिंपळे डहाणू नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पदावर रुजू झाल्यानंतर राजपूत व पिंपळे यांच्यात चकमकी घडतील अशी अटकळ बांधली जात होती. त्याप्रमाणेच सर्व घडताना दिसते आहे.

शनिवारी (1 ऑगस्ट) दुपारच्या सुमारास पिंपळे आपल्या शासकीय वाहनाने राजपूत यांच्या कोळंबी प्रकल्पाच्या रस्त्यावर गेले होते. ही खबर लागताच परत येताना राजपूत यांनी पिंपळेंना थांबवले व तुम्ही माझ्या मागे का लागता आहात? असे विचारले. असे वर्तन तुम्हाला शोभत नसून मग मी देखील तुम्हाला येथे टिकू देणार नाही असा इशारा दिल्याचे समजते. राजपूत यांनी पिंपळेंना ट्रेस पासिंगची कारवाई करण्याचा इशारा देखील दिला. त्यानंतर पिंपळे डहाणू पोलिस स्टेशनला पोहोचले. पाठोपाठ नगराध्यक्ष राजपूत देखील पोलिस स्टेशनला आले.

पिंपळे यांनी राजपूत यांच्या विरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याची तक्रार देण्याचा प्रयत्न केला तर राजपूत यांनी 2016 मध्ये पिंपळेंनी एका इमारत बांधकाम प्रकरणी विकास शुल्क न घेऊन नगरपरिषदेचे आर्थिक नुकसान केल्याचा आरोप केला व पोलिसांकडे गुन्हा नोंदविण्याची मागणी केली. राजपूत यांनी पिंपळे यांच्याशी कुठलेही गैरवर्तन केल्याचा इन्कार केला तर पिंपळे यांनी राजपूत यांना गुन्हा दाखल करण्याचे कुठलेही अधिकार नसल्याची भूमिका घेतली. आपण राजपूत यांच्या कोळंबी प्रकल्पावर गेलो नव्हतो. रस्ता न करता बिले काढल्याच्या तक्रारीची खातरजमा करण्यासाठी विकासकामे तपासत होतो असे पिंपळेंचे म्हणणे आहे. डहाणू पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी गोविंद ओमासे यांनी दोन्ही तक्रारदारांच्या तक्रारी नोंदवून घेण्यास इन्कार करुन तूर्तास आजचा प्रश्न उद्यावर ढकलला आहे.

सर्वप्रथम अतुल पिंपळे कोण आहेत, हे समजून घेऊ या!
7 वर्षांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मिहीर शहा डहाणूचे नगराध्यक्ष असताना अतुल पिंपळे हे डहाणू नगरपालिकेचे मुख्याधिकारी होते. विद्यमान नगराध्यक्ष भरत राजपूत तेव्हा विरोधी पक्ष गटनेते होते. राज्यात भाजपचे सरकार होते. पालघरचे तत्कालीन दिवंगत खासदार चिंतामण वणगा (भाजप) व तत्कालीन आमदार पास्कल धनारे (भाजप) होते. त्यावेळी डहाणू शहराच्या कोट्यावधी रुपये खर्चाच्या महत्वाकांक्षी पाणीपुरवठा योजनेमध्ये घोटाळा झाल्याचा राजपूत यांचा आरोप होता. दिवंगत वणगा व धनारे यांनी ह्याबाबत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती. तक्रारीत काही निष्पन्न झाले नसले तरी त्यानंतर अतुल पिंपळे यांची बदली झाली. दरम्यान स्वतः पास्कल धनारे यांनीच त्यांना डहाणूत बदली मिळावी यासाठी शिफारस पत्र देखील दिले होते.

पाणीपुरवठा योजनेत झालेल्या कथित भ्रष्ट्राचाराच्या मुद्द्यावर निवडणूक लढवून भरत राजपूत थेट पद्धतीने नगराध्यक्ष झाले. 24 महिन्यांत पूर्ण होणे अपेक्षित असलेली पाणीपुरवठा योजना राजपूत नगराध्यक्ष झाले तेव्हाही 48 महिन्यानंतरही अपुरीच होती. राजपूत यांनी स्वतःच केलेले भ्रष्ट्राचाराचे आरोप गुंडाळून ठेकेदाराशी जूळवून घेतले आणि काम पूर्ण झालेले नसताना कोट्यावधी रुपयांची बिले देखील अदा केली. राजपूत नगराध्यक्ष झाल्यानंतरही 24 पेक्षा जास्त महिने उलटले असताना, व योजना सुरु होऊन 72 महिने उलटलेले असताना पाणीपुरवठा योजना आजही अपुरी व ठप्पच आहे. काम निकृष्ट झालेले आहे आणि टाक्या सुरु करण्याआधीच गळक्या झाल्या आहेत. उलट ठेकेदाराने बेपर्वाईने ठिकठिकाणी खोदलेले रस्ते त्याच्याकडून दुरुस्त न करुन घेता, त्यासाठी राजपूत यांच्या नेतृत्वाखालील नगरपरिषदेने कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी केली. त्यांच्या दृष्टीने विकासाची उड्डाणे होत असताना, अचानक त्यांनी उठ सांगितले की उठणारे आणि बस सांगितले की बसणारे मुख्याधिकारी विजयकुमार द्वासे यांची बदली होऊन त्या जागी आता अतुल पिंपळे यांची नियुक्ती झाली.

पिंपळे डहाणू नगरपरिषदेत रुजू होत असतानाच डहाणू नगरपरिषदेमध्ये काही घोटाळे (दैनिक राजतंत्रने ते उघडकीस आणलेले) निष्पन्न झाले होते. त्यामध्ये पिंपळे यांनी कठोर भूमिका घेतली. कॉन्क्रीटवरील डांबरीकरणाच्या 1 कोटी 20 लाख रुपयांच्या कामाला स्थगिती दिली व प्रगतीपथावरील 1 कोटी 20 लाख रुपयांच्या कामाचे थर्ड पार्टी ऑडीट करुन घेतले. स्वाभाविकपणे राजपूत दुखावले जाऊन त्यांच्यात आणि पिंपळे यांच्यात शीतयुद्ध सुरु झाले.

विजयकुमार द्वासे हे कुठल्याही कामाचे बिल काढताना व बांधकाम परवानगी किंवा भोगवटा प्रमाणपत्र देताना आधी नगराध्यक्षांकडे वंदन करुन येण्याचा सल्ला देत असत. ती परंपरा पिंपळे यांनी खंडीत केली. नगराध्यक्षांना विकास कामांची बिले मंजूर करण्यासाठी स्वाक्षरीचे अधिकार नसल्याचा पिंपळेंचा दावा आहे. तसाच दावा राजपूत यांनी मिहीर शहा नगराध्यक्ष असताना केला होता. आज नगराध्यक्ष झाल्यानंतर राजपूत स्वतःच्या सहीनेच बिले मंजूर करण्याचा आग्रह करताहेत. बांधकाम परवानग्या व भोगवटा प्रमाणपत्रे देणे ही प्रशासकीय बाब असून त्या कामामध्ये नगराध्यक्षांचा हस्तक्षेप पिंपळेंना अमान्य आहे.

पिंपळे हे आपल्याला कुठलीही कागदपत्रे बघू देत नाहीत व आपल्याला वैयक्तिक टार्गेट केले जाते असा नगराध्यक्ष राजपूत यांचा आरोप आहे. आपले ऐकणाऱ्या अधिकारी/कर्मचाऱ्यांवर मुख्याधिकारी कारवाई करतात अशी राजपूत यांची तक्रार आहे. नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्यातील शीतयुद्ध आता पोलिस स्टेशनपर्यंत पोहोचले आहे. 7 ऑगस्ट रोजी राजपूत यांनी स्थायी समितीची बैठक लावली असून ही सभा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे न होता प्रत्यक्षात होणार आहे. सभेची विषयपत्रिका रंजक आहे. त्यामध्ये विकासाच्या किंवा कोरोनाच्या मुद्द्यावर कमी आणि पिंपळेंना टार्गेट करता येतील असे मुद्दे अधिक आहेत. पिंपळेंच्या विरोधात प्रायोजित केलेल्या बातम्यांबाबतही चर्चा होणार आहे. दैनिक राजतंत्र ने प्रसिद्ध केलेल्या घोटाळ्याची मात्र चर्चा होणार नसली तरी पारदर्शकता वाढविण्यासाठी मुख्याधिकारी यांचे केबिन पारदर्शक करण्याचा प्रस्ताव पुढे आणण्यात आला आहे. नगराध्यक्ष स्वतःचे केबिन देखील पारदर्शी करण्यास तयार आहेत. आता ह्या युद्धाला नेमका कसा पूर्णविराम लागतो याकडे डहाणूकरांचे लक्ष लागले आहे.

Advertorial
Print Friendly, PDF & Email

comments